Home > Max Political > Journalistsपत्रकारांच्या सामुहिक बदनामीची मोहीम: एस.एम. देशमुख

Journalistsपत्रकारांच्या सामुहिक बदनामीची मोहीम: एस.एम. देशमुख

पत्रकारांच्या (Journalists) सामुहीक बदनामीची (defamation) मोहीम कुणी सुरु केली? दिवाळी (diwali gifts)भेटवस्तुमागे काय होतं राजकारण? पत्रकारांना नामोहरण कोण करतयं ? वाचा ज्येष्ठ पत्रकार एस.एस. देखमुख (SM Deshmukha)यांचा खडबडून डोळे उघडवणारा लेख....

Journalistsपत्रकारांच्या सामुहिक बदनामीची मोहीम: एस.एम. देशमुख
X

पत्रकारांवर शारीरिक हल्ले करून त्यांचं मानसिक खच्चीकरणाचे प्रयत्न काही वर्षांपुर्वी केले जात.. .. कायदा वगैरे झाला.. हल्ला करणं अडचणीचं होऊ लागलं..हल्ला केला तर लोकांची सहानुभूती पत्रकारांना मिळायची.. हे परवडणारं नव्हतं.. मग यातून मार्ग काढला गेला तो पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याला आयुष्यातून उठविण्याचा.. याचा फटका राज्यातील असंख्य पत्रकारांना बसला.. बसतो आहे.. ही मोहीम सुरू असतानाच आता पत्रकारांची "सामुहिक बदनामी" करण्याचा नवा ट्रेंड बाजारात आला आहे.. पत्रकारांना नामोहरम करण्याचा, त्याचा आवाज बंद करण्याचा हा तुलनेनं सोपा आणि प्रभावी मार्ग.. .. पत्रकारांवर हल्ला केला किंवा खोट्या गुन्ह्यात पत्रकाराला अडकविले तर एक व्यक्ती किंवा एक पत्रकार बाधित होतो.. बदनामीमुळे सारा पत्रकार समुहच बाधित होतो... हे लक्षात आल्यानंतर हा ट्रेण्ड आता रूढ होताना दिसतो आहे.. अगोदर "चाय-बिस्कुट पत्रकार" म्हणून पत्रकारांची बदनामी केली गेली..पुढं हा शब्द एवढा रूढ झाला की, चाय बिस्कुट आणि पत्रकार हे दोन शब्द समानार्थी म्हणून वापरले जाऊ लागले..

आता देवेंद्र फडणवीस यांनी "एचएमव्ही पत्रकार" म्हणून पत्रकारांची हेटाळणी केली आहे.. एचएमव्हीच्या तबकडीवर कुत्र्याचं चिन्हं होतं.. म्हणून त्यांनी एचएमव्ही हा शब्द वापरला.. असं सांगितलं जातं.. त्यांनी बोलताना "चार - पाच एचएमव्ही पत्रकार" असा उल्लेख पत्रकार परिषदेत केला असला तरी त्यांनी हे चार पाच पत्रकार कोण...? त्याची नावं काही सांगितली नाहीत.. सर्वच पत्रकारांना अंगावर घ्यायला नको आणि करता आली तर पत्रकारांची एकजूट भंग करावी असा दुहेरी उद्देश यामागे होता.. शिवाय एचएमव्ही पत्रकार हा शब्दप्रयोग चार - पाच पत्रकारांपुरता मर्यादित राहणार नाही तो सर्वांनाच लागू होईल हे ही फडणवीस ओळखून होते.. घडलंही तसंच.. भाजपचे पराग शहा यांनी लगेच फडणवीस यांची री ओढत "चाय बिस्कुट पत्रकारांचे एचएमव्ही पत्रकार असे नामकरण झाले" असं ट्विट करीत आनंद साजरा केला.... नंतर ज्यांना एचएमव्ही चा अर्थ ही माहिती नाही अशा भक्तांनी मग गावोगावच्या, आपल्याला सोयीच्या नसलेल्या पत्रकारांना एचएमव्हीची उपमा द्यायला लगेच सुरूवात केली.. देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश फत्ते झाला..

देवेंद्र फडणवीस का चिडले ? अगदी पत्रकारांना कुत्र्याची उपमा देण्यापर्यंत ते का घसरले ? उत्तर अलिकडच्या काही घडामोडीत दडलं आहे.. गेल्या महिनाभरात राज्यातील पाच मोठे उद्योग गुजरातला गेले.. यावर विरोधी पक्षांनी आणि बहुतेक पत्रकारांनी काहूर उठविले.. राज्याच्या हिताची भूमिका घेणे हे पत्रकार म्हणून पत्रकारांचं काम होते..

