Home > Max Political > हाच का मॅग्नेटीक महाराष्ट्र? रवींद्र आंबेकर

हाच का मॅग्नेटीक महाराष्ट्र? रवींद्र आंबेकर

देशातील हिंदू सातत्याने संकटात का येतोय. नरेंद्र मोदी यांना संपूर्ण बहुमताची सत्ता मिळालेली आहे. अशा वेळी सातत्याने निवडणुकांच्या वेळीच हिंदू संकटात का सापडतोय. खरं तर उत्तर प्रदेश मधील ओपिनियन पोल चे निकाल पाहता भाजपा संकटात आहे, अशा वेळी देशात हिंदू संकटात असल्याची भावना निर्माण करून मतांचं राजकारण करण्याचा डाव आहे. या डावासाठी महाराष्ट्राला प्रयोगशाळा बनवू नका.

हाच का मॅग्नेटीक महाराष्ट्र? रवींद्र आंबेकर
X

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी राज्याला एका वेगळ्या उंचीवर न्यायचं स्वप्न त्यांनी बोलून दाखवलं. राज्यात नवीन उद्योग-धंदे यायला पाहिजेत, नवीन रोजगार निर्माण व्हायला पाहिजेत. यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याच्या जाहिराती आपण सर्वत्र पाहिल्या. मेक इन इंडियासाठी त्यांनी मोठमोठे इवेन्ट केले. याच गोष्टींमुळे पाच वर्षे सरकार चालवण्याचा बहुमानही त्यांना मिळाला. देवेंद्र फडणवीस राज्यातील शरद पवारांनंतर क्रमांक दोन चे शक्तीशाली नेते झाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मॅग्नेटीक महाराष्ट्र ची संकल्पना व्हायब्रंट गुजरात च्या तोडीची होती. म्हणून पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस हे देशाचं ही नेतृत्व करू शकतील असं म्हटलं जात होतं. पण राज्यातील नव्याने तयार झालेली राजकीय परिस्थितीमुळे फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याची संधी हुकली आणि त्यांचं राजकारण एका वेगळ्या वळणावर गेलं.

शिवसेनेशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनी विकासाची भाषा सोडत हिंदुत्वाची भाषा अंगिकारली. राजकारण धार्मिक वळणावर नेलं की, पुढचा मार्ग लवकर प्रशस्त होतो, त्यामुळे हा शॉर्टकट देवेंद्र फडणवीस यांनी अंगिकारला. राज्यात कोविड काळातही फडणवीस यांनी मंदिरं खुली करण्याचं आंदोलन पुकारलं आणि हिंदूंच्या भावनांना हात घातला. कोविडमुळे हिंदू आजारी पडणार नाहीत की मरणार नाहीत. अशी शाश्वती घ्यायला फडणवीस तयार नव्हते, ती जबाबदारी राज्य सरकारची पण मंदिरं खुली करा. अशी ही विचित्र मागणी होती. त्यानंतर आता राज्यातील काही ठिकाणी दंगलींपर्यंत हा प्रवास आला आहे.

रझा अकादमी सारखी संपलेली संघटना अचानक पुन्हा पिक्चर मध्ये आली, ही संघटना भाजपचं पिल्लू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या शिवसेनेने भाजप सोबत अनेक वर्षे संसार केला आहे, त्यामुळे त्यांना या सर्वांची आतली माहिती असणारच. राज्यात अशांतता प्रस्थापित करण्यामागे भाजपची भूमिका आता स्पष्ट दिसत आहे. अशा परिस्थितीत आता सरकारने नरमाईची भूमिका घेतली तर येणाऱ्या काळात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. रझा अकादमी सारख्या संस्थांवर कडक कारवाई करतानाच त्यांच्या मास्टरमाइंड वर ही कारवाई व्हायला हवी.

अमरावती, नांदेड, मालेगाव ही औद्योगिक शहरं आहेत. या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. ग्रामीण भागातील लोकांसाठी अशी शहरं मुंबई-पुण्यापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे अशा शहरांमध्ये अशांतता निर्माण झाली तर त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो.

गुजरातची दंगल जवळून कव्हर करताना या दंगलींचा प्रभाव अहमदाबाद-सूरत-बडोद्यामध्येच का होता? याचं प्रभावी विश्लेषण जॉर्ड फर्नांडीस यांनी केले होते. उद्योगासाठी स्थलांतरीत मजूर मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये असतो, बंद आणि दंगलसदृश्य परिस्थितीमुळे रोजगार प्रभावित होतो आणि हिंसक भावना लवकर भडकते. असं त्यांचे विश्लेषण होते. भाजपची सर्व आंदोलने ही राज्यातील औद्योगिक शहरांची शांतता भंग करण्याच्या दृष्टीने होताना दिसतायत. या गोष्टींचे दूरगामी परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मॅग्नेटीक महाराष्ट्र चं तुमचं स्वप्न तुम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणून रांगोळी विस्कटल्यासारखं जर तुमचा पक्ष विस्कटणार असेल तर तो महाराष्ट्राशी द्रोह ठरणार नाही का? राहिला प्रश्न हिंदू धोक्यात असल्याचा. ४० हजार मुस्लीम रस्त्यावर उतरतात आणि त्या मोर्चामध्ये हिंसा होते. याचं उत्तर प्रतिहिंसा करून देणार आहात का? देशातील हिंदू सातत्याने संकटात का येतोय. नरेंद्र मोदी यांना संपूर्ण बहुमताची सत्ता मिळालेली आहे. अशा वेळी सातत्याने निवडणुकांच्या वेळीच हिंदू संकटात का सापडतोय. खरं तर उत्तर प्रदेश मधील ओपिनियन पोल चे निकाल पाहता भाजपा संकटात आहे, अशा वेळी देशात हिंदू संकटात असल्याची भावना निर्माण करून मतांचं राजकारण करण्याचा डाव आहे. या डावासाठी महाराष्ट्राला प्रयोगशाळा बनवू नका. हे राज्य मॅग्नेटीक आहे, ते मॅग्नेटीकच राहू द्या.

Updated : 13 Nov 2021 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top