Home > मॅक्स किसान > यवतमाळात विषापेक्षा विषारी दारू...

यवतमाळात विषापेक्षा विषारी दारू...

यवतमाळात विषापेक्षा विषारी दारू...
X

यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी आणि शेतमजूरांचा मृत्यू झाल्याने चांगलाच गाजला मात्र या जिल्ह्याला दारूने देखील पोखरून टाकले आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन घेतलेला हा आढावा…

मी नुकताच यवतमाळ जिल्ह्यातील काही गावात जावून आलोय, दोन दिवसांच्या या भेटीत मी जे बघीतलं ते भयानक आणि तेवढंच विदारकंही होतं. किटकनाशकांच्या हत्याकांडानंतर दहशतीत जगणारी गावं आणि जगण्यासाठी संघर्ष करणारे मजुर नेमकं काय करतात, हे मला पहायचं होतं. पण जे डोळ्यानी दिसलं ते आणखीच भयावह होतं.

पहिली कहानी...

मोतीबाई तोडसाम, घाटांजी तालुक्यातील बोधडी गावात मोतीबाईचं उभं आयुष्य गेलं. मी सायंकाळच्या वेळेस मोतीबाईच्या झोपडीजवळ पोहोचलो. लुपलुपत्या दिव्यांच्या प्रकाशात मोतीबाईचा ओझरता चेहरा दिसला. दिवस रविवार होता, शेजारच्या आठवडी बाजारातला आवाज मधून मधून कानावर पडत होता. मोतीबाई बोलायला लागल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती कायम दिसत होती, मित्र महेश पवार विचारु लागला ‘घाबरता कशाला, काय घडतंय तुमच्यासोबत गजाननला सविस्तर सांगा.’… मोतीबाईंनी झोपडीच्या आत नेलं, झोपडीचं तुटलेलं दारघट्ट बांधलं, आणि डोळ्यांतील आसवांच्या साक्षीनं आपल्या जीवनाची कहानीसांगायला लागल्या... “४० वरीस झाले लगीन झालं, वयाच्या दहाव्या वरसी बापानं लगीन केलं, पण लगीन झालं आणि नवरा पिदाड (दारुड्या) निघाला, रोज दारु आणि रोजचा मार, हे माय जीवन झालंय, दिवसभर ५०-१०० रुपयाची मोलमजुरी करायची, तीन लेकराचं पोट भराचं आणि रोज दादल्याचा जीवजाईस्तोर मार खायचा, जगावं वाटत नाही, पण मुलांसाठी जगली. तीन्ही मुलं लेकुरवाळी झाली, आपले दिस निघाले, सुखाचे दिस आले, घडीभर असं वाटलं, पण काय गावात तीनी मुलांना दारुचा शौक (व्यसन) लागलं, आधी दारु ढोकसायला पैशासाठी नवरा मारायचा आता मुलंही मारतात, मरावं वाटतं आता”

डोळ्यात अश्रू आणि मोतीबाईच्या संघर्षाची कहानी सुरु होती. लिपलीपत्या दिव्याच्या प्रकाशात मी आणि मित्र महेश आम्ही ऐकत होतो, तेवढ्यात मोतीबाईच्या झोपडीच्या बाहेर आवाज आला, मोतीबाईचा जीव कासाविस झाला, मुलानं ऐकलं सगळं आता तुम्ही गेले की पुन्हा मारणार. दारुला पैसे मागणार’, पुन्हा मोतीबाईच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात अश्रू होते, झोपडीच्या बाहेर पडलो, तर दुसरं कुणीतरी आलं होतं, पण पुन्हा काही बोलायची मोतीबाईमध्ये हिम्मत उरली नव्हती. जाता जाता एकच म्हणाल्या ‘दारु कदी बंद होणार’ हे उत्तर माझ्यासह लाखो महिला शोधत आहेत. दारुच्या व्यसनामुळे उभ्या आयुष्याची राखरांगोळी झालेल्या मोतीबाईच्या प्रश्नाचं उत्तर या व्यवस्थेकडेही नाही.

