Home > Max Political > विधानपरिषद निवडणूकीत अकरावी 'विकेट' कुणाची?

विधानपरिषद निवडणूकीत अकरावी 'विकेट' कुणाची?

विधानपरिषद निवडणूकीत मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यातच दहा जागांसाठी राज्यात अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत अकरावी विकेट कुणाची? याचीच चर्चा रंगली आहे.

विधानपरिषद निवडणूकीत अकरावी विकेट कुणाची?
X

राज्यसभा निवडणूकीत सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये भाजपच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला. तर या निवडणूकीत महाविकास आघाडीची दहा मतं फुटल्याने महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात अकरा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणूकीत कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेच्या निवडणूकीची रंगत वाढली आहे. त्यातच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. मात्र काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घेण्यास नकार दिल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली. तर दहा दिवसात ही दुसरी निवडणूक असल्याने भाजप विरुध्द महाविकास आघाडीत चांगलीच चुरस रंगणार आहे. त्यामुळे आता दहाव्या जागेवर कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यसभा निवडणूकीचा परिणाम

राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीपुर्वी भाजपकडे अपेक्षित संख्याबळ नव्हते. मात्र बेरजेचे राजकारण करीत भाजपने या निवडणूकीत बाजी मारली. त्यामध्ये महाविकास आघाडीला पाठींबा देणाऱ्या अपक्षांची मतं फुटले. त्यापाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकीसाठी मतदान सुरू आहे. मात्र या निवडणूकीत महाविकास आघाडीची मतं पुन्हा फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत भाजपचा वरचष्मा राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उमेदवारांची यादी

  • प्रविण दरेकर – भाजप
  • राम शिंदे – भाजप
  • श्रीकांत भारतीय – भाजप
  • उमा खापरे – भाजप
  • प्रसाद लाड – भाजप
  • एकनाथ खडसे- राष्ट्रवादी
  • रामराजे नाईक निंबाळकर- राष्ट्रवादी
  • आमशा पाडवी- शिवसेना
  • सचिन अहिर – शिवसेना
  • चंद्रकांत हंडोरे – काँग्रेस
  • भाई जगताप – काँग्रेस
  • (ऐनवेळी भाजप पुरस्कृत सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत.)
  • विधानपरिषद निवडणूकीचे समीकरण

विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र या निवडणूकीत प्रत्येक पक्षाचे संख्याबळ पाहता भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. मात्र भाजपने पाचवी तर काँग्रेसने दुसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विजयाचे समीकरण

राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषद निवडणूकीसाठीही विधानसभेचे सदस्य मतदान करीत आहेत. त्यामुळे राज्यात भाजपचे 106, राष्ट्रवादीचे 53 आणि शिवसेनेचे 56 ( आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त आहे.) तर काँग्रेसचे 44 आमदार आहेत. मात्र राज्यात अपक्ष आणि विविध छोट्या पक्षांचे 29 इतके संख्याबळ आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीसाठी एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेच्या रिक्त जागा + १ असे समीकरण आहे.

288/10+1 = 26.090 म्हणजेच 27 मतं

विधानपरिषद निवडणूकीत विजयासाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला 27 मतांची आवश्यकता आहे. त्यानुसार भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन जागा निवडून येऊ शकतात. मात्र काँग्रेसची एक जागा निवडून आल्यानंतर काँग्रेसकडे अतिरीक्त 17 मतं शिल्लक आहेत. त्यामुळे काँग्रेसने दुसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपने पाचवा उमेदवार देत लढतीत चुरस निर्माण केली आहे.

महाविकास आघाडी स्थापन होतांना सरकारला 169 आमदारांचा पाठींबा होता. मात्र राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला पाठींबा देणाऱ्या दहा आमदारांनी भाजपला पाठींबा दिला. त्यामुळे आता विधानपरिषद निवडणूकीतही याची पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यसभा निवडणूकीत अपक्षांसह भाजपला 123 आमदारांनी मतदान केले. तर महाविकास आघाडीला 161 आमदारांनी मतदान केले. यावेळी शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत अवैध ठरविण्यात आले. तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने नाकारली. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला.

मात्र राज्यसभा निवडणूकीप्रमाणे जर विधानपरिषद निवडणूकीसाठीही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आज एकूण 285 आमदार मतदान करतील. त्यामुळे हा कोटा 27 वरून 25.91 मतांवर येईल. त्यामुळे भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर शिवसेनेचे दोन उमेदवार आणि राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी 11 मतांची आवश्यकता असेल. त्यामुळे ही लढत काँग्रेसचे भाई जगताप विरुध्द भाजपचे प्रसाद लाड यांच्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीतील फरक

राज्यसभा निवडणूकीत राजकीय पक्ष कुणाला मतदान करायचं याविषयी आपापल्या आमदारांना व्हीप बजावतात. एवढंच नाही मतपत्रिका पक्षाच्या प्रतोदाला दाखवूनच मतदान करावे लागते. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत मतफुटीची शक्यता नसते. कारण जर पक्षाच्या व्हीप प्रमाणे आमदाराने मत दिले नाही तर पक्ष त्या आमदारावर अपात्रतेची कारवाई करू शकतो. मात्र यामध्ये अपक्ष आमदारांना ते कुणाला मत देतात ते कोणत्याही पक्षाच्या प्रतोदाला दाखवण्याची आवश्यकता नसते. जर अपक्ष आमदाराने आपले मत एखाद्या पक्षाच्या प्रतोदाला दाखवले तर ते मत बाद ठरवले जाते.

