Home > मॅक्स रिपोर्ट > टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

टीव्ही 'प्राईम टाईम' रिपोर्ट

झी 24 तास ( रोखठोक )

झी 24 तासच्या रोखठोक या कार्यक्रमात मंगळावारी चर्चा झाली ती गोवा आणि मणिपूरमध्ये सुरू असलेल्या भाजपच्या राजकारणावर. गोव्यात आणि मणिपूरमध्ये राज्यपाल पक्षपातीपणे वागले, सगळ्या पक्षांशी चर्चा न करता निर्णय घेतला असा आरोप प्रामुख्यानं काँग्रेसच्या अतुल लोढेंनी केला. तर भाजपनं तो खोडून काढला. काँग्रेसमध्येच ताळमेळ नव्हता, भाजपला दोष देण्यात अर्थ नाही, राज्यपाल कायद्याप्रमाणे वागले असा जोरदार प्रतिवाद भाजपच्या नाना पटोलेंनी केला. राज्यपाल केंद्र सरकारच्या इशा-यावर पक्षपातीपणे वागले का यावर मग चर्चा रंगली. राज्यपाल या संस्थेचे अवमुल्यन झाले आहे हे खरेच पण हे अवमुल्यन नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळातही झाले, भाजपच्या काळातही हेच सुरु राहिले असे निरिक्षण उल्हास बापट यांनी नोंदवले. राज्यपाल केंद्राच्या हातचं बाहुलं बनू नये म्हणून सरकारिया कमिशननं काय निरिक्षण नोंदवली आहेत याची आठवणही उल्हास बापट यांनी करुन दिली. राज्यघटनेत राज्यपालांनी कसे वागावे याची काही मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली नाहित असेही बापट यांनी स्पष्ट केले. राज्यपाल चुकीचे वागले यावर काँग्रेसचे अतुल लोंढे ठाम होते तर राज्यपालांनी जे काही केलं ते योग्यच होतं यावर भाजपचे नाना पटोले ठाम होते. गोवेकरांनी भाजपला नाकारले आहे पण जलद खेळी करण्यात काँग्रेस कमी पडली असे निरिक्षण पत्रकार किशोर नाईक यांनी नोंदवले.

टीव्ही नाईन मराठी ( महाराष्ट्राला उत्तर हवंय )

टीव्ही नाईन मराठीच्या महाराष्ट्राला उत्तर हवंय, या टॉक शोमध्ये. "सत्ता, नैतिकता आणि भाजप" या विषयावर चर्चा झाली. असोसिएट एडिटर निखिला म्हात्रे यांनी या शोचं सूत्रसंचलन केलं. यात भाजप आमदार गिरीश व्यास, काँग्रेस प्रवक्ते जनार्दन चांदूरकर, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, राजकीय विश्लेषक जयंत माईणकर सहभागी झाले होते. भाजपनं गोव्यात लोकशाहीचा बळी दिल्याचा घणाघाती आरोप जनार्दन चांदूरकर आणि प्रकाश रेड्डी यांनी केला. यावेळी त्यांची गिरीश व्यास यांच्याशी शाब्दिक चकमक उडाली. जयंत माईणकर यांनीही, सिंगल लार्जेस्ट पार्टीऐवजी भाजपनं सत्ता स्थापन केल्याबद्दल टीका केली. तर भाजप प्रवक्ते व्यास यांनी, काँग्रेसला कोणाचाही पाठींबा नव्हता हा मुद्दा मांडला.

Updated : 14 March 2017 6:18 PM GMT
Next Story
Share it
Top