सेल्फि ले लो सेल्फि… !

539

मुंबईतील दादरच्या शिवाजीपार्क मैदानाला लागून तरूणाईची होणारी रंगीत गर्दी आता ओस पडणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्याचं कारणही तसंच आहे मुंबईतला पहिला सेल्फि पॉईंट म्हणून ओळख असलेला इथला पॉईंट बंद करण्याचं सुतोवाच मनसेनं केलं. मात्र, या घोषणेपाठोपाठ तरूणाईला दोन प्रबळ राजकीय पक्षांनी साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी हा सेल्फि पॉईंट आपणच सुरू ठेवू असा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणूकीनं मुंबईत “कौन कितने पानी मे”  हे स्पष्ट केलं आहे. या निवडणूकीत काही पक्षांना अपेक्षेप्रमाणं तर काहींना अवचित बळ मिळालं. तर काही पक्षांची फिल्लम उतरली. ज्या पक्षांची नशा आणि नक्षा या निवडणूकीत उतरला त्यांची फारच वाताहत झाली आहे. महापालिकेच्या गत निवडणूकीत दादरमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सहापैकी पाच जागा जिंकून मनसेनं आपलं दमदार आगमन केलं होतं.

दादरमधील या कामगिरीबद्दल मनसेप्रमुखांनी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या खांद्यावर गटनेतेपदाचा भार सोपवला. तरूणाईचा चेहरा असलेल्या या नगरसेवकाने शिवाजी पार्काशेजारी सेल्फि पॉईंट सुरू केला. या सेल्फि पॉईंटचे खूप  कौतूक झाले आणि त्याला प्रतिसादही भरपूर मिळाला. रंगीबेरंगी छत्र्या उलट्या टांगण्यात आल्या होत्या. तर झाडांच्या खोडांनाही आकर्षक रंग सजावट करून लोकांना भूरळ पाडण्यात आली. मात्र, या सेल्फि पॉईटची देखभाल आणि दुरूस्ती थोडी खर्चिक असल्याने नगरसेवक पदावरून पायउतार झालेल्या देशपांडेना ती परवडणारी नाही. त्यांच्या पक्षालाही हा सेल्फि पॉईंट सुरू ठेवावा असे वाटू नये, यातच सगळं काही आलं. म्हणूनच त्यांनी हा पॉईंट बंद करणार असल्याचे सांगताच या प्रभागात निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका  आणि माजी महापौर विशाखा राऊत यांनी आपण हा सेल्फि पॉईंट सुरू ठेवणार असल्याचे पोस्टर तात्काळ लावून त्याच्यावर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला सतत शह देण्याचा प्रयत्न करणा-या आणि मुंबईवर सारखा आपला हक्क सांगणा-या भाजपा मुंबई अध्यक्षांनीही या सेल्फि पॉईंटवर हक्क सांगितला आहे.

हा सेल्फि पॉईंट आपण अधिक चांगल्याप्रकारे चालू ठेवू, असा दावा त्यांनी केला आहे. एकुणच, सेल्फि पॉईंटवर हक्क सांगून तरूणांना आकर्षित करण्यापाठोपाठ तो सुरू करणा-याचे नाकर्तेपण अधोरेखित करण्याचा हा डाव दोन्ही पक्षांकडून केला जातोय, असे म्हटले तर वावगे ठरू नये.