Home > Max Political > भाजपला खरंच राजकीय घराणेशाहीचं वावडे आहे का?

भाजपला खरंच राजकीय घराणेशाहीचं वावडे आहे का?

राजकीय घराणेशाहीच्या विरोधात रान उठवणारा भाजप काँग्रेस च्या राजकुमारांना पक्षात प्रवेश का देत आहे? वाचा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या…

भाजपला खरंच राजकीय घराणेशाहीचं वावडे आहे का?
X

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने दिल्लीत घराणेशाहीमुळे लोकशाहीसमोर आव्हान निर्माण झालं आहे. या विषयावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित चर्चा सत्र आयोजित केले होते. या चर्चा सत्रात लोकशाहीसाठी घराणेशाही किती घातक आणि वाईट वैगरे आहे. या संदर्भात जोरदार चर्चा झाली.

दुसरीकडे लोकशाहीतील घराणेशाहीवर दिल्लीत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित जोर बैठका सुरू असताना भाजपने काँग्रेसचे दिवंगत नेते बलराम जाखड यांचे चिरंजीवआणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर केला.

एवढंच नाही तर भाजपला घराणेशाहीचा इतका राग आहे की, त्यांनी गेल्या काही वर्षात काँग्रेस चे दिवंगत नेते माधवराव सिंधिया यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजप प्रवेश देऊन त्यांना केंद्रात मंत्री केले आहे. फक्त जाखड सिंधियाच नाही तर काँग्रेसचे दिवंगत नेते जितेंद्र प्रसाद यांचे चिरंजीव जितिन प्रसाद यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिला.

भाजपचं तसं तर लोकशाहीवर प्रचंड प्रेम आहे. अलिकडे घडत असलेल्या घडामोंडीवरून ते दिसून येते. या प्रेमातूनच भाजपने आज घराणेशाहीमुळे लोकशाही समोर मोठं आव्हान निर्माण झाले असल्याची चर्चा राजधानी दिल्लीत केली.

राजकीय घराणेशाही लोकशाहीसाठी घातक हे मान्यच.. मात्र, स्वतःला सोडून भाजपची ही चर्चा म्हणजे जणू काही " मी तो नव्हेच "अशा स्वरूपाची आहे.

भाजपने कॉंग्रेस वर टीका करत काँग्रेस ने ७० वर्ष काय केलं असा सवाल केला. आणि ज्या लोकांनी ७० वर्षे इथल्या जनतेवर राज्य केलं. त्या लोकांनाच भाजपमध्ये प्रवेश दिला. आता बहुतांश काँग्रेस च्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मुलाच्या राजकीय भवितव्याचा विचार करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं पूर्ण भाजप आता कॉग्रेसमय झाली आहे.

फक्त नॉर्थ इस्टमधल्या राज्यांचा विचार केला तर 4 राज्याचे मुख्यमंत्री मूळचे काँग्रेस चे आहेत.

मणिपूर- एन बीरेंन्द्र,

अरुणाचल- पेमा खांडू,

त्रिपुरा- साहा

आसाम-हेमंता विश्व शर्मा

त्यामुळे भाजपला राजकीय घराणेशाहीवर चर्चा करण्याचा अधिकार आहे का? काँग्रेस च्या घराणेशाहीवर टीका करताना स्वतःचं झाकून ठेऊन दुसऱ्याचं वाकून पाहिल्यानं वस्तुस्थिती बदलणार आहे का?. हमाम में सब नंगे है!

लोकशाही एका क्षणात धोक्यात येत नसते. ती टप्प्या टप्याने धोक्यात येत असते. एकीकडे घराणेशाहीवर टीका करायची आणि दुसरीकडे राजकीय घराण्यातील पक्षाला प्रवेश द्यायचा. भारतीय लोकशाहीला याच दुटप्पी लोकांपासून धोका आहे. राजकीय घराणेशाहीला काँग्रेस जितकी जबाबदार आहे तितकीच भाजपही जबाबदार आहे.

सावधान!

Updated : 19 May 2022 6:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top