Home > मॅक्स रिपोर्ट > आधार लिंकने घेतला चिमुरडीचा जीव

आधार लिंकने घेतला चिमुरडीचा जीव

आधार लिंकने घेतला चिमुरडीचा जीव
X

झारखंडमध्ये रेशन कार्डला आधार लिंक नसल्यामुळे एका गरीब महिलेला रेशन मिळाले नाही आणि भूकेने तिच्या 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री रघुवर दास सिमडेगा येथे आले तेव्हा त्यांनी या घटनेसंबंधी 24 तासात अहवाल देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असून पीडित कुटुंबाला 50 हजार रुपये मदत देण्याचे आदेश दिले आहे.

झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील जलडेगा तालुक्यामधील कारीमाटी गावातील ही दुर्दैवी घटना आहे. मागास समाजातील कायली देवी यांनी सांगितल्यानुसार, त्यांची मुलगी 4 दिवसांपासून उपाशी होती. घरात स्वंयपाकासाठी काहीच नव्हते. फक्त मातीची चूल आणि लाकडे होती. त्यावर काय शिजवावे हा कायली देवींना प्रश्न पडला होता. 28 सप्टेंबरच्या दुपारी भूकेने संतोषीच्या पोटात खूप दुखायला लागले. तेव्हा तिला गावातील वैद्याकडे घेऊन गेले होते. संतोषी म्हणाली होती, मला वैद्याकडे नेऊ नको काही खायला दे पोट बरे होईल. कायली देवी म्हणाल्या रात्री 10 वाजता मुलगी भात-भात करत रडायला लागली. तिचे हात-पाय वाकडे होऊ लागले. त्यानंतर मी चहा पावडर आणि मीठ एकत्र करुन काढा तयार केला आणि तिला पाजण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत मुलीचा श्वास थांबला होता.

आठ महिन्यांपासून रेशन बंद आहे. मृत संतोषीच्या आईने आरोप केला की गावातील रेशन दुकानदाराने आठ महिन्यांपासून तिचे रेशन बंद केले आहे. कारण तिचे रेशन कार्ड आधारसोबत लिंक झालेले नाही. अधिकाऱ्यांकडे केली तक्रार, तरीही रेशन नाही मिळाले. आधार सक्तीमुळे मुलगी गमावलेल्या कायली देवीने रेशन मिळत नसल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत केली होती. 21 ऑगस्ट आणि 25 सप्टेंबरला त्यांनी डिप्टी कमिश्नरकडे रेशन मिळत नसल्याची तक्रार केली होती.

काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आधार लिकिंग प्रक्रिया सरकारने जटील केली असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील अकोल्यात झालेल्या जाहीर कार्यक्रमात सिन्हांनी मोदी सरकारच्या विविध निर्णयांचे काय-काय दुष्परणीम होऊ शकतात, याची माहिती दिली होती. सिन्हा म्हणाले होते, की यंत्रणा ही जटील करुन टाकली जात आहे. यामुळे एखाद्या गरीबाचा जीव जाऊ शकतो. आधार लिंक केले नाही म्हणून मला कैद करा आणि 3 महिने तुरुंगात टाका जेणे करुन मी तिथे तरी जिवंत राहू शकेल. तर नुकत्यात जाहीर झालेल्या 2017 च्या जागतिक हंगर इंडेक्समध्ये 119 देशांमध्ये भारताचा क्रमांक तीनने खाली घसरून 100 वर गेला आहे. त्यावरुन राहुल गांधींनी प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमारांचा शेर ट्विट करुन सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते,

भूख है तो सब्र कर, रोटी नहीं तो क्या हुआ

आजकल दिल्ली में है जेरे-बहस ये मुद्दआ .

स्थानिक माध्यमांमध्ये मुलीच्या मृत्यूच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी डिप्टी कमिश्नरकडे मुलीच्या मृत्यू प्रकरणी अहवाल मागवला. त्यावर डिप्टी कमिश्नर मंजूनाथ भजंत्री म्हणाले होते, की मुलीचा मृत्यू मलेरियामुळे झाला. तीन सदस्यांची समिती गठीत करुन तपास सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Updated : 17 Oct 2017 11:31 AM GMT
Next Story
Share it
Top