Home > मॅक्स रिपोर्ट > चकाचक जाहिरातीची भेसूर कहानी

चकाचक जाहिरातीची भेसूर कहानी

चकाचक जाहिरातीची भेसूर कहानी
X

भाजपने सत्तेत येण्यासाठी जाहिरातींचं मोठं कॅम्पेन केलं होतं. प्रचारात त्याचा फायदा झाला आणि मात्र भाजप सत्तेत आलं. आज सरकारला तीन वर्ष झाली तरीही अद्यापपर्यंत या जाहिरातीचे सत्र संपलेले नाही. फडणवीस सरकारने या तीन वर्षात आम्ही किती कामे केली याची जाहिरातींची मालिकाच सुरू केली आहे, मात्र स्वतःची बढाई मारण्यासाठी शेतकऱ्यांना न विचारताच आपल्या जाहिरातीमध्ये शेतकऱ्यांना झळकवले जात आहेत. या सर्व जाहिरातबाजीचा शेतकऱ्यांला नाहक त्रास होत आहे. सरकार स्वतःच्या विकास कामांचा उदो उदो करत असले तरीही सरकार करत असलेले दावे खरच खरे आहेत का? सरकारकडून ज्या जाहिराती दाखवल्या जात आहे त्या खऱ्या आहेत का? सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दाखवलेली परिस्थिती खरी आहे का? याची सत्यता पडताळणीसाठी 'मॅक्स महाराष्ट्र' टीमने प्रयत्न केला आणि त्यानंतर पुण्याचा भीवरी गावातील शांताराम कटके या शेतकऱ्याला शेततळे मंजूर झाले आणि तेही आमच्यामुळे असा दावा करणाऱ्या सरकारच्या जाहिरातेचं सत्य 'मॅक्समहाराष्ट्र'ने महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले आहे. त्यानंतर फडणवीस सरकारच्या सरकारच्या अशाच एका जाहिरातीचं सत्य समोर आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जांभळी हे गाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. ग्राम परिवर्तन अभियानाअंतर्गत गावातील विकास केला जाणार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. 28 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या यु-ट्यूब अकाऊंटवरून एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील जांभळी गावात बस नसल्यानं मुलींना शाळेत जाण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे अनेक मुलींनी शाळा सोडली असल्याची एका मुलीची प्रतिक्रिया दाखवण्यात आली. त्यानंतर गावात कोणतीही वैद्यकीय सेवा नसल्याचे दाखवण्यात आले आहे. १९ वर्षांपासून गावात राशन कार्ड नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या पहिल्या भागात हे दाखवण्यात आले नंतर याच व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की १५ ऑगस्टनंतर गावात बस सुरू झाली आणि त्याचा फायदा आता शाळकरी विद्यार्थ्यांना होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच तसा व्हिडिओ सुद्धा दाखवण्यात आला आहे. गावात वैद्यकीय सेवा नव्हती. मात्र आता गावात टेली मेडिसीन सुरू केल्याने गावातील गावकऱ्यांना याचा फायदा होत आहे असे दाखवण्यात आले आहे. यात गावातील अहमद शेख या गावकऱ्याची प्रतिक्रिया ही दाखवण्यात आली आहे. तसेच गावातील गावकऱ्यांना १९ वर्षानंतर राशन कार्ड मिळाले हे दाखवण्यात आले आहे. मात्र या व्हिडिओची सत्यता पडताळणीसाठी आमच्या प्रतिनिधीने शोधमोहीम सुरू केली. गावात आम्ही ज्या लोकांना व्हिडिओच्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले त्यांना शोधण्याच्या प्रयत्न केला आणि माहिती घेतली असता जाहिरातीमध्ये दाखवलेली परिस्थिती आणि वास्तव यात फरक असल्याचं आढळून आलंय. गावात बस सुरू झाली खरी, मात्र जाहिरातींसाठी व्हिडिओ शूट झाला. काही दिवस बस चालली आणि आता ही बस बंद झाली आहे. विशेष म्हणजे जाहिरात व्हिडिओमध्ये ज्या मुलीला बसचा फायदा होत आहे अशी प्रतिक्रिया दाखवली तिला आम्ही शोधलं आणि खरी परिस्थिती जाणून घेतली असता, तिला या बसचा फायदाच झाला नाही. दुसरीकडे गावात टेली मेडिसीन सुरू करण्यात आले असल्याचं दाखवण्यात आले आहे, मात्र महिन्याभरापासून हे टेली मेडिसिन देखील बंद झाले आहे. दुसरीकडे १९ वर्षांपासून गावात राशन कार्ड नसल्याचा देखील दावा या जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. गावातील गावकऱ्यांना राशन कार्ड बनवण्यासाठी ग्राम परिवर्तन दुत यांनी मदत केली हे सत्य असली तरीही मात्र गावातील नागरिकांना १९ वर्षांपासून राशन कार्ड नसल्याचा दावा खोटा आहे. कारण गावातील अनेक लोकांकडे १९ वर्षीच्या आधीपासून राशन कार्ड आहेत. त्यामुळे ह्या सुविधा फक्त जाहिरात बनवण्यासाठी करण्यात आला होता का? असा प्रश्न गावकरी करत आहेत.

