Home > Max Political > भाजपच्या यशाचे व महागठबंधनच्या अपयशाचे रहस्य

भाजपच्या यशाचे व महागठबंधनच्या अपयशाचे रहस्य

एक्झिट पोलचे अंदाज चुकवत बिहारमध्ये एनडीएने सत्ता काबीज केली. पण यामागे भाजपने बिहारमध्ये कोणती रणनीती राबवली, पडद्यामागे काय घडले याचे विश्लेषण करणारा पत्रकार तुषार कोहळे यांचा लेख नक्की वाचा....

भाजपच्या यशाचे व महागठबंधनच्या अपयशाचे रहस्य
X

बिहार निवडणुकीचे निकाल आले. बिहारमध्ये राज्य सरकार विरोधात लाट असतांना देखील भारतीय जनता पक्षाने बिहारची ही निवडणूक जिंकली. नुसती निवडणूक जिंकली नाही तर पराभवाच्या गर्तेतून पक्षाने(एनडीए) विजय खेचून आणला. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने बिहार निवडणुकीच्या आधी जे मायक्रो मॅनेजमेंट केले होते, त्याचेच विजयात रूपांतर झाले. भारतीय जनता पक्षाच्या (एनडीए)विजयाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे झाल्यास, निवडणुकीत एनडीएच्या विरोधात जाणारी जवळपास एक कोटी(२५%) मते ही महागठबंधनला एकगठ्ठा मिळू न देता इतर पक्षांमध्ये विभागली गेली. यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जे यश मिळाले तेच या विजयाचे रहस्य आहे.

भारतात मार्च महिन्यात कोरोनाचा प्रभाव सुरू झाला होता. त्यानंतर कडकडीत लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन उघडताच मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुरांचे मूळगावी जाण्यासाठी स्थलांतर सुरू झाले. त्यात बिहारचे मजूर अधिक होते. जुलै महिन्यात बिहारमध्ये महापुराने थैमान घातले. या सर्व संकटांना हाताळण्यात बिहारच्या सरकारला अपयश आले. त्यामुळे हळूहळू नितीशकुमार यांच्या विरोधात जनमत तयार झाले. भारतीय जनता पक्षाला याचा आधीच अंदाज आला व त्यानुसार भारतीय जनता पक्षाने रणनीती ठरवायला सुरवात केली. सुरवातीला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आपली कोणती मते एनडीए विरोधात जाणारी आहेत याची चाचपणी केली. यात भाजप सोबत असलेला उच्चवर्णीय मतदार व नितीश कुमारांसोबत असलेला ओबीसी मतदार हे एनडीए सोबतच असल्याचे लक्षात आले. तर कोणत्या मतदारांना आपल्याकडे ओढले जाऊ शकते याचा अभ्यास केला गेला. त्यानुसार महिला मतांवर लक्ष केंद्रित केले गेले. लालू प्रसादांच्या काळातील जंगलराज, बिहारची दारूबंदी, महिलांसाठी केंद्र व राज्याच्या योजनांना प्रचाराचे प्रमुख मुद्दे बनवले. त्यानुसार प्रचाराची रणनीती आखली यामुळेच या निवडणुकीत महिलांच्या मतदानाचा टक्का पाच टाक्यांनी वाढला. ही सर्व मते भारतीय जनता पक्ष(एनडीए) ला मिळाली असावी असा अंदाज आहे वर्तविला जात आहे.

त्यानंतर महागठबंधन जाणाऱ्या एनडीए विरोधी मतांच्या विभाजनावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष केंद्रीत केले. जागावाटपाच्या वादातून राष्ट्रीय जनता दलासोबत असलेले मुकेश सहानी यांचा व्हीआयपी पक्ष, जितेंद्र मांझी यांची हम पार्टी, आरएलएसपी व इतर छोटेछोटे जातीय पक्ष हे राष्ट्रीय जनता दलाच्या महागठबंधनपासून वेगळे झाले. ही संधी मिळताच भाजप नेत्यांनी सन्मानजनक जगाचे आश्वासन देत व्हीआयपी व हम पार्टीला एनडीए सोबत ओढले. भाजप व जेडीयू(एनडीए) विरोधी संपूर्ण मते महागठबंधनकडे जाणार नाही याची खबरदारी भाजप नेत्यांनी वारंवार घेतली. त्यासाठी लोकजनशक्ती पार्टीला स्वतंत्र लढण्यास सांगितले. सोबत भारतीय जनता पक्षाने बीएसपी, एमआयएम व आरएलएसपीसह इतर छोटे पक्ष म्हणून जो ग्रँड डेमोक्रोटिक सेक्युलर फ्रंट हा चौथा मोर्चा तयार झाला, त्यांना अप्रत्यक्षपणे पैशाची रसद पुरवत ताकद दिली. भारतीय जनता पक्ष एवढ्यावरच थांबला नाही, तर अपक्ष व इतर जातीय प्रभाव गटांना हाताशी पकडून पाचवी आघाडी उभी केली व एनडीए विरोधी मतांच्या विभाजनाचे नियोजन केले. भाजपचे उमेदवार जिंकून येऊच शकत नाही अशा मतदारसंघात भाजपने आपली मते लोकजनशक्ती पार्टी, चौथा मोर्चा किंवा छोटे पक्ष व अपक्षांकडे वळवली. याचा फायदा असा झाला की मध्य, पूर्व व पश्चिमी बिहारमध्ये लोकजनशक्ती यांनी ५.६६% (२५ लाखांपेक्षा जास्त मते), सीमांचल मधील मुस्लीम बहुल भागात एमआयएम १.२५%, बीएसपी १.४९%, आरएलएसपी १.७७% या चौथ्या मोर्चाने (५० लाखांपेक्षा जास्त) मते मिळाली. एनडीए विरोधी मतांच्या एकूण आकड्यावर नजर टाकली तर लोकजनशक्ती, जीडीएफएस चौथा मोर्चा, अपक्ष व छोट्या छोट्या जातीय पक्षांचा पाचवा मोर्चा या सगळ्यांची एकत्रित जवळपास १ कोटी (२५%) मते ही महागठबंधन पासून दूर करण्यात भाजपला यश झाले.

निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजप (एनडीए)ला ३४ टक्के मतदान झाले. महागठबंधनला जवळपास ३४ टक्के मतदान झाले व लोकजनशक्ती, जीडीएसएफ( बीएसपी, एमआयएम) सह इतरांना ३२ टक्के मते मिळाली. म्हणजे निवडणूक जिंकणाऱ्या भाजप(एनडीए)च्या विरोधात ६६% मते पडली. पण एनडीए विरोधी महागठबंधनकडे जाणाऱ्या मतांचे विभाजन करण्यात भारतीय जनता पक्षाला जे यश आले त्यामुळे भाजपला (एनडीए) निसटता का असेना पण विजय मिळविता आला.

या निवडणुकीत महागठबंधनच्या बाजूने काही चांगले घडले असेल तर ते म्हणजे आरजेडी व डाव्या पक्षांना एकत्र आणण्यात तेजस्वी यादव यांना यश आले. त्याचा फायदा निकालात दिसला देखील. मात्र दोन प्रमुख चुका महागठबंधने केल्या. एक निवडणुकीच्या खेळात सर्वात कमजोर असलेल्या काँग्रेसला ७० जागा सोडल्या व दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हम, व्हीआयपी व आरएलएसपी या स्थानिक जातीय पक्षांना जागावाटपात तोडगा निघू न शकल्याने महागठबंधनच्या बाहेर ठेवले. त्यामुळे महागठबंधनला निसटत्या पराभवाला समोर जावे लागले.

भाजपने महागठबंधनच्या या दोन चुकांचा पुरेपूर फायदा उचलला. सर्वात कमजोर असलेल्या काँग्रेसवर लक्ष केंद्रित करत अधिक शक्तीने प्रहार केला व त्यांचे ५१ उमेदवार पराभूत केले. ५१ जागा हातातून गेल्यानंतर महागठबंधनसाठी निवडणूक जिंकणे अशक्य होते. महागठबंधनचा पराभव काँग्रेससाठी सोडलेल्या ७० जागांमुळे झाला. दुसरी गोष्ट म्हणजे बिहारमधील २४३ मतदारसंघात जे छोटेछोटे जातीय समूह व पक्ष आहे त्यांना भारतीय जनता पक्षाने प्रत्यक्ष सोबत घेऊन किंवा काहींना पडद्या मागून मदत केली. ही रणनीती मात्र तेजस्वी यादव व त्यांच्या मित्र पक्षांना जमली नाही.

१९९० नंतर देशाच्या राजकारणाचे मंडलीकरण झाले, हे राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्वात आधी लक्षात आले. त्यांनतर भारतीय जनता पक्षाने त्यानुसार निवडणुकीचे नियोजन करण्यास सुरवात केली. राजकारणाच्या मंडलीकरणानुसार जागावाटपात जातीनिहाय प्रतिनिधित्व देणे, जातीनिहाय प्रचाराचे चेहरे पुढे करणे, पक्षाचा निवडणूक जाहीरनामा तयार करतांना जातीय संतुलन ठेवणे, यावर भारतीय जनता पक्षाने मायक्रो नियोजन केले. इतर प्रादेशिक पक्षांना देखील मंडलीकरणाच्या राजकारणाचे महत्व कळून चुकले, तेसुद्धा तसेच नियोजन करतांना दिसतात. बिहार निवडणुकीत भाजप व आरजेडीकडून तसे पाहायला मिळाले. मात्र काँग्रेस अजूनही दलित व अल्पसंख्याकांच्या राजकारणात अडकून पडली आहे, हे पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुकीने अधोरेखित झाले.

बिहार निवडणुकीचे निकाल यासाठी देखील महत्वाचे आहे की, या निकालाने देशाच्या राजकारणाची पुढची दिशा बदलली आहे. दिवंगत इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत, जे स्वतःच्या लोकप्रियतेच्या जोरावर राज्यातल्या विधानसभा निवडणुका जिंकू शकतात. दुसरी गोष्ट तेजस्वी यादवच्या रूपाने हे देखील दिसून आले की तरुण नेतृत्व जनतेत उतरले तर ते नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यासारख्या मातब्बर जोडीला तरुण नेतृत्व घाम फोडू शकते व तिसरी महत्वाची गोष्ट राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचा फायदा मित्र पक्ष असलेल्या प्रादेशिक पक्षाला जाला नाही. त्यामुळे बिहार निवडणुकीचे निकाल हे जसे भारतीय जनता पक्षाला ऊर्जा देणारे आहेत तसे ते काँग्रेसला आत्मपरrक्षण करायला लावणारे आहे.

Updated : 2020-11-12T17:41:59+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top