Home > Max Political > राज ठाकरे यांनी घातली सीमाभागातील मतदारांना साद

राज ठाकरे यांनी घातली सीमाभागातील मतदारांना साद

कर्नाटक निवडणूकीतील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राज ठाकरे यांनी सीमाभागातील मतदारांना साद घातली.

राज ठाकरे यांनी घातली सीमाभागातील मतदारांना साद
X

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे रोजी होऊ घातलेल्या मतदानासाठी मराठी भाषा अस्मितेचा मुद्दा पुढे करीत राज ठाकरेंनी मराठी आमदारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. तिथल्या सीमाभागातील मराठी मतदार बंधू-भगिनींना आवाहन करतांना राज ठाकरे म्हणाले की, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी. यासाठी राज ठाकरेंनी पुढाकार घेतलाय.

राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत, असा मुद्दा राज ठाकरेंनी मांडला आहे.

Updated : 8 May 2023 2:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top