Home > Max Political > राज ठाकरेंना 'मुन्नाभाई' म्हणणाऱ्या दिपाली सय्यद यांना मनसेचे प्रत्युत्तर

राज ठाकरेंना 'मुन्नाभाई' म्हणणाऱ्या दिपाली सय्यद यांना मनसेचे प्रत्युत्तर

गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे चर्चेत आहेत. त्यातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना मुन्नाभाई म्हणत टीका केली आहे. त्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरेंना मुन्नाभाई म्हणणाऱ्या दिपाली सय्यद यांना मनसेचे प्रत्युत्तर
X

राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याआधी पुणे शहरात होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र पावसाचे कारण देत राज ठाकरे यांची सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. त्यावरून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती करावी आणि आयोध्येला जावे. त्यांना माफी मागण्याची काहीही गरज पडणार नाही, असे वक्तव्य दिपाली सय्यद यांनी केले होते. तसेच राज ठाकरे यांची सभा रद्द झाल्यानंतर दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, पावसाचे कारण देऊन मैदान सोडले भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.

दिपाली सय्यद यांनी केलेल्या टीकेला मनसेने प्रत्युत्तर दिले आहे. मनसे नेते अखिल चित्रे म्हणाले की, अवसरवादी ताई, तुम्हाला धड तुमचं नाव माहित नाही. प्रत्येक वेळी राजकारणासाठी नाव बदलणाऱ्या तुम्ही. 2014 साली अहमदनगरमधून निवडणूक लढवली तर दिपाली सय्यद, 2019 मध्ये मुंब्रा कळव्यातून निवडणूक लढवली तर सोफिया जहांगिर सय्यद आणि शिवसंग्राममध्ये असताना दिपाली भोसले सय्यद. राजकारणासाठी वारंवार नाव बदलणाऱ्या तुम्ही तुम्हाला अवसरवादी ताई म्हणावं लागेल. आणि तुम्ही इतरांना नावं ठेवता, असा टोला अखिल चित्रे यांनी लगावला आहे.

पुढे अखिल चित्रे म्हणाले की, आम्ही वाईड बॉल म्हणून तुम्हाला उत्तर देत नव्हतो. सरडा जेवढा रंग बदलत नाही तेवढे तुम्ही नावं बदलत आहात. या नावं बदलण्यामागचं रहस्य काय ते एकदा उघड करा. आम्ही तुम्हाला आव्हान देतो तुम्ही नाव बदलण्यामागचं काय रहस्य आहे ते उघड कराल, अशा शब्दात मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिपाली सय्यद यांना प्रत्युत्तर दिले.

Updated : 19 May 2022 4:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top