Home > Max Political > काय आहे कच्चातिवू बेटाचा वाद ? ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला

काय आहे कच्चातिवू बेटाचा वाद ? ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला

काय आहे कच्चातिवू बेटाचा वाद ? ज्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी संसदेत केला
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावावरील भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांवर टीका करतांना त्यांनी कच्चातिवू या बेटाचा उल्लेख केला होता. कच्चातिवू च्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ज्या मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी अविश्वासाचा ठराव आणला होता, त्यावर मणिपूरचा मुद्दा लवकरच निकाली निघेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं. मात्र, एकीकडे मणिपूरचा मुद्दा सुरू असतांना त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी कच्चातिवू बेटाच्या संदर्भात विरोधकांना काही प्रश्न विचारले ? विरोधकांनी कच्चातिवू बेटासंदर्भात काहीतरी बोलावं असं आव्हानच मोदींनी विरोधकांना दिलं. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हेच कच्चातिवू बेट पुन्हा भारतानं आपल्या ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली होती...त्यामुळं कच्चातिवू बेटाचा वाद नेमका काय आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत...


कच्चातिवू बेटावर श्रीलंकेनं केला दावा

१९२१ मध्ये कच्चातिवू बेटावर श्रीलंकेनं दावा केला होता. तेव्हापासूनच हे बेट वादाचा विषय ठरला आहे. हे बेट वादात असूनही श्रीलंका आणि तामिळनाडूतले मच्छिमार या बेटाचा वापर मासेमारीसाठी करत आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून श्रीलंकेकडून इथं मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना त्रास दिला जातोय, प्रसंगी त्यांना अटकही केली जात आहे.

इंदिरा गांधींनीच गिफ्ट केलं होतं कच्चातिवू बेट श्रीलंकेला

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ मध्ये हे बेट श्रीलंकेला गिफ्ट केलं होतं. त्यावेळी इंदिरा गांधी आणि श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान श्रीमाओ भंडारनायके यांच्यात एक करार झाला होता. त्यानंतर हे बेट भारतानं श्रीलंकेला गिफ्ट केलं होतं. मात्र, हे बेट गिफ्ट केल्याची कुठलीही नोंद भारताच्या संसदेत नाहीये. त्यावरच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना प्रश्न विचारले गेले की, भारताची जमीन दुसऱ्या देशाला गिफ्ट करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला ?

जयललिता यांनीही बेटासंदर्भात उपस्थित केले होते प्रश्न

ज्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कच्चातिवू बेट श्रीलंकेला गिफ्ट केलं होतं. तेव्हा तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांनीही त्या घटनेला विरोध केला नाही हे विशेष. खरंतर मुख्यमंत्री म्हणून एम.करूणानिधी यांनी या घटनेला विरोध करणं अपेक्षित होतं. मात्र, ज्यावेळी जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली आणि कच्चातिवू बेट गिफ्ट करण्याच्या मुद्द्यावर सार्वजनिकरित्या बोलायला सुरूवात केली. त्यावर तामिळनाडूनध्ये बराच राजकीय काथ्याकूट झाला. जयललिता सरकारनं कच्चातिवू बेटाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणला. तेव्हापासून हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.

कच्चातिवू बेट पुन्हा ताब्यात घेण्यासाठी तामिळनाडू सरकार १९९१ पासूनच जोरदारपणे मागणी करत आहे. भारत सरकारनं कच्चातिवू बेट श्रीलंकेला गिफ्ट करण्याचा मुद्दा असंवैधानिक असल्याचं सिद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते, त्याचवेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी त्यांच्या समक्षकच अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यात कच्चातिवू बेटाचाही मुद्दा होताच. पंतप्रधानांच्या समोरच एमके स्टॅलिन यांनी कच्चातिवू बेट पुन्हा भारताकडे घेण्याची आग्रही मागणी केली. कारण भारतीय मासेमारांना मुक्तपणे या बेटात मासेमारी करता येईल, असं मुख्यमंत्री स्टॅलिन यांचं म्हणणं होतं. दरम्यान, भारत आणि श्रीलंकेत यावरूनच सातत्यानं वाद होत असतो. अशा या वादग्रस्त कच्चातिवू बेटाचा मुद्दा संसदेत काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा तो विषय चर्चेत आणला आहे.




Updated : 14 Aug 2023 5:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top