Home > Max Political > सावरकर राजकारणाचा विषय नाही तर अभ्यासाचा:डॉ. बाळासाहेब पवार

सावरकर राजकारणाचा विषय नाही तर अभ्यासाचा:डॉ. बाळासाहेब पवार

सावरकर राजकारणाचा विषय नाही तर अभ्यासाचा:डॉ. बाळासाहेब पवार
X

राहुल गांधींनी ( Rahul Gandhi) जर मुद्दा काढला नाही तर कोणालाही सावरकरांची(VD Savarkar) आठवण येणार नाही . एकूण सावरकर कोणालाच नको आहेत पण चुक बरोबर काहीही असो भारतीय राजकारणात त्यांची महत्वाची भूमिका होती . किमान सन्मान मिळाला नाही तरी आता अपमान होणार नाही . सावरकर फक्त अभ्यासाचा विषय राहावेत, राजकारणाचा नको असे झाले तर अनेकांची दुकानदारी बंद होईल असं परखड विश्लेषण केलं आहे, राजकीय व समाजिक विषयांचे अभ्यासक डॉ. बाळासाहेब पवार यांनी....

राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द झाली व त्यानंतर पत्रकार परिषद घेतली व त्यांनी अनेकदा उपस्थित केलेला मी सावरकर नाही तर गांधी आहे माफी माघणार नाही असे वक्तव्य केले व एकच गोधळ उडाला . सध्या एक परिस्थिती खूप जाणवते ती प्रत्यक्ष किंवा समाज माध्यमावर तर जास्तच उजवे किंवा मोदी भक्त बदलत्या राजकीय परिस्थिती मुळे फारच विचलित झाले आहेत . भारत जोडो यात्रे नंतर हा प्रकार फार जाणवू लागला आहे . त्यांचा संयम सुटतो आहे . त्यांना कॉग्रेस बद्दल काहीच सहन होत नाही . मुळात ते वाचतच नाहीत ,समजून पण घेत नाहीत लगेच उडी घेतात व सामान्य माणूस त्यांना भयंकर ट्रोल करतो हा कॉग्रेसचा नसतो पण तरीही लिहित राहतो . मी याबद्दल मागे लिहिले होते . आम्ही सांगू तेच ऐकायचं दुसर काही नाही व त्यात काहीच पडताळून पहायचं नाही . अशी मानसिकता झालेली माणस भेटतात . दुर्दैवाने असे अनेक शिक्षक प्राध्यापक पण आहेत . ते कोणाला समजून घ्यायच्या किमान ऐकायच्या मनस्थितीत नाहीत . चुकीच्या मतांचा आग्रह सोडण्या इतका सारासार विचार त्यांच्या कडे नाही. व लगेच प्रक्षोभक बोलायला लागतात . म्हणजे कोणाचाही आवाज दाबायचा हे दिल्ली ते गल्ली सुरु आहे . डाव्या किंवा कॉग्रेस बद्दल लिहिलं की लगेच प्रतिक्रिया अरे वाचा तरी मग व्यक्त व्हा . एक झापड बंद अंध भक्त समुदाय तयार झाला आहे . याला एकच उपाय आहे . यांच्याशी चर्चा न करणे किंवा यांना चर्चेची संधी मिळेल असा मुद्दा न घेणे म्हणजे मूळ मुद्द्यावरून इतरत्र चर्चा जाणार नाही .

