Home > Max Political > इस्लामपूरच्या नामांतराचे राजकारण

इस्लामपूरच्या नामांतराचे राजकारण

शहरांच्या नामकरणावरुन अनेकदा राजकारण होत असल्याचे दिसून येते. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर देखील याला अपवाद ठरले नाही. नामांतर आणि विकासकामांचा धांडोळा घेत आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी घेतलेला आढावा...

इस्लामपूरच्या नामांतराचे राजकारण
X


गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील उरुण-इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे करावे अशी मागणी काही हिंदुत्त्ववादी संघटनांनी केलेली आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान तसेच भाजप व शिवसेना या पक्षांनी देखील या मागणीसाठी जोर लावलेला आहे. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेने जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या निवेदनात त्यांची खालील भूमिका मांडलेली आहे." परकीय आक्रमकांच्या नावाने असलेल्या शहरातील परकियांच्या खुणा मिटल्या पाहिजेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरचे ईश्वरापूर असे नामांतर केलेले होते. यानुसार या शहराचे नाव बदलून ईश्वरपूर असे करण्यात यावे."

या नामांतराला वंचित बहुजन आघाडी तसेच एम आय एम या पक्षांनी तीव्र विरोध केला आहे यासंदर्भात इस्लामपूर शहराचे रहिवासी असलेले वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाकीर तांबोळी आपली भूमिका ...महाराष्ट्रकडे व्यक्त करतात.





जे नाव शिवसेना देऊ पाहत आहे त्याला कुठलाही संदर्भ नाही. हे नाव शहरवासीयांवर लादून अल्पसंख्यांकावर दबाव ठेवण्याचे काम हे करत आहेत. शिवसेना महा विकास आघाडी सरकारसोबत गेल्यानंतर थोडासा बदल जाणवला होता. पण इस्लामपूर येथील शिवसेना हि भाजप आणि आर एस एस सोबत असल्यामुळे त्यांचा मूळ गुणधर्म यानिमित्ताने समोर आलेला आहे. नाम बदलनेसे शहर कि तसबीर तो नाही बदलेगी. औरंगाबादचे शिवसेना नामांतर करण्याच्या नावावर शिवसेनेने सत्ता भोगली तसेच राज्यातील सत्तेत देखील तीन वर्षे असतानाही शिवसेनेला नाव बदलने शक्य झालेले नाही. शहराच्या विकासात फारसे योगदान न देताना मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटविण्यासाठी नामांतराचा मुद्दा पुढे केला गेलेला आहे.

यासंदर्भात इतिहास व संस्कृतीचे अभ्यासक प्रा सचिन गरुड यांनी खालील अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले आहेत .

१) नामांतराची भूमिका हिंदू-ब्राह्मणी जमातवादी इतिहासदृष्टीवर आधारित

देशात हिंदुत्त्ववादी पक्षाची सत्ता प्रस्थापित होताच मध्ययुगातील मुस्लीम राजवटीत विकसित झालेल्या आणि अरबी-फारशी नावे दिलेल्या उत्तर भारतातील अनेक शहर व गावांची पूर्वीची ती नावे बदलून नवी संस्कृत हिंदू वाटणारी नवे देण्याचा अजेंडा भाजपप्रणीत सरकारने अमंलात आणण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारात शिवसेनेसारखा हिंदुत्त्ववादी पक्ष आहे. आणि या पक्षाचीही मुस्लीम राजवटीतील ऐतिहासिक नावे बदलून हिंदू नावे देण्याची भूमिका राहिली आहे. हिंदुत्त्ववादी पक्ष-संघटनांची अशी नामांतराची भूमिका हिंदू-ब्राह्मणी जमातवादी इतिहासदृष्टीवर आधारित आहे. या पक्ष-संघटनांचे असे म्हणणे आहे की, मुसलमान हे परकीय असून त्यांनी जबरदस्तीने सत्ता गाजवत ही त्यांची धार्मिक ओळखीची नावे, प्रतीके, चिन्हे लादली आहेत. त्यामुळे आक्रमकतेने व जबरदस्तीने इतिहासातील नावे, प्रतीके, चिन्हे वर्तमानकाळात बदलून त्याजागी बहुसंख्याक हिंदू संस्कृतीची नावे, प्रतीके, चिन्हे प्रस्थापित करणे हे महत्त्वाचे आहे. यातून आपली तथाकथित सांस्कृतिक अस्मिता जोपासली जाते.





