Home > मॅक्स रिपोर्ट > ग्रामपंचायत निवडणुकीत कोण ठरलंय अव्वल? काँग्रेस की भाजप?

ग्रामपंचायत निवडणुकीत कोण ठरलंय अव्वल? काँग्रेस की भाजप?

ग्रामपंचायत निवडणुकीत कोण ठरलंय अव्वल? काँग्रेस की भाजप?
X

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? हे अद्याप निश्चित नसताना सत्ताधारी भाजपने सर्वात जास्त जागा मिळवल्याचा दावा केल्यानंतर आता काँग्रेसने सर्वात जास्त जागा मिळवल्याचा दावा केला आहे. पहिला टप्प्याच्या निकालानंतर भाजपवे तातडीने दावा करत आपण सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला होता. मीडियातूनही त्याच आशयाच्या बातम्या आल्या. आता दुसऱ्या टप्प्यात मात्र काँग्रेसही सतर्क राहिली आणि त्यांनीही आपण सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत असा दावा केला आहे.

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे. भाजपच्या आकडेवारीनुसार त्यांनी अमरावतीत १५० ग्रामपंचायती जिंकल्यात तर काँग्रेसनं हा दावा फेटाळून लावला आहे.

भाजपकडून खोटी माहिती देऊन माध्यमांची व जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यात फक्त 36 ग्रामपंचायतीमध्ये भाजपला विजय मिळाला असताना भाजपकडून 150 ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याची खोटी माहिती दिली जात असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुस-या टप्प्याच्या निकालातही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने दावा केलेल्या आकडेवारीबाबतही आक्षेप घेतला जात आहे. पुणे जिल्ह्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचा तालुका असलेल्या इंदापूरमध्ये निवडून आलेल्या २१४ ग्रामपंचायत सदस्यांपैकी १२६ सदस्य आपले असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. विरोधकांना अवघ्या 88 जागा मिळाल्याचा दावा काॅग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्य़ातील 52 पैकी 27 ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळवल्याचा दावा केला आहे. तर भाजपने चंद्रपूर जिल्हयात २८ जागा मिळवल्याचा दावा करत कॉंग्रेसला अवघ्या १८ जागा मिळाल्याचे म्हटले आहे.

खरं तर ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होत नसल्यानं राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर केली जात नाही. मग राजकीय पक्ष कोणत्या आधारावर आपण अव्वल ठरल्याचा दावा करत आहे हे को़ं काही उलगडत नाहीये.

Updated : 17 Oct 2017 2:17 PM GMT
Next Story
Share it
Top