Home > Max Political > केंद्राचे नवे 'सहकार खाते' म्हणजे राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण – शिवसेना

केंद्राचे नवे 'सहकार खाते' म्हणजे राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण – शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेनेने सामनामधून जोरदार टीका केली आहे, एवढेच नाही तर पंकजा मुंडे यांच्याबाबतीत तर शिवसेनेने भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

केंद्राचे नवे सहकार खाते म्हणजे राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण – शिवसेना
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. या विस्ताराआधी केंद्र नवीन अशा सहकार खात्याची घोषणा केली. 'सहकार' क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्राच्या विकासासाठी हे खाते निर्माण केले गेल्याचे सांगितल जाते आहे. पण हे सहकार खाते राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. सामनामधील अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. काय म्हटले यामध्ये ते पाहूया...

"केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आताच्या विस्ताराआधी केंद्र सरकारने एक 'सहकार खाते' निर्माण केले. 'सहकार' हा तसा राज्याच्या अखत्यारीतला विषय, पण आता 'केंद्र' त्यावर अतिक्रमण करीत असल्याचा आरोप होत आहे. तसे होऊ नये आणि संघराज्यरचनेवर हा आघात ठरू नये. अर्थात सध्या हम करे सो कायदा व अधिकारावरील अतिक्रमणाचा जमाना अवतरला आहे. त्यामुळे करणार काय? केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देऊन मागील पानावरून पुढे जाणे इतकेच आपल्या हाती आहे.

या मंत्रिमंडळ फेरबदलाचे वैशिष्टय़ काय? तर वाजपेयी काळातील एक राजनाथ सिंग व मुख्तार अब्बास नकवी हे दोन सोडले तर बाकी सर्व पत्ते नवेच आहेत. एक तर नव्या मंत्रिमंडळातील बरेचसे सदस्य हे मूळ भाजप किंवा संघपरिवाराचे नसून लाटेबरोबर वाहून किनाऱ्यावर लागलेले ओंडकेच आहेत.

"अर्थमंत्री- परराष्ट्र मंत्र्यांना घरी का पाठवले नाही?"

मंत्रिमंडळ विस्तारास 'मेगा सर्जरी'ची उपमा दिली आहे. ही खरोखरच सर्जरी असती तर अर्थमंत्री व विदेश मंत्र्यांना सगळय़ात आधी घरी पाठवले गेले असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा, परराष्ट्र व्यवहार नीतीचा आज जो बोजवारा उडाला आहे तो तसा याआधी कधीच उडाला नव्हता, पण पंतप्रधानांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला व त्यांच्या जागी गुजरातचे मनसुख मांडवीय यांची नेमणूक केली. हर्षवर्धन यांच्या काळात महामारीचा उद्रेक झाला व लोकांच्या प्रेतांचे खच पडले हे खरे, पण याबाबतीत मेणबत्त्या पेटवून, थाळय़ा वाजवून कोरोना पळवा असे सांगण्यापर्यंतचे निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतले नव्हते. मनसुख मांडवीय हे तरुण व अधिक कार्यक्षम आहेत. आधीच्या जहाज बांधणी मंत्रालयात त्यांचे काम चांगले होते. ज्येष्ठ मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांना वगळणे आहे. त्या दोघांनाही धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो इतकीच प्रार्थना आपण करू शकतो.

पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांना दिले. श्री. गोयल यांना हा धक्काच आहे. चायपेक्षा अनेकांच्या किटल्या गरम झाल्या होत्या. त्या किटल्यांना थंड करण्याचाच हा प्रकार आहे. स्मृती इराणी यांचे महत्त्व कमी केले असे दिसते.

नारायण राणेंना चिमटे

नारायण राणे यांना लघु व मध्यम उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही. राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल.

"पंकजा मुडेंना संपण्याचा डाव"

श्री. भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. कपिल पाटील, डॉ. भारती पवार हे दोन राज्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रातील निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. कपिल पाटील व भारती पवार हे कालच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले व आता मंत्री झाले. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे."

या शब्दात शिवसेनेने सामनामधून टीका केली आहे.

Updated : 9 July 2021 12:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top