Home > Max Political > अखेर मणिपूरवर पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं...

अखेर मणिपूरवर पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं...

अखेर मणिपूरवर पंतप्रधान मोदींनी मौन सोडलं...
X

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या सभागृहात भाष्य करावं, म्हणून विरोधकांनी अधिवेशना आधीपासूनच जोरदार मागणी करायला सुरूवात केली होती. मात्र, मोदींनी विरोधकांच्या या मागणीला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळं अखेर विरोधकांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यामुळं पंतप्रधान मोदींना आज मणिपूरच्या विषयावर अखेर मौन सोडत बोलावं लागलं. मोदींनी केलेल्या भाषणात सुरूवातीचे दोन तास विरोधकांवर सडकून टीका केली. मोदींनी आपल्या भाषणाच्या शेवटी मणिपूरच्या घटनेवर दुःख व्यक्त केलं.

मणिपूरच्या घटनेवर गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर चर्चेची तयारी दर्शवली होती. मात्र, विरोधकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. खरंतर त्यावेळी मणिपूरच्या घटनेच्या सर्व पैलूवर चर्चा करता आली असती. मात्र, विरोधकांना त्या चर्चेत रस नव्हता, त्यामुळं हा देश विरोधकांकडून फार अपेक्षा करू शकत नसल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. विरोधकांनी अविश्वासाचा प्रस्ताव आणला, त्या प्रस्तावावर ते बोलले तर त्यांचं दायित्व आहे की देशाच्या विश्वासाला खरं उतरायंच, असा टोमणाही मोदींनी यावेळी विरोधकांना लगावला. केंद्र सरकार मणिपूरच्या घटनेवर चर्चेसाठी तयार होतं. गृहमंत्री अमित शहा यांनी तशी चिठ्ठीही लिहिली होती. मात्र, विरोधी पक्षांकडे हिंमत आणि इच्छाच नव्हती चर्चेची. त्यांच्या पोटात पाप होतं, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली. गृहमंत्री शहा यांनी मणिपूरवर विस्तारानं सभागृहात माहिती दिली आहे. मात्र, मणिपूरच्या हिंसाचारामधील दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी केंद्र आणि मणिपूर सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल आणि मणिपूर पुन्हा विकासाच्या मार्गानं पुढं जाईल, असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला.

Updated : 10 Aug 2023 2:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top