Home > मॅक्स रिपोर्ट > शिवबंधनातील ‘हाजी’  

शिवबंधनातील ‘हाजी’  

शिवबंधनातील ‘हाजी’  
X

अर्थात हाजी हालीम यांच्या समोर आव्हानं तर भरपूर आहेत. निवडून येण्याची पहिली परिक्षा ते पास झाले आहेत. त्यांची खरी परिक्षा आता सुरू झाली आहे ज्यावर हाजी हालीम आणि शिवसेनेचं या भागातलं भवितव्य अवलंबून असणार आहे.

या वर्षीची मुंबई महापालिकेची निवडणूक कधी नव्हे इतकी गाजली. या निवडणुकीकडे मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष होते. कारण या निवडणुकीच्या निकालामुळे उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता होती. तसेच मतदारांचा कल दिसून येणार होता. शिवसेनेने या निवडणुकीत सत्ता आणि संपत्ती यांच्या जोरावर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धक्का दिला असला तरीही खरा धक्का वांद्रे पूर्व येथील बेहराम पाडा विभागाच्या निकालाने दिला. हा धक्का जसा इतरांना होता तसाच खुद्द शिवसेनेला देखील होता. या विभागातून प्रथमच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. या पूर्वीच्या निवडणुकीतून कायम काँग्रेस किवा समाजवादी पार्टीचे उमेदवार निवडून आले होते. साहजिकच नवनिर्वाचित नगरसेवक मोहम्मद हालीम यांना भेटण्याची उत्सुकता लागली होती. मोहम्मद हालीम यांचा नंबर फिरवला, जय महाराष्ट्र... माझ्या नमस्काराला समोरून उत्तर आल... हालीमसाब से बात करा देंगे... बोला साहेब... हाजी हालीम बोलतोय... हालीम भाई आपसे मिलना है... माझी हिंदी सुरूच होती... साहेब कधीही या...खेरवाडीत सरपोतदारसाहेबांच्या ऑफिसमध्ये या... पुन्हा एकदा जय महाराष्ट्र म्हणून हाजी हालीमने फोन ठेवला.

खेरवाडी या महाराष्ट्र हौसिंग बोर्डच्या लोअर इन्कम ग्रुपच्या वसाहतीमध्ये दिवंगत शिवसेना नेते आणि आमदार मधुकर सरपोतदार यांच्या कार्यालाबाहेर शिवसैनिक आणि इतर बरेच नागरिक उभे होते. बाळासाहेब आणि मधुकर सरपोतदारांचा भलामोठा फोटो ऑफिसच्या दर्शनी भागावर झळकत होता. (मधुकर सरपोतदार यांच्यावर १९९३ च्या दंगलीच्या काळात दोन समाजामध्ये धार्मिक तेढ आणि प्रक्षोभ निर्माण करणारी भाषणे दिली असा आरोप होता.) शिवसैनिक आणि बाउन्सरच्या गराड्यात पांढरा सदरा, चुडीदार आणि उजव्या मनगटावर शिवबंधन असलेला एक तीस-पस्तीस वर्षाचा तरुण कुणाशी हस्तांदोलन तर कुणाला आलिंगन देत शुभेच्छा स्वीकारीत होता. याच गर्दीत दाढी-टोपी घातलेले मुस्लिम नागरिक तर बुरखाधारी महिला देखील होत्या. कुणा कार्यकर्त्याने निरोप दिला आणि आमची भेट झाली. या... या चला आपण आत बसुया... कुणाचा नमस्कार,तर कुणाचा सलाम वालेकुम स्वीकारत हालीमभाई उपविभागप्रमुख पुंडलिक सावंतच्या केबिनमध्ये घेऊन गेले. केबिनच्या भिंतीवर बाळासाहेब, मीनाताई, मधुकर सरपोतदार आणि उद्धव ठाकरे यांच्या तस्बिरी तर उजव्या भिंतीवर गणपती... टेबलाच्या पलीकडे दोन मुख्य खुर्च्या...एक खुर्ची उपविभागप्रमुख पुंडलिक सावंताची तर दुसरी मधुकर सरपोतदार यांची जी कायम मोकळीच असते.

