आम्हाला बंदुका द्या!

418

…ही मागणी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. प्रश्नही पडला असेल, अशी विचित्र मागणी करतय तर तरी कोण…ही मागणी सरकारी यंत्रणेच्या विरोधात कुण्या गावाची किंवा भ्रष्टव्यवस्थेला मोडू पहाणाऱ्या कुण्या क्रांतीकाऱ्याची नाही. ही मागणी आहे, राज्यातल्या सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांची… होय, डॉक्टरांनी सरकारकडे ही मागणी केलीये. या मागणीमागे कारणही तसंच आहे.

सरकारी रूग्णालयात डॉक्टरांवर होणारे हल्ले वाढलेत. या वाढत्या हल्यांमुळे डॉक्टरांना त्यांच्या जीवाची भीती वाटतेय. यासाठीच राज्यातल्या 4000 डॉक्टरांनी सरकारकडे बंदूकीचा परवना देण्याची मागणी केलीये. डॉक्टरांचं म्हणणं एकच आहे. सरकारी रूग्णालयात आम्ही काम करतो, मग आमच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?  आमच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. सरकारने आम्हाला योग्यती सुरक्षा पुरवावी. पण, तसं होत नाहीये. सरकार आम्हाला सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरतयं. मग, आमच्या जीवाची सुरक्षा आम्ही नाही तर कोण करणार? प्रत्येकाला स्वत:चं रक्षण करण्याचा अधिकार संविधानानेच दिलाय, मग आम्ही आमच्या रक्षणासाठी बंदूकीचा परवना मागितला तर काय चुकलं?

1२ मार्चला नाशिकमध्ये डॉ.रोहन म्हामूणकर या निवासी डॉक्टरवर हल्ला झाला. पण, या हल्यानंतरही डॉक्टरांवर होणार हल्ले थांबले नाहीत. एका आठवड्यातच, मुंबई, नाशिक औरंगाबादमध्ये डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडल्या.

१२ मार्च – धुळे डॉ. रोहन म्हामूणकरवर हल्ला

१६ मार्च – नाशिकमध्ये इंटर्न डॉक्टर आणि नर्सवर हल्ला

१८ मार्च – सायन रुग्णालयात डॉक्टराला मारहाण

१८ जानेवारी लातूरमध्ये डॉक्टरवर हल्ला

१९ मार्च औरंगाबाद डॉ. विवेक बडगेंना मारहाण

आणि म्हणूनच..डॉक्टरांनी सरकारकडे बंदूकीचा परवाना देण्याची मागणी केलीये.

मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं गेल्यावर्षी देखील अशीच मागणी सरकारकडे केली होती. आम्हाला आमचा जीव वाचवण्याचा अधिकार आहे आम्हाला बंदूका द्या अशा आशयाचं पत्र मार्डने मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. “खरंतर, आम्हाला बंदूका नकोत, आम्हाला रुग्णांसाठी चांगल्या सुविधा हव्या आहेत. पण, आता आम्हाला आमच्या जीवाची भीती वाटू लागलीये. त्यामुळे सरकार जर आम्हाला सुरक्षा देणार नसेल, तर मग आम्हाला आता आमच्या सुरक्षेसाठी बंदूक तरी द्या” असं एका डॉक्टरनं माझ्याशी बोलतांना सांगितलं.

पण, ही मागणी फक्त मार्डच्या डॉक्टरांकडूनच ऐकू येत नाहीये. तर, नावाजलेल्या डॉक्टरांचीही हीच मागणी आहे. प्रतिष्ठीत डायबेटीस फुटकेअर सर्जन अरूण बाळ यांनी ‘माय मेडीकल मंत्रा’ या हेल्थ वेबसाईटशी बोलताना तर हेच मत व्यक्त केलं. डॉ. बाळ म्हणतात, “डॉक्टर हा रूग्णांचा जीव वाचवण्यासाठी आहे, आम्ही तशी शपथं घेतो, पण प्रत्येक हल्यानंतर आता हे वाटू लागलयं की डॉक्टरांनी स्वसंरक्षणासाठी एक बंदूक जवळ बाळगावी. डॉक्टरांनी कुणी आपल्या मदतीस येईल, याची वाट न पाहता, आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी जे काही करता येईल त्या सर्व गोष्टी कराव्यात. स्वसंरक्षणाचा हक्क हा सुप्रीम कोर्टही कोणापासून हिरावून घेवू शकत नाही”.

तर, काही डॉक्टर्स, सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आता आरएमओ क्वार्टर्समध्ये हॉकी स्टीक ठेवाव्यात असं मत व्यक्त करतायत. डॉक्टरांनी वेळ न घालवता, मदतीसाठी याचना न करता, जशाच-तसं उत्तर द्यावं असंही काही नावाजलेल्या डॉक्टरांच म्हणणं आहे. इंटर्न डॉक्टरांनी तर, “रॅपिड एक्शन फोर्स” नावाचा एक ग्रूपही तयार केलाय. ज्यात संभाव्य हल्ला, किंवा थोडी तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर, सर्वानी एकत्र येण्यासाठी हा ग्रूप तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

हायकोर्टाने संपावर गेलेल्या डॉक्टरांना चांगलं खडकावलंय. मारहाणीची भीती वाटते, तर मग नोकरी सोडा असंही कोर्टाने म्हटलंय. डॉक्टरांना धारेवर धरत, जे डॉक्टर कामावर परतणार नाहीत त्यांना बडतर्फ करा असे निर्देश प्रशासनाला दिलेत.

पण, वाढत्या मारहाणीच्या घटनांकडे, डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉक्टरांकडूनही रुग्णांशी बोलताना चूका होतात, चुकीचे शब्द वापरले जातात. यावरून बाचाबाचीही होते. पण, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांवरचा कामचा ताण देखील आपण समजून घेतला पाहिजे.

डॉक्टरांची बंदूकीच्या परवान्याची मागणी ही वाढच्या हल्यांमुळे, आपण काहीच करू शकत नाही, आणि सरकारी काहीच करत नाही या उद्दीग्नतेतून निर्माण झालीये. डॉक्टरांच्या हातात बंदूक नाही स्थेथोस्कोपच चांगला दिसेल, कारण हृदयाच्या स्पंदनातून निर्माण झालेल्या आवाजाचा वापर त्यांना रुग्णाच्या अचूक निदानासाठी करायचा असतो. डॉक्टर्स आपलं काम करतील, पुन्हा कामाला येतील, पण, सरकारनेही त्यांचं कर्तव्य करावं, डॉक्टरांची सुरक्षा ही आपली जबाबदारीही आहे असं मानून पावलं उचलावीत. लालफीतीत डॉक्टरांची सुरक्षा अडकून पडू नये हीच सर्वांची मागणी आहे.

  • मयांक भागवत