Home > Max Political > गायब परमबीर सिंह यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?

गायब परमबीर सिंह यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?

Explained Parambir Singh What action can be taken against the missing Parambir Singh?

गायब परमबीर सिंह यांच्यावर काय कारवाई होऊ शकते?
X

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचा आरोप करणारे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह गेल्या काही दिवसांपासून गायब आहेत. ते परदेशात गेले आहेत. असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह देश सोडू जाऊ नयेत. यासाठी त्यांच्याविरोधात सर्व एअरपोर्टवर लूक आऊट नोटीस बजावली आहे.

अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर देखील परमबीर सिंह उपस्थित राहिलेले नाहीत.



अनिल देशमुख

त्यामुळं त्यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर पोलिसांनी सिंह यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता परमबीर सिंह यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले आहे. चांदिवाल आयोगाने काढलेले जामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते या ठिकाणी आढळले नाही. त्यामुळं सीआयडीने तसा अहवाल आयोगाला सादर केला आहे.

त्यानंतर आता परमबीर सिंह यांच्या विरोधात 6 ऑक्टोंबर पर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर ६ ऑक्टोबरला ते आयोगसमोर हजर झाले नाही. तर त्यांच्या विरोधात अजामीन पत्र अटक वॉरंट जारी करण्याची शक्यता आहे.

परमबीर सिंह यांची अॅन्टिलिया स्फोटकं प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून 17 मार्चला बदली केली होती. त्यानंतर त्यांनी 22 मार्चला होमगार्ड महासंचालक पदाचा कारभार स्विकारला होता. त्यांनतर 4 मे पासून त्यांनी वैद्यकीय रजा टाकली होती. ही रजा त्यांनी वारंवार वाढून घेतली आहे.

परमबीर सिंह यांच्या विरोधात काय आरोप आहेत?

NIA ने दाखल केलेल्या आरोप पत्रात परमबीर सिंह यांचे नाव नसले तरी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंह ह्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आऱोप पोलीस निरीक्षक घाडगे यांनी केला आहे. त्यांच्या या तक्रारीवरुन त्यांनी केलेल्या आरोपांच्या अनुंषगाने एन्टी करप्शन विभागाने उघड चौकशी करावी असे आदेश सरकारने दिले आहेत.

कलम ३०७ च्या खोटया गुन्ह्यात अडकविण्यात आल्यामुळे पी.आय.घाडगे यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये परमवीर सिंगासह ३३ लोकांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये पी.आय.घाडगे ह्यांनी परमवीर सिंग व सबंधितांवर ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलिसांकडे केलेली होती. त्यांच्या तक्रारीतील २४ आरोपांच्या अनुंषगाने एन्टी करप्शन विभागाने उघड चौकशी करण्याचे आदेश झालेले आहेत. परमवीर सिंग हे प्रत्येक डीसीपीकडुन दिवाळीत ४० तोळे सोने घेत होते, तसेच इतर पोलीस अधिका-यांनकडुन सोने घेणे, पोलीस स्टेशन इनचार्ज पद देताना पैसे स्वीकारणे, मिरारोड कॉल सेंटर केसमधील आरोपींची नावे काढणे, सोलापुर ड्रग्ज केसमध्ये आरोपींची नावे काढणे, गर्भश्रीमंत आरोपींची नावे काढण्यासाठी पैसे घेणे, बिल्डरांची सेटलमेंट तसेच रिव्हॉल्वर लायसन्ससाठी प्रकाश मुथा नामक व्यक्तीची त्यांनी कल्याणमध्ये नियुक्तीच केलेली होती, परमबीर सिंह यांची शासकीय कार्यालये, कल्याण-डोंबिवलीतील टिडीआर घोटाळा, सलील चर्तुवेदी ड्रग्ज केस, तेलगीच्या बनावट स्टॅम्प छापखान्याला अभय असे एकुण मिळुन २४ आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते.

पोलिस महासंचालकांचा अहवाल परमबीर सिंह यांना निलंबीत करा...

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतर २५ पोलिसांना निलंबित करण्याचा प्रस्ताव राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याला दिला आहे. त्यामुळं गृहखात्यानं यावर सविस्तर अहवाल मागवला आहे.

राज्याच्या गृहखात्याची भूमिका काय?




