Home > Max Political > समीर वानखेडे यांचा सत्कार, शिवप्रतिष्ठानवर कारवाईची मागणी

समीर वानखेडे यांचा सत्कार, शिवप्रतिष्ठानवर कारवाईची मागणी

समीर वानखेडे यांचा सत्कार, शिवप्रतिष्ठानवर कारवाईची मागणी
X

NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. तर आर्यन खान प्रकरणातील साक्षीदाराने खंडणी वसुलीचा आरोप केल्यानंतर समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. या दरम्यान शिवप्रतिष्ठान संघटनेने समीर वानखेडे यांचा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सत्कार केला आहे. तसंच त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली. शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह वानखेडे यांचा सत्कार केला. समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागे उभं राहायला हवं, असे म्हणत नवाब मलिक यांच्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणीही शिवप्रतिष्ठानने केली आहे.




दरम्यान शिवप्रतिष्ठानच्या कृत्यावर आरपीआयच्या खरात गटाचे सचिन खरात यांनी आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र हे फुले, शाहू, आंबेडकर यांचे राज्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे प्रशासनाला आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला जात, धर्म, लिंगभेद, वर्णभेद नसतो. समीर वानखेडे हे विशिष्ट धर्मीय आहेत म्हणून कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करणे चुकीचे आहे, राज्य सरकारने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. एकूणच आता समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक प्रकरणाला धार्मिक रंग येऊ लागल्याचे दिसते आहे, कारण समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या आहेत.

Updated : 3 Nov 2021 7:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top