Punjab Election : सिद्धूंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी पाकिस्तानातून दबाव? अमरिंदर सिंग यांच्या आरोपाला काँग्रेसचे उत्तर
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असलेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांची धूम सुरू आहे. रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पण यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आता धक्कादायक आरोप केला आहे.
अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. पण आता या संघर्षात आणि पंजाब निवडणुकीच्या पुढील काळात प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा वारंवार उचलला जाणार आहे, कारण अमरिंदरसिंग यांनी तसा गंभीर आरोप केला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांची अमरिंदर सिंह यांनी आपल्या सरकारमधून मंत्रिपदावरुन हकालपट्टी केली होती. पण सिद्धू यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावे यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट अमिरदरसिंग यांनी केला.
सोमवारी दिल्लीमध्ये भाजप, शिरोमणी अकाली दल आणि अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसचे जागावाटप जाहीर झाले. त्या जागावाटपानंतर भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पत्रकार परिषदेत झाली. याच ठिकाणी अमरिंदर सिंग यांनी या गंभीर आरोप केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावतीने लेखी पत्र आणि फोनच्या माध्यमातून सिद्धू यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्यात यावे, अशी विनंती करण्यात आल्याचा दावा अमरिंदर सिंग यांनी केला आहे.
सध्या अमरिंदर सिंग यांच्या या आरोपावर काँग्रेस किंवा नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. पंजाबमध्ये २०१७ साली काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. अमिरदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते, त्यात सिद्धू यांना मंत्रिपद दिले गेले होते. पण या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या वादानंतर अमिरदरसिंगांना सिद्धू यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले होते.
अमरिंदर सिंग यांना काँग्रेसचे उत्तर
अमरिंदर सिंग यांच्या या आरोपाला काँग्रेसने उत्तर दिले आहे. अमरिंदर सिंग यांनी घटनात्मक पद भुषवले आहे. पण आता निवडणुकीच्या काळात मुळ मुद्द्यांपासून मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप करत आहे, अशी टीका काँग्रसेने केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. हमीभाव, बेरोजगारी यासारखे जनतेचे प्रश्न असताना अमरिंदर सिंग हे प्रचार भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा टीका काँग्रेसने केली आहे.
सिद्धू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मैत्री तशी जगजाहीर आहे. दोघांनीही साधारणत एकाच काळात आपापल्या देशासाठी क्रिकेट खेळले आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीला सिद्धू उपस्थित राहिले होते. एवडेच नाही तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांना त्यांनी मिठी मारल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर देशात यावरुन राजकीय वाद देखील रंगला होता.