Home > Max Political > मोदींनी केले तर टाळ्या आणि थाळ्या, मग महाराष्ट्रात लॉकडाऊनला विरोध का?- सामना

मोदींनी केले तर टाळ्या आणि थाळ्या, मग महाराष्ट्रात लॉकडाऊनला विरोध का?- सामना

राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भाजपने याला विरोध केला आहे. यावरुन शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला काही सवाल विचारण्यात आले आहेत.

मोदींनी केले तर टाळ्या आणि थाळ्या, मग महाराष्ट्रात लॉकडाऊनला विरोध का?- सामना
X

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी? असा सवाल सामनामधून विचारण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लॉकडाऊनला विरोध केला आहे. पण फडणवीस यांनी लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय सांगावा असे आव्हान सामनामधून देण्यात आले आहे.

15 एप्रिलनंतर राज्याची कोरोना स्थिती गंभीर होईल असे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेच जेव्हा सांगतात तेव्हा त्याचे गांभीर्य विरोधी पक्षाने समजून घेतले तर बरे होईल. 'अर्थचक्र की अनर्थचक्र?' यावर तत्काळ निर्णय घ्यायलाच हवा. लोकांना समजावण्याचे काम जसे सरकार पक्षाचे आहे तसे विरोधी पक्षाचेही आहे. केंद्र सरकारला जबाबदारी झटकता येणार नाही, पळ काढता येणार नाही. राज्यातील विरोधी पक्षाने दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची ही बाजू भक्कमपणे मांडली तर राज्यहिताचे श्रेय त्यांनाच मिळेल व लॉक डाऊन झाले तरी जनतेला दिलासा देता येईल.

कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असेल तर लॉक डाऊनशिवाय पर्याय नाही. आता त्याऐवजी दुसरा काही पर्याय असेल तर श्री. फडणवीस यांनी सांगावे. नोटाबंदी, लॉक डाऊन या विषयाची ओळख पंतप्रधान मोदी यांनी देशाला करून दिली आहे. भ्रष्टाचाराची साखळी तुटावी म्हणून नोटाबंदी व कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी म्हणून मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा एक वर्षापूर्वी केली होती तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी त्या निर्णयाचे थाळय़ा वाजवून स्वागत केले. आज कोरोनाची परिस्थिती आधीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठेवले तर जनतेवर उपकार होतील. बाजूच्या गुजरात राज्यात परिस्थिती गंभीर आहे, तेथे कोरोना आटोक्यात आला असे नाही. उलट सुरत, अहमदाबादेत कोरोनाचे रुग्ण रस्त्यावर, फुटपाथवर पडेपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हे या गंभीर परिस्थितीतही लॉक डाऊन लावायला तयार नाहीत. कारण व्यापारी मंडळींचे नुकसान होईल. व्यापाऱयांचा पक्ष फक्त व्यापाऱयांचाच विचार करीत असेल तर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही.

Updated : 12 April 2021 3:07 AM GMT
Next Story
Share it
Top