हालीमभाई तुम्ही निवडणूक लढवायची हे ठरवलं होत का? अर्थातच, मला निवडणुकीला उभ राहायचं होत... आणि तेसुद्धा शिवसेनेच्या तर्फेच... आणि म्हणून सावंतसाहेब आणि अनिल परबसाहेबाना भेटलो होतो. पण शिवसेनाच का? या माझ्या प्रश्नावर हालीम म्हणाले, तुम्हाला सांगतो मी खेरवाडीत लहानाचा मोठा झालो आहे. बाबरी मस्जिद नंतर मुंबईत मोठी दंगल उसळली. त्यावेळेस मी अकरा वर्षाचा होतो. बेहराम पाडा या आताच्या माझ्या मतदार संघात सगळ्यात मोठी दंगल उसळली होती. मला “एमआयएम”कडून उमेदवारी मिळत होती. परंतु माझा पर्याय फक्त शिवसेनाच होता. तुम्हाला आप्तस्वकीयांकडून विरोध नाही झाला का.माझा निर्णय घरच्यांना सांगितला तेव्हा सर्वात आधी आईने संमती दिली. काही नातेवाईक, मित्र, समाजबांधव यांनी माझ्या निर्णयावर आक्षेप घेतला... बाबरी मस्जिद नंतरची दंगल याची आठवण करून दिली. परंतु माझा या लोकांना प्रश्न आहे. बाबरी मस्जिद नंतर मुंबईत दंगल झाली. त्यावेळेस महाराष्ट्रात कुणाच शासन होत, कायदा आणि सुव्यस्था राखण्याच काम कुणाच होत. त्यांनी त्याचं कर्तव्य बजावलं का... तर त्याच उत्तर नाही असच आहे. तरीही आमच्या समाजाने त्यांना भरभरून मते दिली, आजही देत आहेत. परंतु त्या पक्षाला आपण दोष देत नाही असं अत्यंत बिनतोड राजकीय उत्तर दिल. दुसर महत्वाचे कारण म्हणजे शिवसेना या पक्षाइतका समाजात खालपर्यंत रुजलेला पक्ष दुसरा कोणताही नाही. या पक्षाची बांधणी इतकी छान आणि मजबूत आहे की कुणालाही त्याचा हेवा वाटावा. ज्यांना खरोखर काही सामाजिक कार्य करायचं असेल तर शिवसेना इतका योग्य पर्याय नाही. तसंच मला स्वतःला प्रत्येक राज्यात त्या राज्याच्या स्थानिक पक्षाची शासनामध्ये महत्वाची भूमिका असावी असे वाटते. तामिळनाडूमध्ये डीएमके, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगु देसम, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी मग आपल्या महाराष्ट्रात शिवसेना का नाही?

उमेदवारी देण्यापूर्वी तुमची मुलाखत झाली त्याबद्दल काही... “मातोश्री” बद्दल मी ऐकून होतो, उत्सुकता होती, परंतु आजपर्यंत कधी तिथे जाण्याचा योग आला नव्हता. २२ जानेवारीला अनिल परब साहेबांनी मला उद्धव साहेबाना भेटण्यासाठी मातोश्रीवर नेले. मतं मिळतील का? उद्धवसाहेबांच्या या प्रश्नाला, साहेब मी निवडून येणार असे उत्तर दिले. या उत्तराने उद्धव साहेब जरा चमकलेच. परंतु परब साहेबांनी माझ्या उपक्रमाची माहिती दिली. जवळपास १५ मिनिटे माझी मुलाखत झाली आणि उमेदवारी मिळाली. तुम्हाला निवडून येणार याची खात्री होती ती कशी काय? यावर हालीम म्हणाले, वयाच्या १७ वर्षापासून गेली सतरा वर्षे हज यात्रेला जात आहे. त्यामुळे स्वाभाविकच माझ्याबद्दल आमच्या समाजात वेगळी भावना आहे. माझी ओळख देखील हाजी हालीम अशी आहे. माझा व्यवसाय सुद्धा हज यात्रेकरूंना हजला पाठवण्याचा आहे. गेल्या आठ वर्षात जवळपास २८,००० यात्रेकरू माझ्या एजन्सीतर्फे हज यात्रेला गेले आहेत. साहजिकच ते माझ्याशी जोडले गेले आहेत. त्याचबरोबर आमच्या “हाजी हालीम फाऊनडेशन” च्या माध्यमातून हजारोच्या कुटुंबाचा भाग झालो आहे. आमच्या संस्थेशी या विभागातील १२०० कुटुंब जोडली गेली आहेत. बेहराम पाडा आणि नवापाडा या विभागात असलेल्या गरीब, विधवा, गरजू महिलांकरिता आम्ही काम करीत आहोत. प्रामुख्याने अन्न, औषधौपचार आणि व्यवसायभिमुख प्रशिक्षण यावर काम करत आहोत. आणि म्हणून मला खात्री होती की कमीत कमी सात हजारच्या फरकाने मी निवडून येईन. परंतु शेवटच्या तीन दिवसात आमच्या विरोधकांनी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर मतं फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु विजय आमचाच झाला. आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशात प्रत्येक राज्यातील स्थानिक पक्षांना संपविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करत आहे. शिवसेनेच्या जोरावर महाराष्ट्रात पाय रोवल्यावर तोच पक्ष आज धनदांडग्याच्या जोरावर सेनेला संपवायचा स्वप्न पहात आहे.

