Home > Max Political > काँग्रेसमध्ये कन्हैया कुमारचं नशीब उजळेल का?

काँग्रेसमध्ये कन्हैया कुमारचं नशीब उजळेल का?

काँग्रेसमध्ये कन्हैया कुमारचं नशीब उजळेल का?
X

२०१५ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता म्हणून निवडून आला. २०१६ मध्ये भाजप सरकारने त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या ऑल इंडिया स्टुडंन्टस् फेडरेशन या विद्यार्थी संघटनेत कन्हैया कुमार सक्रीय होता.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरही त्याची निवड झाली. २०१९ ची लोकसभा निवडणुक तो याच पक्षाच्या तिकीटावर लढला आणि सुमारे चार लाख मतांनी पराभूत झाला.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यांना राजकारणाचं चौफेर ज्ञान असतं, वादविवाद स्पर्धेत बाजी मारण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलेलं असतं, भाषणं वा व्याखानं देताना भावनांना हात न घालता बुद्धीला ते संबोधित करतात. चपखल युक्तिवाद, हजरजबाबीपणा आणि भाषा प्रभुत्व त्यांच्याकडे असतं. आपल्या विचारधारेशी ते प्रामाणिक असतात. कन्हैया कुमारकडेही हे गुण आहेत.

अल्पावधीत राष्ट्रीय पातळीवर चमकणारा तरुण नेता भारतीय कम्युनिस्ट चळवळीला अनेक दशकांनी लाभला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्याचे दौरे आखले. त्याला पाह्यला आणि ऐकायला जिल्ह्याजिल्ह्यातील तरुणांनी गर्दी केली. त्याच्या भाषणांचे, मुलाखतींचे व्हिडीयो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. मोदी सरकार, भाजप आणि संघ परिवार यांच्या विरोधात लढणारा निडर राष्ट्रीय नेता अशी ओळख त्याने रुजवली. त्याची बहुतांश भाषणं वा वादविवाद यामध्ये तो नेहमीच राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याची मूल्यं आणि ऐतिहासिक वारसा यावर भर देत असे.

थोर साहित्यिक फणिश्वरनाथ रेणु समाजवादी चळवळीत होते, चलेजाव आंदोलन, नेपाळमधील राणाशाहीच्या विरोधातील लढा, आणीबाणी विरोधी लढा यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. ऑल इंडिया स्टुडंन्ट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेत रेणु होते, याची आठवण कन्हैया कुमार वारंवार करून देत असे. वस्तुतः भारतीय कम्युनिस्ट पक्षाने चलेजाव आंदोलनाला विरोध केला होता, आणीबाणीला या पक्षाचा पाठिंबा होता. असो. आपल्या भाषणांतून भाकपची विचारधारा आणि कार्यक्रम यांची मांडणी कन्हैया कुमारने अपवादानेच केली.

भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्येही त्याचे नेतृत्वाशी खटके उडत. भाकपच्या बिहार शाखेच्या पाटणा येथील मुख्य कार्यालयात कन्हैया कुमारच्या समर्थकांनी धुडगूस घातला होता. जानेवारी महिन्यात झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने कन्हैयाचा निषेध करणारा ठराव केला होता. कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्यावर भाकपच्या नेत्यांनी कन्हैया कुमारकडे विचारणा केली. या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं कन्हैया कुमार त्यांना सांगायचा. मात्र या बातम्यांचं खंडन करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची पक्षाची सूचना त्याने धुडकावून लावली. काही दिवसांपूर्वीच भाकपच्या पाटणा कार्यालयातील एअरकंडिशनर कन्हैयाने काढून घेतला. हा एअरकंडिशनर कन्हैयाने आपल्या खर्चाने लावला होता त्यावर पार्टीचा मालकीहक्क नव्हता असं स्पष्टीकरण पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिलं. कन्हैया आणि भाकप यांचे संबंध विकोपाला गेले असल्याचं या घटनेवरून दिसतं.

काँग्रेसमध्ये कन्हैया कुमारचं नशीब उजळेल का?

युक्तिवाद, भाषणबाजी, भाषाप्रभुत्व आणि मोदी सरकारच्या विरोधात लढण्याचा निडरपणा ह्या कन्हैयाच्या जमेच्या बाजू आहेत. त्याचं संघटनकौशल्य जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरातच सिद्ध झालं आहे. या विद्यार्थी संघटनेच्या काही तरुणींना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली होती. परंतु निवडणुकीत त्या पक्षाचा आणि विद्यार्थी नेत्यांचा सपशेल पराभव झाला.

निवडणुकीच्या राजकारणात आपल्या सामाजिक आधाराला (म्हणजे केवळ निवडणुकीचा मतदारसंघ नाही तर सामाजिक वर्ग वा घटक) संबोधित करावं लागतं. आपण ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतो (दलित, आदिवासी, ओबीसी, कामगार, मध्यमवर्गीय, शेतकरी, इत्यादी) त्यांचे प्रश्न मांडावे लागतात, त्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे लागतात, त्यांचे प्रश्न सोडवावेही लागतात, त्यासाठी समाजातील विविध घटकांशी, नेते-नोकरशहा इत्यादींकडून कामं करून घ्यावी लागतात.

कन्हैया कुमार जगातल्या कोणत्याही प्रश्नावर उत्कृष्ट मांडणी करू शकतो. बोलू शकतो. याचा अर्थ असा की त्याच्याकडे प्राथमिक मतदारसंघ नाही. राहुल गांधी कन्हैयाएवढे वादविवादपटु नाहीत. परंतु काँग्रेस पक्षाचा जनाधार त्यांच्यामागे आहे. त्यामुळे अमेठीत पराभव झाला तरी ते केरळमधून निवडून येऊ शकतात. असा जनाधार आपल्या पाठिशी उभा करायला कन्हैयाला मेहनत घ्यावी लागेल. परंतु तरुणांना यासाठी सवड नसते. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय प्रतिमेच्या आधारे राज्यसभेत वर्णी लावणं आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळवणं हे कन्हैयाचं उद्दीष्ट असावं. त्याच्या पुढील राजकीय वाटचालीला शुभेच्छा.

Updated : 29 Sep 2021 1:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top