मात्र विधानपरिषद निवडणूकीत विविध राजकीय पक्षांना तसेच अपक्षांनाही गुप्त मतदान करावे लागते त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत मतफुटीची शक्यता जास्त असते. तर या निवडणूकीत कुणाचं मत फुटलं ते सुध्दा समजणार नसल्याने पक्षाकडून अपात्रतेची कारवाई करण्याची कोणत्याही प्रकारची शक्यता नसते. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत प्रत्येक पक्ष सावधगिरी बाळगतो.

२००८ आणि २०१० ची पुनरावृत्ती होणार का?

राज्य विधानपरिषदेच्या निवडणूकीला धक्कादायक निकालाची परंपरा राहिली आहे. त्यामध्ये 2008 मध्ये काँग्रेसकडे पुरेपुर संख्याबळ असतानाही काँग्रेसचे उमेदवार सुधाकर गणगणे यांचा पराभव झाला. त्यामुळे हा तात्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठा धक्का मानला जात होता. मात्र त्यानंतर 2010 मध्येही काँग्रेसकडे अपेक्षित संख्याबळ नसतानाही काँग्रेसने चौथा उमेदवार उभा केला होता. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार विजय सावंत यांना पहिल्या पसंतीची केवळ 1300 मतं मिळाली होती. तर विजयासाठी 2619 मतांची आवश्यकता होती. मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांवर विजय सावंत यांचा विजय झाला होता. तर अशाच प्रकारे राज्याचे सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब विरुध्द भाजपच्या शोभा फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या लढतीत अनिल परब 2415 मतांसह विजयी झाले होते. तर शोभा फडणवीस यांना 2219 मतांसह पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी चौथा उमेदवार निवडणून आणण्यासाठी केलेली खेळी असो की अनिल परब यांचा विजय अशा प्रकारे राज्याला विधानपरिषद निवडणूकीत धक्कादायक निकालाची परंपरा आहे. त्यामुळे 2008 आणि 2010 प्रमाणेच भाजपचा पाचवा उमेदवार बाजी मारणार की काँग्रेस जागा जिंकण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रसाद लाड विरुध्द भाई जगताप पुन्हा आमने-सामने

यापुर्वीही मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या जागेवर राष्ट्रवादीच्या एका गटाच्या आतून पाठींब्यासह प्रसाद लाड तर काँग्रेसचे भाई जगताप आमने-सामने होते. त्यामध्ये शरद पवार यांच्या दरडावण्याने राष्ट्रवादीच्या आमदारांनी ऐनवेळी भुमिका बदलली आणि त्या निवडणूकीत प्रसाद लाड यांचा पराभव झाला होता तर भाई जगताप विजयी झाले होते. मात्र त्यानंतर लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर आता पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणूकीच्या निमीत्ताने भाई जगताप विरुध्द प्रसाद लाड आमने-सामने आले आहेत. त्यामुळे यावेळी प्रसाद लाड यांचा पराभव झाला तर तो देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार असली तरी यामध्ये भाई जगताप बाजी मारणार की प्रसाद लाड? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे मुख्य लक्ष एकनाथ खडसे?

एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने राज्यपाल नामनिर्देशित जागांमध्ये एकनाथ खडसे यांचा समावेश केला होता. मात्र दोन वर्षानंतरही यावर निर्णय न झाल्याने एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच ही यादी अडकून ठेवण्यामागे भाजपचा हात असल्याची टीका सत्ताधारी पक्षाकडून केली जात आहे. तर राज्यपालांच्या आडून भाजपने खडसे यांचा मार्ग रोखला होता. मात्र आता राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याने खडसे यांना विधानपरिषदेचा मार्ग सुकर झाला आहे. परंतू एकनाथ खडसे यांचा पराभव करण्यासाठी भाजप रणनिती आखण्याची शक्यता मानली जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्या जाणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांमुळे एकनाथ खडसे यांचा पराभव करण्याची संधी भाजपकडून साधली जाण्याची शक्यता आहे. मात्र एकनाथ खडसे यांचा पराभव झाल्यास तो शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का असेल. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या विजयासाठी शरद पवार यांच्याकडून सावधगिरी बाळगली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आज दिवसभर झालेल्या मतदानानंतर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत कुणाची विकेट पडणार आणि कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप, भाजपचे प्रसाद लाड की राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांपैकी कुणाची विकेट जाणार आणि कोणाचा मार्ग विधानपरिषदेत पोहचणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Updated : 20 Jun 2022 4:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top