Home > Max Political > सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय 'स्पायडरमॅन' आहेत का ? – नाना पटोले

सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय 'स्पायडरमॅन' आहेत का ? – नाना पटोले

सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे ते काय स्पायडरमॅन आहेत का ? – नाना पटोले
X

शिंदे आणि फडणवीस सरकारने काही दिवसांपुर्वी राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामध्ये तब्बल सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद फक्त एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. त्यावरून विरोधक सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. आताही नाना पटोले यांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद स्विकारायला ते काय स्पायडरमॅन आहेत का? अशी टीका उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत आहे, दिल्लीला विचारल्याशिवाय ते कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सारख्या दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्यातील ईडीचे सरकार असंवैधानिक आहे हे आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आहोत. दुसरीकडे महागाईने जनता त्रस्त आहे. मध्यमवर्गही महागाईने पिचला आहे पण केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या महागाई राज्य सरकारने कमी करावी असे म्हणत आहेत.


महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करत आहे त्यामुळे निर्मला सितारामण यांनी सांगितल्याप्रमाणे महागाई कमी करण्यासाठी ते काय करतात ते पहावे लागेल.

शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार ? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. आधीच या सरकारने मंजूर विकास कामांना स्थगिती दिलेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील रस्ते अत्यंत खराब आहेत. रस्त्यात खड्डे आहेत, का खड्ड्यात रस्ते, हेच कळत नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले, सोयाबिन गेले, भाजीपाला, फळबागा, सर्व काही वाया गेले असतानाही पंचनामे व्यवस्थित केलेले नाहीत. अमरावती, अकोला, यासह राज्याच्या अनेक जिल्ह्यातील परिस्थिती मी पाहिली पण सरकारची उदासिनता दिसून येते. शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेले नाही. राज्यातील ईडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या कृतीतून दिसत आहे.

भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सहभाग वाढवू...

काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यातील ही पदयात्रा जाणार आहे, त्या भागातूनही मोठ्या संख्येने लोक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. डावे पक्ष, सामाजिक संघटना यांनी पदयात्रेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केलेले आहे. भाजपासोडून इतर पक्षांनाही या पदयात्रेसाठी बोलावण्याचा आमचा प्रयत्न. भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नाही. सर्व जाती- धर्माच्या लोकांना एकत्र करून देश, लोकशाही व संविधान वाचवणे हा या यात्रेचा संकल्प आहे. भारत जोडो यात्रेमुळे देशातील वातावरण बदलत असून सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जाऊन इमामांची भेट घेऊन आले, रामदेवबाबांनीसुद्धा या यात्रेचे स्वागत केले असून हा बदल चांगला आहे.


राहुलजी गांधी यांचा साधेपणा व नम्रपणा लोकांना भावतो आहे त्यामुळेच लोकांचा पाठिंबा वाढत आहे. पणकाही विकृत मनोवृत्तीचे लोक पदयात्रेला व काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यात त्यांना यश येणार नाही. जे लोक यात्रेमुळे घाबरलेले आहेत ते जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाविषयी व पक्षातील काही नेत्यांबद्दल अफवा पसरवत आहेत. महाराष्ट्र ही पदयात्रा सर्वात मोठी व्हाही यासाठी मोठ्या संख्येने सहभाग घेतला जाणार आहे.

Updated : 28 Sep 2022 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top