२) समाजात विद्वेष पसरून राजकीय सत्ता मिळवण्याचा डाव

हिंदुत्त्ववादी शक्तींच्या मुस्लीम व तत्सम धर्मजातीविरोधाच्या या सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणामागे धार्मिक जमातवादी ध्रुवीकरण करून समाजात विद्वेष पसरून राजकीय सत्ता मिळवण्याचा डाव आहे, शहरातील शांतता आणि सामंजस्याचे वातावरण बिघडण्याचा त्यांचा प्रयत्न समाजाने मोडीत काढावे अशी भूमिका या नामांतराला विरोध करणाऱ्या पक्ष-संघटनांनी घेतली आहे. शहराचे नाव आक्रमकाचे नसून समता, शांती आणि धर्म-जाती समन्वयाची प्रक्रियेतून आले आहे. असा ऐतिहासिक दाखलाही त्याजोडीला दिला जात आहे.

३) नामांतरास विरोध करणाऱ्या पक्ष-संघटनांच्या म्हणण्यात काही तथ्य आहे हे मान्य करावे लागेल

इस्लामपुरात हिंदू जातीजमातीबरोबर मुस्लिमही सामंजस्याने राहत आहेत. देशात अनेकदा विविध ठिकाणी जमातवादी दंगे झाले तरी इस्लामपूर मध्ये कधीही असे जमातवादी दंगे व हिंसा घडून आलेली नाही. हिंदुत्त्ववादी शक्तींची नामांतरे करण्याची भूमिका चुकीच्या आणि ब्राह्मणवादी वर्चस्वाच्या धारणांवर आधारलेली आहे. औरंगाबादचे नामांतर त्यांना संभाजीनगर असे करायचे आहे, पण ऐतिहासिकदृष्ट्या औरंगाबादच्या विकासात छत्रपती संभाजी महाराजांऐवजी निजामशाहीचा वजीर व मराठ्यांच्या राजनीतीचा उद्गाता मलिक अंबर यांच्या नावाने हे नामांतर करण्यास त्यांचा विरोध आहे. कारण सरसकट मुस्लीमविरोध आहे. अनेक शहर व गावांची नामांतरे संस्कृत नावाने केली आहेत. जी संस्कृत भाषा फक्त ब्राह्मण पुरुषांनाच शिकण्याची मुभा होती. स्त्रिया व ब्राह्मणेतर जातींना ती शिकण्यास बंदी होती. अनेक शहरे व गावे मध्ययुगात मुसलमानी राजवटीत उदयाला येवून विकसित झाली. अनेक शहर व गावांची सांस्कृतिक जडणघडण मुस्लीम सुफी परंपरेने झाली. हिंदुधर्मातील जातीय शोषणाला कंटाळून अनेक जातीजमातीतील स्त्री-पुरुषांनी मुस्लीम धर्माचा स्वीकार केला. या वस्तुस्थितीकडे हिंदुत्त्ववादी हेतुत: दुर्लक्ष करत असल्याचे सांगत त्यांनी इस्लामपूर शहराच्या नावाविषयीचा ऐतिहासिक संदर्भच स्पष्ट केला .

४) इस्लामपूर नावाचा इतिहास

मुळात इस्लामपूर हे शहराचे नाव जबरदस्तीने दिलेले नसून ते इस्लाम धर्मवाचक असले तरी एका धर्माचे वा समाजगटाचे वर्चस्वाच्या हेतूने आलेले नाही. ते सुफी संप्रदायाच्या सर्व जाती समन्वयाच्या आधाराचे नाव आहे. हिंदू धर्मातील जातीय विषमता आणि स्त्री शोषण यांना नाकारण्यासाठी हा विधायकपणे इस्लाम धर्मातील मुल्यांचा स्वीकार होता. उत्तर मध्ययुगीन काळात उरुण या जुन्या गावाशेजारीच आदिलशहाच्या राजवटीत हे नगर बसवले गेले. आदिलशाहीतील इब्राहीम दुसरा या बादशाहने मराठी भाषा व साहित्य कला संस्कृतीचा मोठा विकास केला. त्याच्या काळात या भागात सुफी संप्रदायाचा मोठा प्रसार झाला. शिवाजी राजे, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांनीही सुफी संप्रदायाला पाठींबा दिला. केलशीचे बाबा याकूत हे सुफी संत छत्रपती शिवाजी महारांजाचे एक गुरु होते. मराठ्यांच्या स्वराज्याच्या काळात कोणत्याही मुस्लीम स्थळाचे नाव बदलले गेले नाही. शिवाजी राजे, संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्या काळातही इस्लामपूर हे नाव तसेच ठेवले गेले. इंग्रजांनीही हे नाव बदलण्याचा चुकीचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या काळात इथे ख्रिश्चन धर्माची चळवळ उभी राहिली. कोल्हापूर, मिरज येथील ख्रिस्ती धर्माच्या मिशनरी मोहिमेचा भाग म्हणून इस्लामपूरला एकोणिसाव्या शतकात ग्रेस मेमोरियल चर्च बांधण्यात आले. येथील दलितांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. राजर्षी शाहू महाराजांचा आणि कोल्हापूर, मिरज, इस्लामपूरच्या ख्रिस्ती धर्माच्या मिशनरीशी जिव्हाळ्याचा संबंध होता. शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभाव व सहिष्णुतेचा वारसा पुढे चालू ठेवला. त्यांनी कुराणचे मराठीत भाषांतर केले. जाती नष्ट करण्याच्या चळवळीला गती दिली. इस्लामपूर हे शहर आणि येथील धर्मांतर कधीही जबरदस्तीने लादण्यात आलेले नाही. हिंदू धर्मातील अस्पृश्यता, जातीय भेद व शोषण याविरोधात येथील जनतेने मुसलमान व ख्रिश्चन होणे पसंद केले आहे.

