रवींद्र वायकर शिवसेनेत का गेले ?
X
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासु, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात नुकताच प्रवेश केला आहे. त्यांनी प्रवेश केल्याने पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 'वर्षा' निवासस्थानी रविवारी वायकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान ठाकरेंची साथ सोडून शिंदेचा हात धरण्याची प्रामुख्याने दोन महत्वाची कारणे आहेत, त्याविषयी जाणून या लेखात जाऊन घेऊया.
रवींद्र वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही ठाकरे गटाला मुंबईत फटका बसू शकतो.
पक्ष प्रवेशावेळी रवींद्र वायकर म्हणाले, "गेली 50 वर्षे शिवसेनेत काम केलं. बाळासाहेबांबरोबर शिवसेनेचं हातात पडेल ते काम केलं. 4 वेळा नगरसेवक, 3 वेळा आमदार झालो. मात्र शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचं कारण वेगळं आहे. कोविड काळात राज्यात काहीही कामे झाली नाही. राज्यात विकासाची कामं व्हायला पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामुख्यानं शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. मात्र माध्यमांनी जेव्हा वायकरांना ईडी चौकशीवर प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले की, "यंत्रणांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं आहे. त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल."
उत्तर-पश्चिम (वायव्य) मुंबईत जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात वायकरांची मोठी ताकद असल्याचं मानलं जातं. आणि याच त्यांच्या ताकदीचा शिवसेनेला लोकसभा निवडणूकीत फायदा करून घ्यायचा आहे. वायकर पक्ष सोडतील याचा अंदाज उद्धव ठाकरेंना होताच, त्यामुळे 9 मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी त्यांच्याच प्रभाव क्षेत्रात दौरा करत उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अमोल कीर्तीकर उमेदवार असतील, असं जाहीर केलं.
या घोषणेवरून महाविकास आघाडीतच वादाची ठिणगी पडली आहे. कारण महाविकास आघाडीचं जागावाटप होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांचं नाव कसं जाहीर केलं? असं म्हणत काँग्रेसचे मुंबईतील नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
कोण आहेत रवींद्र वायकर?
मुंबई महानगरपालिकेत रवींद्र वायकर यांनी 20 वर्षं नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मुंबईच्या जोगेश्वरी भागातून 1992 मध्ये ते पहिल्यांदा महापालिकेवर निवडून गेले. 2006-2010 या काळात वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. 2014- 2019 या काळात वायकर हे गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री राहिले आहेत.
कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप काय आहे?
शिवसेना गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच इडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे.
9 जानेवारी 2023 रोजी ईडीच्या सुमारे 12 अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती. त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. जोगेश्वरी येथील मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप वायकर यांच्यावर करण्यात आला होता. तसंच 'मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्ट आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
जोगेश्वरी येथे मुंबई महानगरपालिकेचं मैदान आणि उद्यान आहे. मजासवाडी या परिसरात 13 हजार 674 चौरस फुटांची पालिकेची जागा आहे. या जागेवर पालिकेची परवानगी न घेता पंचतारांकित हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप रविंद्र वायकर यांच्यावरती करण्यात आला आहे. यानंतर या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली. त्यांच्या घरावर छापा टाकला त्या दरम्यान कागदपत्रांची छाननीदेखील करण्यात आली. वायकर यांच्या घरासह इतर सात ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. 29 जानेवारीलाही या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी केली. यासाठी त्यांनी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं होतं. यापूर्वी दोन वेळा त्यांना चौकशीसाठी समन्स देण्यात आला होता.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगांने अमोल किर्तीकर यांना देण्यात आलेलं उमेदवारी किंवा वायकर यांची सुरू असलेली ईडी चौकशी हे ठाकरेंची साथ सोडण्यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.