Home > Max Political > महाड दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

महाड दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

महाड दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
X

गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर, भूस्खलन (landslide in Mahad) यामुळे आर्थिक नुकसानीबरोबरच जीवित हानी देखील झाली आहे. (rainfall in Maharashtra)

रायगड जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी महाड तालुक्यातील तळई गावात माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. या गावात दरड कोसळल्याने त्याखाली ३२ घरं दाबली गेली आहेत. यामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० जण अजूनही बेपत्ता आहेत. गोवेले सुतारवाडी येथे ५ जणांचा तर केवनाळे येथील ६ जणांचा दरड कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत दगावलेल्या मृतांच्या वारसांना केंद्र सरकार आणि राज्यसरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

रायगड मधील भुस्खलनामध्ये मृत पावलेल्या वारसांना राज्यशासनाकडून प्रत्येकी ५ लाख तर केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

महाडची सद्यस्थिती...

महाडमधील सध्याची परिस्थिती ही गंभीर असून राज्य आणि केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचं बचाव कार्य युद्ध स्तरावर सुरु आहे. महाड तालुक्यात पुराने तैमान घातल्याने आता इथून लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. पुरामध्ये अडकलेल्या लोकांचे हेलिकॉप्टरने स्थलांतर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

नागरिकांनी छतावर येऊन थांबावं...

नागरिकांनी आपापल्या घरांच्या छतावर किंवा उंच ठिकाणी जाऊन थांबवावं त्यामुळं ज्या लोकांना गरज आहे. ते बचाव पथकांच्या निदर्शनास येतील. असं आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोलादपूर तालुक्यातील गोवेले ग्रामपंचायत हद्दीमधील सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या दुर्घटनेत सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून आणखी काही घरे दरडींसोबत उतारावर वाहून गेली.

गुरुवारी रात्री ही घटना घडल्यानंतर प्रशासनाने घटनेचा आढावा घेतला असता कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील कापडे बुद्रुक येथील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल वाहून गेल्याचे दिसून आले. यावेळी दरडीच्या ढिगाऱ्याखालून केवनाळे येथून ६ जणांचे तर गोवेले सुतारवाडी येथील ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर गोवेले सुतारवाडी येथील १०, केवनाळे येथील २ आणि कुंभार्डे येथील १ अशा १३ जखमींना बाहेर काढण्यात आले असून, या सर्वांना प्राथमिक उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या दोन्ही ठिकाणी मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या ठिकाणी सुरू असलेल्या मदत व बचाव कार्याचा त्यांनी आढावा घेतला. प्रवीण दरेकर यांनी या ठिकाणाला भेट दिल्यानंतर ट्विट करुन माहिती दिली आहे. यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सातत्याने आढावा बैठका घेऊन सदर बैठकांची माहिती ट्विटरवर देत आहेत.

Updated : 23 July 2021 2:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top