राहुल गांधी यांचा वि दा सावरकरा बद्दल चा मुद्दा असाच अप्रसंगिक आहे .. तसे सावरकर जर जिवंत असते तर ते संघ व भाजपाला नको झाले असते . नव्हे ते नकोच होते . कदाचित ते भारतातील समस्त हिंदुत्ववादी लोकांचे नेते असते . मग संघाची व भाजप ची गरजच उरली नसती किंवा यांचा जन्म झाला नसता . हिंदू महासभा हिच सर्वात मोठी संघटना नव्हे तर तेव्हाचा राजकीय पक्ष झाला असता . जर स्वातंत्र्य पूर्व काळात तीन राज्यात हिंदू महासभा सत्तेत होती . शिवाय त्यांची मुस्लिम लीगशी सुद्धा आघाडी झाली होती म्हणजे सावरकर व हिंदू महासभा हे एक मोठे राजकीय शक्ती म्हणून अस्तित्वात राहिले असते . संघाच्या अगोदर स्थापन व खूप विस्तारलेली ही संघटना होती संघाचा जन्म ही झाला नसता तसाही तो राजकीय हेतूने झाला नव्हता परंतु जनसंघ व नंतर भाजपा हे निर्माण झाले नसते सर्व हिंदुत्व वादी हिंदुमहसभेत सामील झाले असते . परंतु सावरकराची केलेल्या काही चुका व त्यांना न जमलेले राजकारण याला कारणीभूत ठरले . खरतर त्यांच्या लिखाणाने त्यांना खूप मोठा फटका बसला ते लिहित राहिले पण लिहिताना त्यांनी समस्त हिंदू भूमिका घेतली नाही . ते फक्त ब्राम्हणवादा भोवती फिरत राहिले व बहुजन नायक गौतम बुद्ध ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल वाट्टेल ते लिहित राहिले त्यांच्या कडून कळत नकळत किंवा जाणीव पूर्वक बहुजन समाजाचा अस्मिताभंग झाला व बहुजन हिंदू त्यांच्या पासून दूर गेला . हिंदू महासभेचा प्रसार हळू हळू कमी होत ती अस्तित्वहिन झाली .

सर्वात मोठी चुक म्हणजे त्यांना अमोघ वक्तृत्व व शब्द सामर्थ्य लाभले होते ते त्यांनी योग्य प्रकारे हिंदू धर्मीयांना एकत्र करण्यासाठी वापरायला हवे होते . हिंदू म्हणजे ब्राम्हण ही अतिशय संकुचित विचारधारा त्यांनी का स्वीकारली समजत नाही . व वैदिक व मनुवादी भूमिका सोडून त्यांनी जाती पातीच्या भिंती तोडून एक समग्र हिंदू समाज जो सर्वांना स्वीकारणारा आहे बहुसंख्य आहे अशी समग्र हिंदू समाज निर्मिती करायला हवी होती . त्यांना हिंदूचा भारत मिळाला होता . जिना ना मुस्लिम पाकिस्तान मिळाला होता . जे मुस्लिम भारतात राहिले ते बहुतांश धर्मांतरीत होते त्यांना विश्वास देऊन जवळ करण्याची ताकद त्यांच्यात होती .

सावरकरांची सर्वात मोठी चुक म्हणजे गांधी हत्या . महात्मा गांधी यांची हत्या करण्याचे काही कारणच नव्हते . ना ते कॉग्रेस च्या सरकार मध्ये जाणार होते ना घटनास्मितीत राहणार होते . उलट त्यांनी कॉग्रेस पक्ष बरखास्त करण्याचा सल्ला दिला होता व आग्रह धरला होता. गांधीजी आणखी काही वर्ष जगले असते तर त्यांनी कदाचित काँग्रेस विसर्जित केली असती व तेव्हा गांधी इतक्या उंचीचा माणूस दुसरा कोणी नव्हता . ही परिस्थिती सावरकरांसाठी फारच फायदेशीर ठरली असती . काँग्रेस सोडली तर हिंदू महासभा व डावे पक्षच राहिले असते . कॉग्रेस मध्ये काही कमी हिंदुत्ववादी नव्हते ते हिंदू महासभे कडे आलेच असते . पण सावरकरांच्या सहकाऱ्यांनी गांधी ना संपवण्याची घाई केली . त्यांचे वय पण झाले होते ही घटना घडायला नको होती . आज ही हिंदुत्ववादी संघटनेचे लोक असाच आतताई पणा करून साध्या चर्चेत सुद्धा अंगावर येतात हा अनुभव सतत येतो .ही वैचारिक अपरिपकवता आजही जाणवते . तिच सावरकरांच्या सहकाऱ्यांनी केली व सावरकर गांधी खून खटल्यातून निर्दोष सुटले पण भारतीय राजकारणातून ते व हिंदू महासभा अस्त पावली .