माझा जन्मच खेरवाडीत झाला. माझे वडील टक्सी चालवतात. आजही आम्ही याच खेरवाडीत राहतो. त्यामुळे बेहराम पाडा मला नवीन नव्हता. बेहरामपाडा मध्ये ९० टक्के मुस्लिम मतदार आहेत. प्रामुख्याने उत्तर प्रदेश,बिहार या प्रांतातील आहेत. माझ्या पहिल्या सभेलाच जवळपास अडीच हजार लोक जमले होते. हा खरेतर शुभशकून होता आणि याचा पूर्ण फायदा घेण्याचे ठरवले. शिवसेना या पक्षाबद्दल असलेला गैरसमज दूर करणे माझ पाहिलं आव्हान होत. महाराष्ट्रातील मस्जिद आणि मदरसाना युतीच्या काळात बाळासाहेबांच्या सूचनेनुसार देण्यात आलेले विशेष चटई क्षेत्र, तसेच बीकेसी येथे १९९७-९८ या काळात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांना लागणारे लक्षावधी लिटर पाणी आणि जागेचे भाडे नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आले हे निर्णय आमच्या समाजातील लोकांना माहित नव्हते. हळूहळू विश्वासाने आमचे लोक माझ्या प्रचारात भाग घेऊ लागले. बीजेपीच्या भूलथापा देशातील लोक अनुभवत आहेतच. एमआयएम आणि बीजेपी हे दोन्ही पक्ष एकाच दिशेने जात आहेत. देशात गेल्या दोन-अडीच वर्षात हैद्राबाद, दिल्ली येथील विद्यापीठातून काय घडत आहे ते आपण अनुभवत आहोत. हे थांबवले नाही तर देशात काय होईल हे कुणी सांगायला नको. तुम्हाला सांगतो निवडून येणे खूप सोप आहे. आता माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मला झटावे लागणार आहे. आतापासूनच आम्ही आमच्या समाजातील काही समविचारी तरुण, व्यावसायिक, विद्यार्थी, शिक्षक यांना बरोबर घेतले आहे. आमच्या विभागात शाळाबाह्य विद्यार्थ्यांच प्रमाण खूप आहे. त्यावर आम्हाला काम करायचं आहे. महानगर पालिकेतर्फे विद्यार्थ्यांना पुरवण्यात येत असलेल्या सुविधा, शाळांची डागडुजी, स्वच्चतागृह, विभागातील आरोग्यसेवा, रस्त्यावरील दिवे, पाणी यावर काम करायचं आहे. मुंबईत चांगले काम करीत असलेल्या सेवाभावी संस्थांना आमच्या विभागात आणण्याचा विचार आहे. आमच्या गरिबांना चांगले शिक्षण आणि आरोग्य इतकच हवे आहे. शिक्षणामुळे आमच्या तरुणांना चांगले-वाईट आणि खरे खोटे हे कळेल आणि आपोआपच दोन समाजातील दरी कमी होईल.

अर्थात हाजी हालीम यांच्या समोर आव्हानं तर भरपूर आहेत. निवडून येण्याची पहिली परिक्षा ते पास झाले आहेत. त्यांची खरी परिक्षा आता सुरू झाली आहे ज्यावर हाजी हालीम आणि शिवसेनेचं या भागातलं भवितव्य अवलंबून असणार आहे.

विकास नाईक

Updated : 10 March 2017 6:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top