Home > Max Political > पंकजा मुंडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट

पंकजा मुंडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट

राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ असलेल्या विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट
X

राज्यसभा निवडणूकीपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकही जाहीर झाली आहे. मात्र या विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाला आहे.

राज्यात राज्यसभा निवडणूकीमुळे वातावरण तापले आहे. त्यातच आता विधानपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापार्श्वभुमीवर भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची निराशा झाली आहे.

भाजपने जाहीर केलेले उमेदवार

भाजपने विधानपरिषद निवडणूकीसाठी उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांच्याऐवजी उमा खापरे यांच्या पदरी विधानपरिषदेची उमेदवारी पडली आहे.


कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. तसेच उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

दिपाली सय्यद यांच्यावरील टीकेने प्रसिद्धी झोतात

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र आता भाजपने विधानपरिषद उमेदवारी दिल्याने पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांचा पत्ता कट झाला आहे.

फडणवीसांचे ओएसडी ते विधान परिषदेचे उमेदवार

विधान परिषदेच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. भाजपचच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.


प्रविण दरेकर यांना संधी का?

गेल्या काही महिन्यांपासून विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर हे मुंबै बँक प्रकरणी वादात सापडले आहेत. मात्र तरीही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तसेच देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख असल्याने प्रविण दरेकर यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे.

रोहित पवार यांना शह देण्यासाठी राम शिंदे यांना संधी

प्राध्यापक ते जलसंधारण मंत्री आणि सध्या भाजपचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या राम शिंदे यांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यातच राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. याबरोबरच शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केल्यानतंर राम शिंदे हे जास्त सक्रीय असल्याचे दिसत नव्हते. मात्र या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राम शिंदे हे पक्ष संघटनेत गोवा आणि इतर राज्यातील निवडणूकींसाठी काम करत होते. त्यामुळे राम शिंदे यांना विधानपरिषदेचे संधी देण्यात आली आहे.

राम शिंदे यांना आमदारकी देऊन एके काळी भाजपचा गड राहिलेल्या कर्जत जामखेड तालुक्यात रोहित पवार यांचा वाढत असलेला प्रभाव रोखण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. याबरोबरच राम शिंदे हे गोपिनाथ मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे.

पंकजा मुंडे यांचा पत्ता कट

पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचा पक्षांतर्गत संघर्ष महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यापार्श्वभुमीवर पंकजा मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला होता. त्याचाही फटका पंकजा मुंडे यांना बसला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माधव भंडारी यांना विधानपरिषद नाहीच

भाजप प्रवक्ते आणि निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या माधव भंडारी यांचे नाव अनेकदा विधानपरिषद निवडणूकांच्या वेळी चर्चेत येत असते. मात्र नेहमीप्रमाणे यावेळीही माधव भंडारी यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आले आहेत.


Updated : 8 Jun 2022 1:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top