Home > Max Political > महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे सीमावाद चिघळणार

महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे सीमावाद चिघळणार

कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, कारवार हे मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील करण्यासाठी सीमावाद सुरू असतानाच महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. त्यामुळे आता सीमावाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे सीमावाद चिघळणार
X

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. तर 1 मे रोजी राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यापार्श्वभुमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नसल्याचे वक्तव्य केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या लढ्याला आपला पाठींबा राहील असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रीया देतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही. उलट महाराष्ट्रात असलेले कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटकमध्ये सामील करून घेण्याचा आपला विचार सुरू असल्याचे महाराष्ट्राचा द्वेष करणारे वक्तव्य केले. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी मराठी भाषेची नौटंकी आणि सीमाप्रश्नाचा वापर करू नये. तसेच महाराष्ट्रावर सध्या राजकीय संकट आहे. सरकार दडपणाखाली आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील नेत्यांकडून भाषा आणि सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.

कर्नाटक राज्य सरकारची सीमाप्रश्नावर भुमिका अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे कर्नाटक या कोणत्याही प्रकारच्या दबावाला झुकणार नाही, असे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा सीमाप्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated : 3 May 2022 3:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top