आज संघ व भाजपा यांना सावरकर कधीच मान्य नव्हते . त्यांना थोपवण्यासाठी संघाने तेव्हा फार कमी ताकत असताना कॉग्रेशी हात मिळवणी केली होती व डॉ. हेडगेवार कॉग्रेस च्या जवळीकीत होते . काँग्रेस अधिवेशनात पण सहभागी होत होते . त्यांना सावरकरांचे हिंदुत्व नक्कीच मान्य नव्हते . अगदी आजही संघ अधिकृत भूमिका घेत नाही . ते सोईने सावरकराचा वापर करून घेतात व अर्धवट कार्यकर्ते जे झापडबंद विचाराचे व मुस्लिम द्वेषाने तयार केलेले ते सावरकर सावरकर ओरडत राहतात . संघा इतका अन्याय सावरकरांवर कोणीच केला नसेल . पण आज त्यांना सावरकराचा मुद्दा भाजपा साठी राजकीय मुद्दा म्हणून हवा आहे . तशे वैचारिक क्षेत्रातून सावरकरांना मानणारा वर्ग फार कमी आहे . जो आहे तो व्यक्ती पुजक आहे . वैचारिक नाही . तशी उजव्या लोकात वैचारिक दृष्ट्या उणीव जाणवत राहते . जर सावरकरांना हिंदू चा एकमेव आधार केले तर संघाच्या नेतृत्वाचं काय व भाजपाच्या सध्य नेतृत्वाचं इतिहासिक महत्व काय हा प्रश्न आहेच त्यामुळे संघ किंवा भाजपा सावरकर वाद्यांना कधीच जवळ करत नाही . फक्त योग्य वेळी वापर करतो त्यांना हजारो लोक त्या तुरुंगात होते पण त्यांनी माफी मागितली नाही . सावरकरां चे सर्व माफी नामे आजही आहेत . त्यांनी इंग्रजकडून् पेन्शन घेतली हे पण पुरावे आहेत .पण तेव्हा सावरकर व त्यांचे दोन सहकारी सोडता कोणीही माफी मागितली नाही . तर मरण पत्करले हा इतिहास बदलता येणार नाही . सावरकर महात्मा गांधी हा पत्र व्यवहार पण सर्वसृत आहे . त्यामुळे सावरकराचा मुद्दा पूर्ण पणे फायद्याचा नाही हे संघाच्या थिंक टॅंक ला माहित आहे .पण राजकीय वापर मात्र ते करून घेतात हे दुर्दैव आहे .

दुसरा महत्वाचा मुद्दा राहुल गांधी अनेकदा सावरकराचा मुद्दा काढतात यात त्यांचा अभ्यास कमी दिसतो ते सावरकर माफी व गांधी हत्या व संघ या त्रिकोनात बोलतात. यात चर्चा सावरकरांची होते ते संघ किंवा भाजप चे नाहीत पण त्यांचे माफी नामे बाहेर येतात . बाकी लिखाणा ची चिरफाड होते . व्यक्तिगत चारित्र्याच्या चिंध्या करून टाकतात . यात फायदा कोणाला होतो हा मुद्दा वेगळा पण सावरकर पुन्हा केंद्रस्थानी येतात जे अतिशय अप्रासंगिक आहे . सावरकर गौरव यात्रा काढणाऱ्यांनी सावरकर किती वाचले माहित नाही जर आपण त्यांच्या अपमानाचा निषेध करत आहोत तर ती मिरवणूक इतकी उत्साही आनंददायी कशी काढतात हे लोक अगदी फेटे बंधून मॅचिंग करून निषेध म्हणजे सावरकराचा पुन्हा एकदा अपमान करतात . वैचारिक भाषण कशी होणार जेव्हा गौरव यात्रा असते तेव्हा त्या नेत्यांच्या चरित्राचा अभ्यास असणारे वक्ते असावे लागतात . तसा बौध्दिक खुराक असावा लागतो . सावरकरांच्या खऱ्या कर्तृत्वा बद्दल कोण बोलणार काय बोलणार हा आउत्सुक्याचा विषय राहील यात राजकीय नेत्याचा किती अभ्यास असतो हे आपल्याला माहित आहे . मग ते बोलून आणखी काही गोंधळ उभा करतात की फक्त राहुल गांधींचा निषेध एव्हडेच स्वरूप दिले तर मग चर्चा सावरकरांची जास्त होणार की राहुल गांधीची होणार हा मुद्दा तसाच राहतो.

