Home > Max Political > वॉशिंग पावडरचा जोर कमी पडला, भाजपच्या भ्रष्ट नगराध्यक्षाची हकालपट्टी

वॉशिंग पावडरचा जोर कमी पडला, भाजपच्या भ्रष्ट नगराध्यक्षाची हकालपट्टी

वॉशिंग पावडरचा जोर कमी पडला, भाजपच्या भ्रष्ट नगराध्यक्षाची हकालपट्टी
X

भारतीय जनता पक्षाच्या हाती असलेल्या चिखली नगरपालिकेमध्ये पक्षाच्याच नगराध्यक्षाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, गैरकारभार आणि दादागिरी केल्याच्या आरोपावरुन भाजपला आपल्या नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांची भाजपामधून हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पत्रकार परिषद आयोजित करून आज या निर्णयाची घोषणा केली. त्यानंतर भाजपच्या या निर्णयाची सगळीकडे चर्चा आहे.

तर दुसरीकडे नगराध्यक्ष च्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे करण्यात आली, आणि त्यामुळे त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय मात्र, या सर्व कामांचे श्रेय हे स्थानिक आमदार श्वेता महाले आणि त्यांच्या पतींना घेता येत नसल्याने निराशेपोटी त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया कुणाल बोंद्रे यांनी केली आहे. तर पक्षातून निष्कासित केल्याचे कुठलेच पत्र अद्यापपर्यंत आम्हाला पोहोचले नसून हे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून समजले आहे, आणि नगराध्यक्षा विरोधात आत्तापर्यंत एकही भ्रष्टाचाराची तक्रार

आलेली नसून भ्रष्टाचाराचे आरोप कुणाल बोन्द्रे यांनी फेटाळून लावले आहेत.

दोन दिवसांमध्ये या सर्वांच्या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी घोषणा केली आहे.

गेल्या पाच वर्षांपूर्वी 2016 मध्ये पार पडलेल्या नगरपालिका निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर प्रिया कुणाल बोंद्रे ह्या थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.

शिवाय 26 पैकी 13 स्वपक्षीय सदस्यांसह शिवसेना – 1, राष्ट्रवादी काँग्रेस – 2 आणि एका अपक्ष सदस्याने भाजपाला पाठिंबा दिला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारसभेत दिलेल्या आश्वासनानुसार कोट्यावधी रुपयांचा निधी चिखली नगर पालिकेला दिला. परंतु, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे आणि त्यांचे पती कुणाल बोंद्रे यांनी या निधीचा जनतेच्या हितासाठी पारदर्शीपणे वापर केला नाही, असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.

निकृष्ट दर्जाची कामे, मनमानी कारभार, कुणाल बोंद्रे यांचा कामकाजात अवाजवी हस्तक्षेप आणि अरेरावीची वागणूक या गोष्टींबद्दल त्यांना यापूर्वी वारंवार समज देण्यात आली. मात्र, त्यांनी आपल्या कारभारात सुधारणा न केल्यामुळे त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी जाहीर केले आहे..

या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर दुसरीकडे बोंद्रे दाम्पत्य हे काँग्रेस मध्ये परत जाणार असल्याची चर्चा सुरु असून दोघांच्या हकालपट्टीने भाजपने नगर परिषद निवडणूक तोंडावर असताना खळबळ उडाली आहे..

Updated : 21 Oct 2021 11:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top