Home > Max Political > ठाकरे सरकारची दोन वर्षे, आघाडी सरकारमध्ये सन्नाटा का?

ठाकरे सरकारची दोन वर्षे, आघाडी सरकारमध्ये सन्नाटा का?

ठाकरे सरकारची दोन वर्षे, आघाडी सरकारमध्ये सन्नाटा का?
X

नारायण राणे म्हणतात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार, आठवले म्हणतात मार्च किंवा एप्रिलमध्ये सरकार येणार, प्रवीण दरेकर म्हणतात भविष्यवाणी करत नाही पण आमचे सरकार येणार... भाजपच्या नेत्यांचे सत्ता स्थापनेचे दावे अचानक का वाढले आहेत. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असताना विरोधक एवढे दावे का करत आहेत आणि सरकारच्या दोन वर्ष पूर्ण करण्याच्या यशाचे सेलिब्रेशन का केले जात नाहीये, असे अनेक प्रश्न उपस्थित होते आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असताना भाजपचे नेते मात्र आता भाजपचे सरकार येणार असल्याचे दावे करत आहेत. एवढेच नाही तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तर शिवसेना-भाजप एकत्र येऊ शकतात असे वक्तव्य करुन राजकीय गोंधळात भर टाकली आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये सरकार स्थापन होऊ शकते असे ते म्हणत आहेत. या सगळ्यावर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपती खिल्ली उडवत सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असे दावे केले आहेत. एकीकडे भाजपचे नेते एवढे आक्रमक झालेले असताना सत्ताधारी गटात मात्र सन्नाटा दिसतो आहे. भाजपच्या नेत्यांना राष्ट्रवादीचे नवाब मलिक, जयंत पाटील आणि इकडे संजय राऊत उत्तर देत आहेत. पण सरकारला दोन वर्ष पूर्ण होण्याच्या काळात विरोधकांचे असे दावे काही प्रश्न उपस्थित करत आहेत.

भाजपला शह देत महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने अभूतपूर्व आघाडी करत सरकार स्थापन केले, हे सरकार काही महिन्यात कोसळेल असे दावे भाजप नेते छाती ठोकपणे करत होते, पण या सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत...पण मग या यशाबाबत महाविकास आघाडीत शांतता का आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचे कारण समजू शकते, पण तिन्ही पक्षांच्या उर्वरित नेत्यांनी एकत्र येऊन जनतेपुढे सरकारची कामगिरी का मांडलेली नाही, स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन सरकारची कामगिरी का मांडली जाते आहे.

याबद्दल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काटकसरीचे धोरण स्वीकारले आहे, त्यामुळे सरकारला २ वर्षे पूर्ण होण्याच्या यशाचे सेलिब्रेशन करणार नाही, असा निर्णयच सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले आहे, यात सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. खरेतर केंद्रात भाजपची सत्ता असताना महाराष्ट्रात वेगळा राजकीय प्रयोग करत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण कऱणं हे देखील एक मोठे यश आहे....एकीकडे भाजपचे नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन सरकारचे अपयश मांडताना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना एकत्र येऊन उत्तर का देत नाही, असा निर्माण होतो आहे.

Updated : 29 Nov 2021 11:47 AM GMT
Next Story
Share it
Top