परमबीर सिंह ज्या गृह विभागाच्या अंतर्गत काम करतात त्या पोलीस(Police) विभागालाही ते सध्या कुठे आहेत याची माहिती नाहीये. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (home minister) यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयासह राज्याचे पोलीस खातेही परमबीर सिंह यांना शोधत आहे. ते भारताबाहेर गेल्याची चर्चा आहे, पण सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत. असंही गृहमंत्र्यांनी सांगितले. कोणीही मंत्री असो, कुणीही ऑफिसर असो वा मुख्यमंत्री असो त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेतल्याशिवाय बाहेर जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे ते परदेशात गेले असतील तर केंद्र सरकार काय कारवाई करेल ते पाहावे लागेल? पण महाराष्ट्र सरकार सध्या त्यांना शोधत आहे, अशी माहितीही वळसे पाटील यांनी दिली.

परमबीर सिंह यांच्यावर काय कारवाई होणार?

परमबीर सिंह यांच्यावर काय कारवाई होणार असं त्यांनी थेट सांगितलं नसलं तरी डिसेंरमध्ये त्यांच्या विरोधात निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे. परमबीर सिंह उपस्थित न राहिल्यास कारवाई होऊ शकते, पण त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्या प्रश्नांबाबत त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे, त्यासाठी त्यांनी उपस्थित राहणं हे महत्त्वाचे आहे,. पण ही रुटीन प्रोसेस आहे. सरकार जाणून बुजून कुणाच्याही मागे लागून कारवाई करत नाहीये, नियमाला धरूनच प्रक्रिया होत असल्याचे त्यांनी सांगितले. पण परमबीर सिंह हे बाहेर गेले असल्याची कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, आमचे अधिकारी केंद्र सरकारबरोबर चर्चा करत आहेत, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांच्यावर काय कारवाई होणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

माजी पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांच्याशी आम्ही या संदर्भात बातचीत केली असता, ते म्हणाले

प्रश्नच असाच आहे की ते का पळून गेले? माजी पोलिस अधिकारी का पळून गेले? त्यांच्या जाण्यानं पोलिस दलाला काळीमा फासला. तेलगी घोटाळ्यामध्ये ही काही पोलिस अधिकाऱ्यांची नाव समोर आली होती. मात्र, या पोलिस अधिकाऱ्यांची नंतर निर्दोश मुक्तता झाली. कर नाही तर डर कशाला?



धनराज वंजारी, माजी पोलिस अधिकारी

हे अशोभनीय याचा परिणाम वर्षोनुवर्षे राहिल. महाराष्ट्र पोलिसातील एक अधिकारी असा फरार झाला असा वारंवार उल्लेख केला जाईल.

आता कारवाईचं म्हणाल तर जर तर फरार झाले असतील तर प्रोक्लेमेशन प्रोसेस केली जाईल.

विजय मल्या, चौक्सी, निरव मोदी फरार घोषीत झाल्यानंतर त्यांची संपत्ती जप्त केली गेली. त्या प्रमाणे त्यांची संपत्ती जप्त केली जाईल.

मात्र, ते फरार झाले कसे असा सवाल उपस्थित होतो. तर यामागे सिस्टीम आहे. असं वंजारी सांगतात.

प्रशासन सत्ताभिमुख आहे. जनता भिमूख नाही. केंद्र सरकारची या संदर्भातील भूमिका लपून राहिलेली नाही.

चांदीवाल आयोगासमोर अधिकारी हजर का राहिले नाही. यापेक्षा पोलिसांना परमबीर सिंह सापडले कसे नाही? असा सवाल उपस्थित होतो. तसंच या सर्व प्रकरणात जो आरोपी आहे. त्या सचिन वाझेला कोणी आणलं हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळं परमबीर सिंह यांनी तोंड उघडले तर आणखी राजकीय नेते अडचणीत येतील ही बाब देखील लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळं गुन्हेगार, राजकीय नेते आणि प्रशासन अशी अश्लील युती जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत हे थांबणार नाही. जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या लोकांनी संविधान काळ फासण्याचं काम केलं आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया वंजारी यांनी दिली आहे.


या संदर्भात आम्ही एका माजी पोलिस अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता, ते म्हणाले या तपासामध्ये नक्की काय पुरावे समोर आले आहेत. हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही. त्यामुळं त्यांच्यावर काय कारवाई होणार? हे आज तरी सांगणं कठीण आहे.

असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरीत जर ते फरार झाले असतील तर त्यांच्यावर प्रोक्लेमेशन प्रोसेस करण्यात येईल. असं मत धनराज वंजारी यांनी व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काय पुरावे आहेत? हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नसल्यानं त्यांच्या वर कारवाई होईल. हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 1 Oct 2021 10:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top