टीव्ही ‘प्राईम टाईम’ रिपोर्ट

झी 24 तास (रोखठोक)

झी 24 तासच्या रोखठोकमध्ये कर्जमाफीवरून रणकंदन या विषयावर चर्चा झाली. काँग्रेस सरकारच्या काळात 71 हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर शेतक-यांच्या आत्महत्या कमी झाल्या होत्या. ज्या बँकांनी त्यावेळी गडबडी केली, त्या बँकांवर सरकारनं कठोर कारवाई करावी. मात्र बँकांचा फायदा होतो, असं सांगत कर्जमाफी नाकारणं योग्य नाही. कर्जमाफीचा फायदा शेतक-यांना होतो, असा मुद्दा काँग्रेस आमदार वीरेंद्र जगताप यांनी यावेळी मांडला. गेल्या 2 वर्षांत 9 हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून, कर्जमाफी झाली नाही तर आणखी आत्महत्या वाढतील, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. भाजप देखील कर्जमाफीच्याच बाजूनं आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना शेतक-यांसाठी कर्जमाफी नकोय. तर शेतक-यांच्या नावावर स्थापन करण्यात आलेल्या बोगस कंपन्या आणि पतसंस्थांसाठी कर्जमाफीचा घाट घातला जातोय, असा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी केला. शेतक-याचा सातबारा कोरा करण्याचीच भाजप सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना आमदार अनिल कदम यांनी यावेळी थेट मुख्यमंत्र्यांवरच टीकेची झोड उठवली. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस शेतक-यांच्या बाजूनं पोटतिडकीनं सभागृहात बोलायचे. पण सत्तेत आल्यानंतर ती पोटतिडीक जाणवत नाही, असं ते म्हणाले. शेतक-यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे, अशी मागणी सर्वच आमदारांनी केली. आयात केलेल्या डाळीला गोदामं मिळतात, पण शेतक-यानं पिकवलेल्या शेतीमालासाठी गोदामं मिळत नाही, असा मुद्दाही यावेळी चर्चेला आला.

महाराष्ट्र 1 (आजचा सवाल)
महाराष्ट्र 1 च्या आजच्या सवाल मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवर भाजप सरकार चालढकल करतंय का? या सवालावर चर्चा झाली. यात भाजपचे आमदार अनिल बोंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमरसिंह पंडीत, शिवसेना आमदार हेमंत पाटील , वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, पत्रकार संजय मिस्कीन हे सहभागी झाले होते. अडीच वर्षात 9 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही भाजप सरकार गप्प का?, कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी रोखून धरली जातेय का? , व्यापारी-दलाल आणि सरकारी यंत्रणेच्या चक्रव्युहात शेतमालाचे भाव घसरतायत का?, नोटबंदीचा फटका बसलेल्या कापूस, सोयाबीन, तूर, कांदा पिकांना बोनस द्यावा का? या मुद्द्यांवर मान्यवरांनी मतं मांडली.

टीव्ही 9 मराठी
टी व्ही 9 मराठीवर गुरूवारी संध्याकाळी 5 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर चर्चा झाली. या चर्चेत भाजपचे खासदार अमर साबळे, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, समाजवादी पार्टीचे अयूब शेख आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सहभागी झाले होते. असोसिएट एडिटर निखिला म्हात्रे यांनी या चर्चेचं सूत्रसंचलन केलं. पाचही राज्यात भाजप यश मिळवेल असा दावा अमर साबळे यांनी केला. तर राजू वाघमारे यांनी भाजपला सर्वत्र सपाटून दणका पडणार असल्याचा टोला लगावला. यूपीत सपाचं सरकार कायम राहिल असा विश्वास अयूब शेख यांनी व्यक्त केला. तर एक्झिट पोलचे अंदाज कधी बरोबर येतात, तर कधी चूकतात असं निखिल वागळे यांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर त्या निकालांचा देशाच्या राजकारणावर परिणाम होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं.