…आणि परिचारक निलंबित

356

भाजप आमदार प्रशांत परिचारक यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. अर्थात ही कारवाई त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत असणार आहे. या चौकशीसाठी विधीमंडळानं सहा सदस्यांच्या समितीची नियुक्ती केली आहे. या समितीच्या अहवालानंतर त्यांच्यावरील निलंबनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या पद्धतीनं सर्व माध्यमांनी आणि विधीमंडळातील अन्य विरोधी सदस्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि याबाबतीतले त्यांचे उपलब्ध असलेले पुरावे पाहता या चौकशीनंतर परिचारकांच्या निलंबनाच्या कारवाईवर शिक्कामोर्तब होईल…

या अधिवेशनाच्या सुरूवातीला सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधी पक्षाकडे तसा कोणताच ठोस मुद्दा नव्हता, सरकारमधील विऱोधीपक्ष असलेल्या शिवसेनेनेही नेहमीप्रमाणे ऐनवेळी शेपूट घातल्याने सरकारविरोधात नेमके काय रान उठवायचे हा प्रश्न विरोधकांपुढे होता. शेतकरी कर्जमाफीचा विषय वगळता तसे काहीच हत्यार नव्हते. पण, प्रशांत परिचारक यांनी विरोधकांची ही अडचण लक्षात घेवून त्यांना संधी निर्माण करून दिली ती आपल्या बेताल वक्तव्यानं. सीमेवर लढणारे सैनिक वर्षभर घरी येत नाहीत आणि त्यांना मुलं झाली की ते मात्र पेढे वाटतात. ही मुलं कशी होतात ते श्रेय कुणाचं ? असं बेताल वक्तव्य जाहीर सभेत करून त्यांनी समस्त सैनिकांचा आणि त्यांच्या पत्नींचाही अपमान केला होता. अशी बेताल वक्तव्ये करण्याची अवदसा सुचते कशी? त्यांना ही मग्रुरी येते कुठून? सत्तेचा हा माज कसा येतो? अजित पवार यांनीही सत्तेत असताना अशाच पद्धतीने एक विधान केल्यानंतर त्यांना याच भाजपाने कसे सळो की पळो करून सोडले होते. हे आपण सर्व जाणतोच. तेव्हा भाजपाकडे असलेली सद्सद्विवेकबुद्धी आता सत्तेत आल्यानंतर कुठे गेली. कारण परिचारक यांनी हे वक्तव्य करून सुमारे पंधरा दिवस लोटले आहेत. या काळात सत्तेवर बसलेल्या विवेकी लोकांना ही बाब का खटकली नाही? त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? विरोधकांनाही या गोष्टीचा किस पाडला आणि अखेर निलंबनाची कारवाई करायला भाग पाडले. हे योग्यच आहे किंवा विरोधक म्हणून ते त्यांचे कामच आहे. महिलादिनी परिचारक यांच्यावरील कारवाईला सुरूवात होणे ही एकाअर्थी सैनिकांच्या पत्नींना भेटच आहे.  मात्र, राज्यातील हे विरोधक अऩ्य बाबतीत का इतक्या आक्रमकपणे सरकारला धारेवर धरत नाहीत? वर्षानुवर्षे रेंगाळणा-या अऩेक प्रश्नांचा याच पद्धतीनं पाठपुरावा करून प्रसंगी सभागृहात ताकद दाखवून प्रश्न सोडवावेत, अशी जनतेला रास्त अपेक्षा आहे.