Home > Max Political > कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग आणि केंद्रच जबाबदार - सामना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग आणि केंद्रच जबाबदार - सामना

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग आणि केंद्रच जबाबदार - सामना
X

देशात कोरोनाची दुसरी लाट भयंकर रुप धारण करुन माणसांना गिळत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेला चीनला जबाबदार धरले तरी देशातील दुसऱ्या लाटेला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबबादार आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर गेली, पण देशात निवडणुकांचे मेळे व धार्मिक कुंभमेळे काही थांबायला तयार नाहीत. लाखो भाविक हरिद्वारला कुंभमेळय़ासाठी जमले. त्यांनी गंगेत शाहीस्नान केले. त्यातून कोरोनाचा संसर्ग देशभरात झाला आहे. प. बंगालातील निवडणुकांचे मेळे पंतप्रधान थांबवायला तयार नाहीत, तेथे कुंभमेळय़ातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा? कोरोनाची आपत्ती केंद्र सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. प. बंगालातूनही 'कोरोना'ची भेट घेऊन भाजप कार्यकर्ते आपापल्या राज्यांत परत येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या संकटाचे खापर सरकारने चीनवर फोडले. पण आज जे दुसरे तुफान उठले आहे त्यास सर्वस्वी जबाबदार चीन नसून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच आहे. ज्या राज्यांत निवडणुका झाल्या किंवा होत आहेत तेथून किमान 500 पट वेगाने कोरोनाचा प्रसार देशभरात झाला. त्यामुळे कोरोना ही नैसर्गिक आपत्ती मान्य केली तरी या नैसर्गिक आपत्तीचा सूत्रधार राजकीय मनुष्यप्राणीच आहे. निवडणुका, राजकीय स्वार्थ यासाठी कोरोनाची पर्वा न करता दिल्लीश्वरांनी महामारीची लाटच निर्माण केली. देशात प्राणवायूचा तुटवडा आहे. रेमडेसिवीरची कमतरता आहे. बेडस्, व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत. शववाहिन्या व स्मशानात दाटीवाटी सुरू आहे. एकाच वेळी सामुदायिक चिता भडकावून कोरोनाग्रस्त शवांची विल्हेवाट लावली जात असताना मायबाप केंद्र सरकार प. बंगालात निवडणूक खेळात दंग आहे.

राहुल गांधींचे कौतुक

परदेशी लसींना हिंदुस्थानच्या बाजारात येऊ द्या, असे राहुल गांधी ओरडून सांगत होते, तेव्हा ते परदेशी लस कंपन्यांचे दलाल असल्याची टीका भाजपचे केंद्रीय मंत्री करीत होते. पण आता देशाची परिस्थिती हाताबाहेर जाताच परदेशी लसींना हिंदुस्थानात येण्यास मंजुरी दिली. म्हणजे राहुल गांधी यांचा अभ्यास व अक्कल दिल्लीतील विद्यमान राज्यकर्त्यांपेक्षा उच्च कोटीची आहे व राहुल गांधी हे कोरोना लढाईत सरकारपेक्षा शंभर पावले पुढे आहेत.

केंद्र सरकारच्या बेफिकिरीतून निर्माण झालेले अपयश आहे. या संकटाशी सामना करण्याइतकी इच्छाशक्ती आमच्या केंद्र सरकारकडे आज उरली आहे काय? की कोरोना युद्धापेक्षा त्यांना चार राज्यांतील निवडणूक लढाई महत्त्वाची वाटत आहे? राजकारणाचा डोस कमी करून केंद्राने कोरोना युद्धावर लक्ष ठेवले असते तर परिस्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आली असती. पण सरकारने मधल्या काळात राजधानी प. बंगालात हलवली व दिल्लीचा ताबाही कोरोनाने घेतला. एकदा राजधानीच पडल्यावर देश पडायला किती वेळ लागतोय? कोरोनाच्या संकटाने धोक्याची पातळी कधीच ओलांडली आहे. दिल्लीसह देश तडफडताना दिसत आहे. चित्र भयंकर होतेच, ते अधिक धोकादायक होताना दिसत आहे

Updated : 17 April 2021 2:02 AM GMT
Next Story
Share it
Top