५) इस्लामपूर शहराला सुफी पिरांच्या धर्म समन्वयवादी परंपरेचा इतिहास

इस्लामपूर या शहराला बूवाफन- संभूआप्पा आणि राजेबागेश्वर या महान सुफी पिरांच्या धर्म समन्वयवादी तत्त्वांचा ऐतिहासिक वारसा आहे. बूवाफन ह्या मालगावच्या खालच्या जातीच्या मुस्लिम संताचा शिष्य संभू आप्पा ही कनिष्ठ जातीचा होता. त्याने उरूण इस्लामपूर परिसरात जातधर्म भेदभावाच्या विरोधात सर्व समाजात समतेची शिकवण दिली. त्यामुळे इस्लामपूर ला आजही बुवाफन संभुआप्पा यांचा उरूस भरतो. राजेबागेश्वर पिराचाही असाच उरूस येथे साजरा केला जातो. त्यात सर्व जातधर्मीय सहभागी असतात. इस्लामपूरच्या जवळ कामेरी या गावात मशीद आणि मंदिर एकाच भिंतीच्या आधाराने अगदी शेजारी-शेजारी उभे आहे. गोटखिंडी या गावात मशिदीच्या आवारात गणपती उत्सव साजरा होतो. मुसलमानही या उत्सवात सहभागी होतात. हा सर्व परिसर धर्म समन्वयवादी तत्त्वांच्या इतिहासाचा आहे.





६) नामांतरच करायचे असल्यास क्रांती सिंहाच्या संघर्षाच्या भूमीला क्रांतीसिंहांचे नाव द्यावे.

समजा इस्लामपूरचे नामांतर करायचे झाल्यास ईश्वरपूर हे संस्कृत नाव देण्यामागे कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही. याऐवजी या नगरला क्रांतिसिंह नाना पाटील नगर किंवा प्रतिसरकार नगर असे नामकरण करणे जास्त उचित ठरेल. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संघर्षाची इस्लामपूर ही रणभूमी राहिली आहे. त्याकाळात आणि आताही नाना पाटील यांची प्रचंड उपेक्षा केली जात आहे. जगात ज्या ब्रिटीश साम्राज्याच्या भूमीवर सूर्य मावळत नव्हता , त्या साम्राज्यशाहीला आव्हान देवून नाना पाटील यांनी या भागात प्रतिसरकार स्थापन केले. त्यांच्या ऐतिहासिक कृतीमुळे वाळवा –इस्लामपूरचे जगभर नाव झाले.अश्या नाना पाटलांचे नाव दिले तर या शहराचाच सन्मान होईल.

या नामांतराच्यामागे राजकीय पार्श्वभूमी आहे का हे पाहणे देखील महत्वाचे आहे. इस्लामपूरच्या राजकारणावर विद्यमान मंत्री आ. जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव आहे. आणि शहराचा नगराध्यक्ष भाजपचा आहे. जयंत पाटील यांचे हिंदुत्त्ववादी भिडे यांच्या संघटनेशी जवळचे संबध राहिले आहे. त्यांना कोंडीत पकडून आपले राजकारण पुढे रेटण्याची सेना-भाजपच्या विरोधकांची ह्या नामांतराच्या राजकारणाची खेळी आहे. आणि निवडणुका जवळ आल्याने हा नामांतराचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. राज्यपातळीवर सेनेची सत्ता असली तरी या मागणीकडे वरिष्ठ स्तराहून दाखल घेतली जात नाही, हे स्पष्टच आहे. परंतु नामांतराच्या या मागणीने धार्मिक विद्वेषाचे राजकारण पसरून शहरातील शांतता आणि सामंजस्य बिघडू शकते. याची काही नागरिकांना चिंता वाटत आहे.