दुसरं गाव, दुसरी कहानी...

जयमाला राजेंद्र बोंद्रे... कळंब तालुक्यातील जोडमोहा गावाच्या टोकाला जयमाला ताई आपल्या दोन लेकरांसह एकट्याच राहतात. वयाच्या २९ व्या वर्षी त्यांना पांढऱ्या कपाळानं जीवन जगावं लागतंय. यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी व्हावी म्हणून जयमाला ताईंनी सहा वर्षे लढा दिला, पण याच दारुनं यंदा त्यांच्या पतीचा घात केला. दारुमुळे पतीचा मृत्यू झाला आणि जयमाला ताईच्या डोक्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. ज्या वयात सुखी संसाराचे स्वप्न बघीतले जातात, त्याच वयात २९ व्या वर्षी जयमाला ताईंवर विधवेचं जीनं आलं. पतीच्या निधनानंतर डोक्यावर छत नाही, जगायला अन्न नाही अशा स्थितीत दोन मुलांचं आणि स्वत:चं पोट कसं भरायचं, हा त्यांच्यापुढचा मोठा प्रश्न आहे. वडीलांचंही आयुष्य दारीद्र्यात गेलं, त्यांनी जोडमोहा गावाच्या अगदी टोकाला जयमाला ताईसाठी छोटीशी झोपडी दिली, जिथे सुरुवात होते, तिथेच

संपणाऱ्या या झोपडीत जयमाला ताई जगण्यासाठी संघर्ष करत आहे. जीवनातलं सर्वात मोठं दु:ख तुडवत त्यांचा पुढचा प्रवास सुरु आहे.

एका दारुमुळे जयमाला ताईचं आयुष्य उध्वस्त झालं... ‘माझ्यावर आलेलं हे संकट यवतमाळ जिल्ह्यातील माझ्या इतर बहिनींवर येऊ नये, म्हणून मी यवतमाळच्या दारुबंदीसाठी लढा आणखी तीव्र करणार, स्वामिनीचा हा लढा हाय,’…. जगण्यासाठी पावलोपावली संघर्ष करणाऱ्या जयमाला ताईंचा हा निर्धार, अनेकांना लढण्यासाठी सोळा हत्तीचं बळ देवून जातो.

दोन दिवसांत मी यवतमाळ जिल्ह्यातील घाटांजी, बोधडी, गणेशवाडी, जोडमोहा, कळंबसह बऱ्यात गावांमध्ये गेलो… या गावांमधील निम्म्या घरांच्या चौकटी दारुमुळे पिढ्याच्या पिढ्या उध्वस्त झाल्याची साक्ष देतात. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचं हेच कटू वास्तव आहे. दरवर्षी दारुच्या आहारी गेलेल्या शेकडो तरुणांची सरणं एकट्या यवतमाळ जिल्ह्यात रचली जात आहे. पण आपल्या राज्यकर्त्यांच्या या तरुणांच्या जगण्यापेक्षा करापोटी येणारा पैसा जास्त महत्त्वाचा आहे. यातंच आपल्या व्यवस्थेच्या दुरावस्थेचं मुळ आहे.

‘कापूस उत्पादकांची स्मशानभुमी’ याच नावाने जगाच्या नकाशावर यवतमाळ कुप्रसिद्ध आहे, शेतकरी आत्महत्या, कुमारी माता, व्यसनाधिनता आणि यंदा किटकनाशकांचं हत्याकांड… यासह अनेक समस्यांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील गावं आज उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. जर यवतमाळला वाचवायचं असेल तर ठोस पावलं उचलण्याची आज खरी गरज आहे, नाही तर यवतमाळला लागलेला हा वनवा ग्रामीण महाराष्ट्रात पसरून ग्रामीण भाग खाक व्हायला वेळ लावणार नाही.

Updated : 17 Nov 2017 7:34 AM GMT
Next Story
Share it
Top