बसचा त्या मुलींना फायदाच नाही.

आम्ही जांभळी गावात पोहोचल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलेली परिस्थितीची सत्यता पडताळणी सुरू केली आणि ज्या मुलांना व्हिडिओमध्ये बससाठी वाट पाहत असल्याचं दाखवलं त्यांना जाऊन भेटलो. सणोवर तबसुम शामिर शेख या विद्यार्थीनीने तिला व्हिडिओमध्ये बसची सुविधा सुरू झाल्याने त्रास कमी झाल्याचं सांगत, ४ किलोमीटर पायी चालावे लागत असल्याची पायपीट बंद झाल्याचे ती म्हणत आहे. तर जाहिरातीच्या पुढील भागात गावात बस सुरू झाल्याने त्या मुलींना बसचा कसा फायदा झाला हे दाखवण्यात आले आहे. मात्र खरी परिस्थिती अशी आहे की गावात १५ दिवसांपासून बस आलीच नाही तर दोन-तीन महिने जी बस आली ती औरंगाबाद-बिडकीन-जांभळी मार्गाने, मात्र ज्या मुली व्हिडिओमध्ये दाखवल्या त्या ज्या शाळेत जातात आणि शाळेसाठी जाणाऱ्या रस्त्यावर आजपर्यत बस धावलीच नाही, तर मुलीच्या मागे दाखवण्यात आलेले मुले हे गावातील शाळेतील मुले उभे करण्यात आली होती. गावातच शाळा असल्यामुळे त्यांना बसची गरजच नाही मग त्यांना व्हिडिओमध्ये का उभे केले ?

टेली मेडिसिन तर बंदच !

वरील सत्यता पडताळणी झाल्यानंतर आम्ही व्हिडिओमध्ये गावात टेली मिडिसीन सुरू झालं असं दाखवण्यात आले आहे. त्याबाबत गावातील अहेमद शेख या व्यक्तीची प्रतिक्रिया दाखवण्यात आली. आम्ही शेख अहेमद यांना जाऊन भेटलो असता त्यांना व्हिडिओमध्ये तुम्ही दिलेली प्रतिकियाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की माझी ज्यावेळी बाईट घेण्यात आली, त्यावेळी बस सुरू होती, टेली मेडिसीन सुरू होते, आणि काही लोकांना राशन कार्ड सुद्धा देण्यात आले, मात्र आज बस पण बंद झाली, टेली मेडिसीन पण बंद झालं, आणि राशन कार्ड काही लोकांना मिळाले. नंतर गावातील अनेक लोक अजून वंचित आहेत. त्यांना अद्यापर्यंत राशन कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे 'आमचा व्हिडिओ बनण्यापुरता या सुविधा गावात सुरू करण्यात आल्या होत्या का?’ असा प्रश्न त्यांना पडत आहे.

Updated : 7 Nov 2017 4:28 PM GMT
Next Story
Share it
Top