Home > Max Political > स्टॉकहोम सिंड्रोम, दरेकर आणि सरनाईक

स्टॉकहोम सिंड्रोम, दरेकर आणि सरनाईक

राज्यातील जनतेला मसीहा, दयाळू वाटणारे लोक खरंच तसे असतात का? चोऱ्या, घोटाळे करुन हे लोक मसीहा कसे होतात? हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की वाचा मधुकर डुबे यांचा स्टॉकहोम सिंड्रोम, दरेकर आणि सरनाईक हा लेख

स्टॉकहोम सिंड्रोम, दरेकर आणि सरनाईक
X

स्टॉकहोम सिंड्रोम हा शब्द पहिल्यांदा १९७३ मध्ये स्टॉकहोम, स्वीडन मधील बँकेच्या लुटीच्या केसमध्ये वापरला गेला. बँकेची लूट केल्यानंतर गुन्हेगारांनी बँकेतील काही लोकांना आपल्या ताब्यात, ओलीस ठेवले आणि त्यांना सोडण्याच्या बदल्यात गुन्हेगारांना सुरक्षित सोडून देण्यात यावे अशी मागणी केली.

स्वतःची सुटका व्हावी म्हणून गुन्हेगारांनी ताब्यात ठेवलेल्या लोकांना जरा चांगली वागणूक दिली. ह्या निरपराध लोकांनी असा विचार केला की, हे गुन्हेगार आपल्याला जीवे मारू शकत होते, पण ते आपल्याशी चांगले वागत आहेत. याचा परिणाम असा झाला की, हे ओलीस ठेवले गेलेले लोक गुन्हेगार कसे चांगले आहेत, हे पोलिसांना आणि जनतेला पटवून देऊ लागले.

अर्थात हे अतिशय अविचारी आणि अविवेकी होते. कारण गुन्हेगाराने फक्त त्यांना जीवदान देण्याचे कबूल केले होते. त्यापूर्वी त्यांनी किती गुन्हे केले आहेत, सोडले गेल्यावर ते किती बँका लुटतील, आणि किती जणांना कंठस्नान घालतील, याचा विचार केला नव्हता.

अतिशय स्वार्थी बुद्धीने ते गुन्हेगारांची बाजू घेत होते.

पण आपल्यापेक्षा अतिशय प्रबळ, शक्तिमान आणि प्रभावी व्यक्तीने आपल्याला आश्रय दिल्याचे नाटक केले अथवा संरक्षण देऊ केले तर आपण त्याला शरण जाऊन त्याची टिमकी वाजवायला सुरुवात करतो....

हाच तो स्टॉकहोम सिंड्रोम.

हा काही अजून मानसिक विकार म्हणून मान्यता पावला नाही, कारण तो काही कायमचा नसतो आणि फक्त स्वार्थावर अवलंबून असतो. आता आपण प्रवीण दरेकर यांची भानगड बघू. त्यांच्यावर मुंबै सहकारी बँकेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे त्यांना तात्पुरते संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे त्यांना भाजप, मोदी आणि शहा हे अतिशय महान वाटत आहेत. आणि दरेकर निर्दोष नसले तरी त्यांना स्टॉकहोम सिंड्रोमने घेरले आहे. ते म्हटले तर ओलीसच आहेत.

आता ओलीस जाण्याची पाळी आली आहे, प्रताप सरनाईक यांच्यावर असे दिसते. त्यामुळे ते भाजपशी मिळतेजुळते घ्या असा सल्ला थेट त्यांच्या नेत्यांना जाहीरपणे देत आहेत. शिवसेनेत हे प्रथमच घडत आहे.

यातून दोन गोष्टी दिसतात:

१. सरनाईक यांचा गुन्हा, घोटाळा फारच मोठा असावा आणि त्यांना तुरुंगवास स्पष्ट दिसत असावा अथवा तशी धमकी दिली गेली असावी.

२. अशा प्रकारचे पत्र हे कोणीतरी त्यांच्याकडून लिहून घेतले असावे, कारण सेनेमध्ये असे बंड सहसा कोणी करत नाही.

या संपूर्ण प्रकरणाचा स्टॉकहोम सिंड्रोमशी तसा जास्त संबंध नाही, पण आश्रयदात्या गुन्हेगारालाच त्राता समजणे एव्हढा मात्र नक्कीच आहे.

इथे आश्रयदाते गुन्हेगार आहेत की नाही हा वेगळा भाग, पण ते गुन्हेगारांना उदार मनाने आश्रय देतात, हे नक्कीच आहे. आणि ओलीस जाणारे मात्र गुन्हेगार आहेत, ते निरपराध नक्की नाहीत.

Updated : 23 Jun 2021 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top