Home > Max Political > राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीवर नाराज असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
X

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. या चर्चेचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील उमटल्याचे सांगितले जाते आहे. त्यातच एका इंग्रजी वर्तमानपत्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र स्वरुपात नाराज असल्याचे वृत्त दिल्याने खळबळ उडाली होती. यातही मुख्यमंत्र्यांचा रोख हा राष्ट्रवादीच्या ताब्यातील गृहखात्याकडे असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसात भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेनेची कोंडी केली असताना गृहखाते मात्र भाजप नेत्यांविरोधात तेवढ्या गांभिर्याने कारवाई करत नसल्याची शिवसेनेत नाराजी होती, असे या वृत्तामध्ये सांगण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, ‘गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज’ अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम काम करीत आहेत,असे मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी स्पष्ट केले आहे” असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्टीकरण दिल्याने आता ही नाराजी खरंच होती का अशीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी विषयी प्रचंड नाराजी असल्याची अनेक उहादरणं गेल्या काही दिवसात समोर आली होती. तानाजी सावंत यांनी तर जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त निधी मिळत असल्याची नाराजी व्यक्त केली होती. यामुले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना वर्षा बंगल्यावर जाऊन तासभर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याने महाविकास आघाडीमधील खदखद आता तरी थांबणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Updated : 1 April 2022 6:16 PM IST
Next Story
Share it
Top