Home > Max Political > कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी खरंच रस्सीखेच आहे का ?

कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी खरंच रस्सीखेच आहे का ?

भाजपच्या हातून एकहाती सत्ता काबीज करणा-या कर्नाटक काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यात सिद्धरमैय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar) या दोघांचीही नावं आघाडीवर आहेत. काँग्रेसनं कर्नाटकमध्ये एकजूट दाखवत हा विजय संपादित केला आहे, मात्र सत्ता आल्यानंतर याच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी वाद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी खरंच रस्सीखेच आहे का ?
X

मागील काही वर्षाच्या तुलनेत काँग्रेसला कर्नाटकमध्ये यावेळी एकहाती यश मिळालय. त्यामुळं मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू झालंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात केद्रीय पर्यवेक्षकांनी आपला अहवाल हा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना सुपूर्द केला आहे. खरगे हे युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याशी या अहवालासंदर्भात चर्चा करणार आहेत. आज (दि. 16 मे) कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी म्हटले आहे की, साडेसहा कोटी कर्नाटक वासियांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षश्रेष्ठींकडे दिलेला आहे, तेच यासंदर्भात निर्णय घेतील, असं सुरजेवाला यांनी म्हटलंय. यात निरीक्षकांनी आपलं मत कुणाच्या पारड्यात टाकलंय, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. काँग्रेसचे नेते, एच.के. पाटील (HK Patil) यांनी सांगितलं की, दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले सिद्धरमैय्या हे दिल्लीत पोहोचले होते. तर आजारपणाचं कारण देत डीके शिवकुमार हे दिल्लीला गेलेच नाहीत. त्यामुळं उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.

दरम्यान, डीके शिवकुमार यांनी माध्यमांना मुख्यमंत्रीपदाबाबत सांगितलं की, पक्षश्रेष्ठी यासंदर्भात फोन करतील, याव्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही. मला आमदारांचं समर्थन नकोय, माझ्यासाठी हे महत्त्वाचं नाहीये, आमच्याकडे 135 आमदार आहेत, आणि एक अपक्ष आमदार आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र काम करू. आमच्या 135 आमदारांनी एकसूरात सांगितलंय की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींनी घ्यावा, त्यामुळं यावर मी अधिक बोलू इच्छित नाही, असंही शिवकुमार यांनी स्पष्ट केलंय.

काँग्रेस श्रेष्ठींनी मला आणि सिद्धरमैय्या यांना दिल्लीला बोलवलंय. सोनिया गांधी आणि खरगे यांनी मला कर्नाटकचं अध्यक्ष केलं होतं. 135 आमदार हे माझ्या अध्यक्षतेखाली निवडून आलेले आहेत. ज्यावेळी सर्व आमदार आमच्या पक्षातून बाहेर पडले आणि आमचं सरकार कर्नाटकमध्ये कोसळलं तेव्हा मी आशा सोडली नव्हती. मागील 5 वर्षात काय घडलं, हे मी सांगू इच्छित नाही, असंही शिवकुमार यांनी सांगितलं.

पक्षनिरीक्षकांच्या टीममध्ये सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह यांचा समावेश होता. त्यांना कर्नाटकच्या विधिमंडळाचा नेता निवडीसाठी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत चर्चा करून पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करण्याचं काम सांगण्यात आलं होतं. त्यात सर्वसंमतीनं कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्याचे अधिकार देणारा प्रस्ताव पारित करण्यात आला. इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होणं स्वाभाविक आहे. त्यातच सिद्धरमैय्या आणि डीके शिवकुमार या दोघांनाही अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनविण्याचा विचार काँग्रेस करू शकतं, असं कर्नाटक काँग्रेसमधील अनेकांना वाटतंय.

Updated : 16 May 2023 3:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top