Home > Max Political > मंत्र्यांचं लाजिरवाणं वागणं ! सावित्रीबाईंपेक्षा मंत्र्यांना जाकीट महत्त्वाचं

मंत्र्यांचं लाजिरवाणं वागणं ! सावित्रीबाईंपेक्षा मंत्र्यांना जाकीट महत्त्वाचं

बनसोडे, मुश्रीफ, देसाई तुम्ही सभागृहात गांभिर्यानं कधी वागणार ? सावित्रीबाईंच्या मुद्द्यावर चर्चा सुरू अन् देसाई-लोणीकर जाकीटाच्या गप्पात व्यस्त

मंत्र्यांचं लाजिरवाणं वागणं ! सावित्रीबाईंपेक्षा मंत्र्यांना जाकीट महत्त्वाचं
X

विधीमंडळातला प्रत्येक क्षण हा महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असतो. याच सभागृहात जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू असते. तेव्हा सभागृहातील प्रत्येक सदस्याचं त्याकडं लक्ष असणं गरजेचं असतं. मात्र, सरकारच्या मंत्र्यांचंच सभागृहातील कामकाजात किती गांभिर्यानं लक्ष असतं हे अनेकदा सर्वांनी पाहिलंय.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज (२७ जुलै) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या आरोपींवर काय कारवाई करण्यात आली, असा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात विचारण्यात आला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत होते. त्याचवेळी फडणवीस यांच्यामागे बसलेले राज्याचे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ हे एकमेकांशी हसतखेळत बोलतांना दिसत आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अगदी मागच्या रांगेत बसलेले माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या शेजारी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई हे येऊन बसतात. आणि एकमेकांच्या अंगावरील जाकीटाचं कौतुक करतांना स्पष्ट दिसत आहेत. समोर उपमुख्यमंत्री फडणीस हे अगदी पोटतिडकीनं सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या आरोपींविरोधात केलेल्या कारवाईचा तपशील सांगत होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या मागे बसलेले मंत्री संजय बनसोडे, हसन मुश्रीफ, शंभुराज देसाई आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर हे चौघंही आपल्याच धुंदीत असल्याचं चित्र आज सभागृहात दिसलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपापल्या मंत्री आणि आमदारांना सभागृहाच्या गांभिर्याबद्दल कडक शब्दात समज देण्याची गरज आहे.

Updated : 27 July 2023 11:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top