Home > Max Political > वानखडे यांनी अमरावतीकरांना स्पॅम्प पेपरवर दिले विकासाचे वचन

वानखडे यांनी अमरावतीकरांना स्पॅम्प पेपरवर दिले विकासाचे वचन

वानखडे यांनी अमरावतीकरांना स्पॅम्प पेपरवर दिले विकासाचे वचन
X

महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी अमरावतीतील मतदारांना आगामी पाच वर्षातील विकासाचा आराखडा हा स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे. देशातील वानखडे हे एकमेव उमेदवार असतील ज्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासाचे स्वप्न मतदारांना स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे त्यामुळे या अनोख्या वचननाम्याची मतदार संघात जोरदार चर्चा सुरू आहे.

या संदर्भात बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या काळात घोषणा करायच्या आणि त्या पुन्हा विसरून जायच्या ही राजकीय नेत्यांची परंपरा असल्याने मतदारांना विश्वास देण्यासाठी आपण स्टॅम्प पेपर वर लिहून देण्याचा निर्णय घेतला. कारण मी दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील काम केले आहे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे तरीही लोकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा आणि त्यांना दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी मी सुद्धा कटिबद्ध असले पाहिजे म्हणून मी स्टॅम्प पेपर वर लिहून वचन दिले आहे आणि ते मी पूर्ण करणारच असा दावा वानखडे यांनी केला आहे.

काय आहे स्टॅम्प पेपर मध्ये?

बळवंत वानखडे यांनी लिहून दिलेल्या स्टॅम्प पेपरमध्ये अमरावतीच्या विकासासाठी विविध आठ मुद्द्यांवर वचन दिले आहे.

१) शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडण्यासाठी पहिल्या सहा महिन्यात मी संसदेत आवाज उठवीन आणि कपाशी, चना, सोयाबीन, तूर या पिकांना रास्त हमीभाव मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन.

२) शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतुकीची सुविधा करता यावी, म्हणून पहिल्या सहा महिन्यात मी शेतामधील पानंद रस्ते करण्यासाठी प्रयत्न करीन..

३) अमरावती जिल्ह्यात किमान तीन वस्त्रोद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करीन तसेच अमरावतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या संत्रा फळाच्या प्रक्रिया केंद्राची निर्मिती अचलपूर, मोर्शी आणि चांदुर बाजार या ठिकाणी करून अमरावती जिल्ह्यात किमान 50 हजार रोजगार निर्मिती करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

४) अमरावती जिल्ह्यात उभ्या राहणाऱ्या नवीन उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना 70 टक्के रोजगाराची संधी सातत्याने मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहीन.

५) अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात किमान 100 विद्यार्थी बसू शकतील इतक्या क्षमतेची डिजिटल लायब्ररी पहिल्या सहा महिन्यात सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करीन.

६) अमरावतीतील महिलांना शहरांतर्गत 'आशीर्वाद' बसेस द्वारे मोफत प्रवास करता यावा, यासाठी पहिल्या सहा महिन्यात मी प्रयत्नशील राहीन.

७) अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा हक्क असलेली आरोग्य सुविधा त्याच्यापर्यंत तातडीने पोहोचावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात फिरते प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल, विशेषतः मेळघाट सारख्या दुर्गम भागात तातडीच्या आरोग्य सेवेसाठी ही केंद्रे तातडीने सुरू करण्याचा मी प्रयत्न करीन.

८) या देशाचे मूळ निवासी असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर होणारे अनधिकृत अतिक्रमण रोखून त्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे. बळवंत वानखडे यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेल्या या विकासाच्या वचनाबाबत मतदारसंघांमध्ये जोरदार चर्चा असून मतदारांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे

Updated : 19 April 2024 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top