ते बहुतेकांनी हातातील उपलब्ध व्यासपीठाच्या माध्यमातून केलं...हे कोणाच्या सांगण्यावरून केलेले नाही.. किंवा अन्य कोणाला राजकीय लाभ व्हावा म्हणूनही अशी भूमिका घेतली नाही.. केवळ महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात निर्णय झाल्यामुळे पत्रकार चिडले.. त्यांनी आवाज उठविला.. त्यात गैर किंवा चुकीचे काय होतं ? मात्र एका बाजुला विरोधक आणि दुसरया बाजुला बहुतेक पत्रकारांनी सरकारी धोरणावर हल्लाबोल केल्यानं सरकारची नाचक्की झाली.. सरकार पक्षाला स्वतः चा धड बचाव देखील करता येईना.. भाजप नेते उद्विग्न झाले...त्यातून देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना "एचएमव्ही पत्रकार" म्हणून हिणवत संताप व्यक्त केला..

गंमत अशी की, पत्रकारांना टार्गेट करण्याच्या एक दिवस अगोदरच देवेंद्र- फडणवीस यांनी पत्रकारांना दिवाळी जेवणासाठी रितसर निमंत्रणं देऊन घरी बोलावले होते.. जेवण दिल्यावर पत्रकारांना भेट वस्तू दिल्या गेल्या.. त्या कोणी मागितल्या होत्या का? तर नक्कीच नाही.. तरीही "लाख मोलाच्या" या भेट वस्तू देऊन पत्रकारांना आदल्या दिवशी मिंधे करायचे आणि दुसरया दिवशी त्यांचे वाभाडे काढायचे.. हे ठरवून केलेलं नियोजन नव्हतं का? .. असं केल्यानं थेट फडणवीस यांचा निषेध करायला कोणी धजावणार नाही असंही यामागचं सूत्र असावं.. झालंही तसंच.. सगळ्यांनी पराग शहा यांना लक्ष्य केलं..पत्रकारांवर टीका फडणवीसांनी केली.. निषेध मात्र शहा यांचा झाला..फडणवीस यांच्या विरोधात पत्रकारांमधून जो संघटीत आवाज उठणं अपेक्षित होतं तो ही उठला नाही.. उलट पत्रकारांमध्ये दोन गट पडले.. ज्यांनी दिवाळी फराळाचा लाभ घेतला ते पराग शहांचा निषेध करू लागले.. जे दिवाळी फराळाला गेले नाहीत (अथवा ज्यांना बोलावले नाही) ते देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाचा आग्रह धरू लागले.. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात तीन पक्षी मारले... "एचएमव्ही पत्रकार" म्हणत पत्रकारांची सामुहिक बदनामी करण्यात त्यांना यश आलं... पत्रकारांमध्ये दोन तट करता आले आणि मुळ मुद्यांपासून म्हणजे प्रकल्प गुजरातला गेल्याच्या वादा पासून जनतेचं आणि पत्रकारांचं लक्ष विचलित करण्यात फडणवीस यशस्वी झाले..

आम्हा पत्रकारांमध्ये काही दोष( असतील, आमच्यातील काही जण चुकीचं वागतही असतील मात्र बहुतेक पत्रकार आजही आपलं काम निष्ठेनं पार पाडताना दिसतात हे वास्तव कोणी नाकारू नये.. तटस्थ भूमिका घेऊन काम करणार्‍या पत्रकारांना सर्वपक्षीय राजकारण्यांनी (आणि समाजानंही) किमान नैतिक संरक्षण दिलं पाहिजे..तसं होत नाही.. उलट आलटून पालटून राजकीय पक्ष पत्रकारांची सामुहिक बदनामी करताहेत... समाजही समाजमाध्यमांवरून पत्रकारांची टिंगल टवाळी करण्यात धन्यता मानताना दिसतो आहे.. हे संतापजनक आहे..पत्रकारांनी आपल्याला सोयीची तीच भूमिका घ्यावी आणि ती घेतली नाही तर तो विरोधकांचा हस्तक किंवा( कुत्रा असा कोणाचा दृष्टीकोण असेल तर तो चुकीचा आहे... आतापर्यंत विरोधक पत्रकारांना गोदी मिडिया म्हणायचे आता सत्ताधारी पत्रकारांना एचएमव्ही म्हणू लागले आहेत.. म्हणजे यांचे दृष्टीकोण सोयीनुसार बदलणार ...पत्रकारांनी आपल्या सोयीनुसार, आपल्या तालावर नाचावं अशी यामागं सर्वपक्षीय राजकारण्यांची भूमिका असते... ती पूर्ण होणार नाही..मग आम्हाला कोणी चाय बिस्कुट पत्रकार म्हणोत, कोणी गोदी मिडिया म्हणोत नाही तर कोणी एचएमव्ही पत्रकार म्हणोत.. जनहित, राषटहिताची भूमिका घेताना आम्हाला आमच्या सामुहिक बदनामीची देखील भिती नाही हे सर्वपक्षीय राजकारण्यांनी कायम लक्षात असू द्यावे..

एस.एम देशमुख

Updated : 2 Nov 2022 11:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top