अशोक चव्हाणांच्या येण्याने मराठवाडयात भाजपा झाली काँग्रेसमय कार्यकर्त्यांची अस्वस्थता मुद्द्यावरून गुद्द्यावर
X
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही असे वक्तव्य केले होते. तसेच नांदेड हा काँग्रेसचा गड असून त्यामुळे काही फरक पडणार नाही, असा दावाही केला होता. परंतु पंधरा दिवसातच नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसने हाय खाल्ली आहे. अस्वस्थेतून काँग्रेसचे कार्यकर्ते मुद्यावरून गुद्यावर येत आहेत. कारण काल मोंढा येथिल काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यामध्ये फ्रिस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय.त्यावरून अशोक चव्हाण यांच्या जाण्या सोबत काँग्रेसची शिस्तही गेलीं काय असा सवाल उपस्थित होत आहे.अशोक चव्हाण यांच्या भाजप मध्ये जाण्याने काँग्रसचा बुरुज ढासळनार नाही असे म्हणणारे काँग्रेसचे नेते असे गुद्दा गुद्दीचे प्रकार पाहून,काँग्रेस मधील अंतर्गत अस्वस्थतेमुळे होत असल्याचे बोलल्या जात आहे.
मराठवाड्यातील काँग्रेस मध्ये सध्या पदे उदंड पण सक्षम कार्यकर्तेच नाहीत अशी बिकट अवस्था काँग्रेसची झाली आहे. दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का दिला. त्यामुळे राज्यभरातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हादरून गेले आहेत. आता पंधरा दिवसानंतरही हे नेते आणि कार्यकर्ते या धक्क्यातून सावरले नाहीत. चव्हाणांसोबत पहिल्या दिवशी फक्त माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे गेले होते. परंतु चव्हाण नांदेडात परतताच काँग्रेसला सोडून भाजप मध्ये दाखल होणाऱ्यांची अक्षशः रीघ लागली आहे.
ज्यात काँग्रेसची शहर व जिल्हा तसेच युवा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे या पदांवर लोकसभा निवडणुकीपूर्वी इतर कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी लागणार आहे.
परंतु पदे उदंड असली तरी त्या पदाला न्याय देऊ शकतील, अशी सक्षम कार्यकर्त्यांच्या वणवा व नेत्यांची फळी सध्या काँग्रेसमध्ये नाहीये. तर दुसरीकडे दिग्गजांच्या आऊटगोईंगनंतर दुसया फळीतील कार्यकर्त्यांना अच्छे दिन येतील, असेही काहींना वाटतेय.
दररोज वेगवेगळ्या तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसची साथ सोडत आहेत. आजपर्यंत चव्हाणांच्या चेहऱ्यावरच निवडून आलोत, तेच सोबत नसतील तर राजकीय भवितव्य काय? अशी चिंता काँग्रेसच्या या पुढाऱ्यांना सतावत होती. डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसचे पक्षनिरीक्षक नांदेडात मुक्कामी होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. जिल्ह्यात काँग्रेस मजबूत असल्याचे दावेही केले. परंतु या बैठकांना उपस्थिती लावणाऱ्यांनीच दुसऱ्या दिवशी भाजपाचे कमळ हाती धरले. त्यामुळे काँग्रेस पुरती हवालदिल झाली आहे. त्यामुळे आभाळच फाटले शिवणार कुठे? अशा पेचात काँग्रेस सापडलीय.
लोकसभा निवडणुकीचे भाजपाने रणशिंग फुंकले असले तरी नांदेडमध्ये भाजपात नव्यानेच झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारीसाठी चक्रव्यूह रचले जात असल्याची चर्चा आहे. या चक्रव्यूहात नेमका बळी कोणाचा दिला जाणार ? याबाबत चर्चाना उधाण आले आहे.दरम्यान लोकसभा उमेदवारीसाठी शह- काटशहाचा होत असलेला प्रयत्नही जोरदार चर्चेत सुरू आहे.
'अब की बार 400 पार'चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. तर आज भाजपाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणूक लढविणार आहेत. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही, असेही भाजपाने जाहीर केले आहे. एकीकडे देशपातळीवर भाजपाला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी नेतेमंडळी कामाला लागली आहेत,तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात भजपात पुन्हा एकदा पाय ओढण्याची वृत्ती समोर आली आहे.
ज्यात लोकसभेची उमेदवारी कोणाला देण्यात येणार, याकडेही लक्ष लागले असतांना नुकतेच भाजपाचे दोन आमदार पक्ष निरीक्षक म्हणून नांदेडला येऊन गेले. त्यांच्यासमोर गटागटाने अनेकांनी अनेकांच्या शिफारशी केल्या; परंतु यात कळीचा मुद्दा ठरत आहे तो, भाजपाच्याच तीन आमदारांनी कोणाच्या नावाची शिफारस केली.ज्यामुळे अशोकराव चव्हाण हे भाजपात दाखल झाल्यानंतर सर्वाधिक आनंद झाला तो भाजपाच्याच आमदारांना. जे गेल्या चार
वर्षांसाठी भाजप खासदारांच्या विरोधात षड्यंत्र रचण्यात माहीर आहेत. ज्यात काहींचे तर ऑडिओच व्हायरल झाले होते. एवढेच नाही तर चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर शहरात झळकलेल्या काही बॅनर्सवर कोणाला कोणाचे पाठबळ आहे, हे बॅनरवरील छायाचित्राच्या मांडणीवरून दिसून येत होते. त्यात भाजपाच्या तीन आमदारांनी एका जिल्हाध्यक्षाने मीनलताई खतगावकर यांना उमेदवारी द्या, असा सूर लावल्याची चर्चा आहे.तर दुसरीकडे जिल्ह्यातील भाजपाच्या परिस्थितीचा नव्याने आढावा घ्यावा,मगच उमेदवारी जाहीर करावी, अशी भूमिका येथील वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याने भाजपासमोरही उमेदवारीचा पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपात दाखल झालेल्या नेत्यांकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी चक्रव्यूह रचले जात आहेत. या चक्रव्यूहात विद्यमान खासदारांना अडकविण्याचा काही जणांचा मानस असल्याची चर्चा आहे.तर 'साहेब बदला घेतात' असे दबक्या आवाजात साहेबांचे कार्यकर्ते मन्याडच्या वाघाला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहेत. माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांचेही नाव उमेदवारीसाठी पुढे आल्याचे समजते. डॉ. संतुकराव हंबर्डे, आ. राम पाटील रातोळीकर, सौ. पुनम पवार यांनाही लोकसभा निवडणूक लढविण्याची दांडगी इच्छा आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वांकडूनच फिल्डींग लावण्यात येत असली तरी कारस्थानाचे चक्रव्यूह कोण भेदणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.