Home > मॅक्स रिपोर्ट > प्राईम टाईम टीव्ही रिपोर्ट

प्राईम टाईम टीव्ही रिपोर्ट

प्राईम टाईम टीव्ही रिपोर्ट
X

झी २४ तास ( रोखठोक )

झी 24 तास या वृत्तवाहिनीवर सोमवारी दिग्गज राजकारण्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता. यावेळी काहीही झालं तरी भाजप सरकार पाच वर्ष पूर्ण करणार असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुलाखतीत केलंय.

तर शिवसेना-भाजपची युती तुटली असली तरी निवडणुकीनंतर उभय पक्षांची युती होऊ शकते, असे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या मुलाखतीत दिले आहेत.

दुसरीकडे शिवसेनेनं सरकारचा पाठिंबा काढला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार नाही असं अजित पवार यांनी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. तसंच जे अडचणीच्या काळात पक्ष सोडून गेलेत त्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद आहेत असंही अजित पवार यांनी म्हंटलंय.

टीव्ही नाईन मराठी (खास बात)

टीव्ही नाईनच्या खासबात या कार्यक्रमात सोमवारी चर्चा झाली ती ‘स्मारकाचं गाजर’ या विषयावर. यावेळी काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आंबेडकर स्मारकाची जागा अजूनही राज्य सरकारला हस्तांतरीत झालेली नाही तर सरकारनं तोडकाम सुरू केल्याचा आरोप केला. त्यावर भाजप आमदार भाई गिरकर यांनी त्यांचा हा आरोप खोडून काढत जमीन हस्तांतरीत झाल्याचा दावा केलाय. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो किंवा झेंडा न घेता प्रचार करा, आंबेडकरी जनता कशी धुळ चारते ते पाहा, निवडणुकीच्या आधी असं राजकारण करू नका असं आव्हान भारीप बहुजनचे जनरल सेक्रेटरी ज.वि. पवार यांनी भाजपला दिलंय.

जय महाराष्ट्र (न्यूजरूम लाईव्ह)

जय महाराष्ट्रच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये सोमवारी अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी अजित पवारांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. भाजपकडून त्यांच्या विरोधातल्या बातम्यांची तात्काळ नोंद घेवून त्या थांबवल्या जातात असा दावा अजित पवार यांनी यावेळी केलाय. तसंच अशा प्रकारे मिडीयावर दबाव आणणं हानीकारक ठरु शकते असंही त्यांनी म्हंटलंय. ज्यावेळी राजकीय प्रश्न येतो तेव्हा फक्त शरद पवारच पक्षात निर्णय घेत असतात. राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करेल या चर्चेला सध्या काय अर्थ नाही, तसंच धनंजय मुंडे आणि माझ्यात कोणताही संघर्ष नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलतांना सिंचन घोटाळ्याबाबत चितळे समितीने सादर केलेल्या अहवालाला फारसी प्रसिद्धी मिळाली नाही हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलंय.

महाराष्ट्र वन (आजचा सवाल)

महाराष्ट्र वनच्या आजचा सवाल या कार्यक्रमात सोमवारी ‘महापालिका निवडणुकीत मनी आणि मसल पॉवरची चलती आहे का?’ या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. चर्चेच्या सुरूवातीलाच भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी भाजपवर होणारे आरोप खोडून काढले. आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांवर खटले भरले जातात, त्यांना गुंड म्हणायचे का? असं सवाल त्यांनी केला. त्यावर शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी भाजपनं बलात्कार, मोक्काचे आरोप असलेल्यांना काय म्हणून पवित्र करून घेतलंय हे स्पष्ट करावं असा प्रतिसवाल केला. अवधूत वाघ यांवी पप्पु कलानी यांचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादीवर तोफ डागली. त्यावर आमच्या पक्षात एकही गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला. तसंच भाजप सोशल मीडियाच्या मध्यमातून राष्ट्रवादीला बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या चर्चेत सहभागी झालेले पत्रकार विजय चोरमारे यांनी सर्वच पक्षात कशा पद्धतीनं गुंडशाही बोकाळलीय याचा पाढाच वाचला. तर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी भाजपकडून ही अपेक्षा नव्हती असं मत व्यक्त केलं, तसंच भाजपच्या अशा वागण्यानं गुंडांना सरकारचा पाठिंबा आहे असा संदेश जात असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

Updated : 13 Feb 2017 6:51 PM GMT
Next Story
Share it
Top