या संदर्भात इस्लामपूर येथील दिग्विजय पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते सांगतात "सम्भूआप्पा बुवाफन हे देवस्थान हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक आहे. देशाच्या अनेक भागात आजपर्यंत अनेक धार्मिक दंगली आणि हिंसाचार झाला पण इस्लामपूर शहरात मुस्लीम बहुल भाग असूनही आजपर्यंत हिंसा झालेली नाही. हा या शहराचा इतिहास आहे. आता हिंदुत्ववादी शक्तीना दुसर्या धर्माला द्वितीय स्थान द्यायच्या उद्दशाने इस्लामपूर मधील नावाला आक्षेप आहे. पण हे वास्तवाला धरून नाही गावांच्या नावाला शतकांचा इतिहास असतो. हा बदलण्यामागे मतांचे राजकारण देखील आहे. तरुणांना पुढे करून संघी अजेंडा राबवन्याचा हा प्रकार आहे. त्यांच इस्लामपूर का ? आपल ईश्वरपूर का असू नये अशा प्रकारे तरुणांची माथी भडकविण्याचा प्रकार सुरु आहे. विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून सत्तेची गणिते जुळविण्यासाठी नामांतराचा मुद्दा समोर केला जात आहे. इस्लामपूरकराना सरकारी आरोग्याच्या सुविधांचा अभाव आहे, सांडपाणी अंतर्गत गटारी, हवाप्रदूषण, साथरोग, चांगले रस्ते, कचरा व्यवस्थापन हे प्रश्न आहेत. नेत्यांनी हे प्रश्न सोडविण्याऐवजी उथळ भावनांचे, प्रतीकांचे राजकारण करायचं आणि लोकाना दोन्ही बाजूनी उल्लू बनवायचं हे काम सुरु आहे."


उरुण इस्लामपूर नगर परिषदेचे नामांतर ईश्वरपूर करनेसंदर्भात आम्ही येथील नागरिक अमोल कांबळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले " आपल्या शहराची लोकसंख्या अंदाजे एक लाख आहे. या सर्व नागरिकांच्या यातील मतदारांच्या मतदार कार्ड, आधार कार्ड, pAN कार्ड,यावर उरण इस्लामपूर अशीच नोंद आहे. एवढेच नव्हे तर परदेशात राहणाऱ्या नागरिकांच्या पासपोर्टवर सुद्धा हाच पत्ता आहे. आज आधार कार्डावरील पत्ता बदलायचा असल्यास आधार केंद्रावर जाऊन बोटाचे ठसे देऊन पता बदलावा लागेल. यासाठी प्रशासकीय वेळ लोकांचा पैसा खर्च होईल. यासाठी फॉर्म भरणे, रांगेत उभे राहणे हा शारीरिक मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागणार आहे. परदेशातील नागरिकांच्या पासपोर्ट मधील बदलामुळे त्यांना देखील नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. यासोबतच या शहरातील व्यापार्याना त्यांचे शिक्के तसेच जी एस टी रजिस्ट्रेशन वरील पत्ते सुद्धा बदलावे लागतील. हा सर्व विचार करून नामांतारापेक्षा जनतेच्या विकासाच्या मुद्द्यांवर काम करून समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

इस्लामपूर शहरातील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. भूमिगत गटार व्यवस्था नसल्याने अनेकदा साथीच्या रोगाने रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात येते. नागरी सुव्यवस्थे बाबतीत शहराचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीवर आहे. या नागरी सुविधांच्या मुद्द्यावर विधायक राजकारण करण्याऐवजी नामांतरासारखे अनुत्पादक आणि विघातक मुद्दे काही लोक पुढे आणू पाहत आहेत. शहराचे नाव बदलण्यापेक्षा शहराच्या विकासाचे प्रश्न हाती घेतले पाहिजे. ते घेऊन उपाय योजना करायला हव्यात. या ऐवजी धर्मा धर्मात वर्चस्वामुळे सौदार्ह्य बिघडेल अशी कृती करणे देशाच्या एकात्मतेला धोकादायक आहे..

Updated : 21 Dec 2021 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top