राहुल गांधी नेहमी हा मुद्दा काढतात पण त्यामुळे खरा मुद्दा बाजूला पडतो . अडानी प्रकरण बाजूला जाऊन सावरकर मुद्दा पुढे आला व हाच सत्ताधारी लोकांना हवा होता . आता अडाणीच्या वीस हजार कोटी घोटाळ्यावर बोलायला नको . तो पैसा कोणाचा याचं उत्तर द्यायला नको काढा सावरकर गौरव यात्रा पण ती ही फक्त महाराष्ट्रात निघेल इतर राज्यात नाही . उद्धव ठाकरेंना सावरकर किती समजले हे पण कळत नाही . ते शिवरायांच्या नावाने मते मागतात व जेव्हा शिवरायाचा अपमान होतो तेव्हा गप्प बसतात . जे सावरकर हे दुसऱ्याच कॉपीराईट आहे त्यावर बोलत राहतात . शिवरायांचा अपमान करणाऱ्या सावरकरांची बाजू घेतात हे काही समजत नाही असो .

पण राहुल गांधी नी परिपक्व भूमिका घेत सावरकर हा मुद्दा सोडून दिला हे फार चांगल झाल . भारत जोडो नंतर च्या राहुल गांधीत ऐकण्याची क्षमता दिसून आली . शरद पवारांनी दिलेला सल्ला त्यांनी मानला . आपलयाला सावरकरांशी लढायचं की मोदींशी हे ठरवून घ्या हा सल्ला राहुल गांधींनी ऐकला व संसद सदस्यत्व रद्द झाल्या नंतर आपल्या मित्र पक्षाच्या लोकांशी चर्चा करायला ते संसदेत गेले शिवसेना नेत्यांशी चर्चा केली व हा सावरकरांच्या माफीचा मुद्दा परत घेणार नसल्याचा सर्वाबरोबर निर्णय घेतला ही बाब खूप चांगली झाली .आपल्या मित्र पक्षा ना अडचणीत न आणण्याची व अप्रासंगिक मुद्दा पुन्हा पून्हा काढण्याची गरज नाही हे त्यांच्या लक्षात आले . या मुद्द्यावर पुन्हा त्यांचे नेतृत्व समजदारी कडे झुकलेले दिसले .मला कोणी सल्ला द्यायचा नाही .मी कोणाचे ऐकणार नाही ही भूमिका त्यांची नाही . हे या प्रकरणात लक्षात आले . सावरकर गौरव यात्रेची हवा निघून गेली अर्थात राहुल गांधी माफी मागणार नाहीत पण मुद्दा काढणार नाहीत . व या मुद्द्यावर सावरकर देशाचे नेते न राहता महाराष्ट्रात एका गटा पुरते मर्यादित केले जातात हे पण घाईत घेतलेल्या निर्णयाचे परिणाम दिसतात . फक्त महाराष्ट्रात शहरी भागात हा कार्यक्रम होईल . यात आणखी एक मुद्दा महत्वाचा ठरतो तो म्हणजे बहुजन समाजातील कार्यकर्ते यात सहभागी होतात् की नाराज होतात . ज्यांना सत्ता आहे त्यांना कार्यक्रम घ्यावा लागेल पण मनाने किती लोक सहभागी होतील हा प्रश्न आहे . एकूणच राहुल गांधींनी हा अप्रासंगिक मुद्दा घेतला व भाजपा व शिंदे गटा ला कामाला लावले तरी हा तोटा भाजप व शिंदे चा आहे . महाराष्ट्र सोडून इतर राज्यात किंवा भाजपाच्या केंद्र कार्यकारिणीत किंवा संघा कडून कार्यक्रम आला नाही . ही घाई महारष्ट्रात हसू करणारी ठरणार आहे .

राहुल गांधींनी जर मुद्दा काढला नाही तर कोणाला ही सावरकरांची आठवण येणार नाही . एकूण सावरकर कोणालाच नको आहेत पण चुक बरोबर काहीही असो भारतीय राजकारणात त्यांची महत्वाची भूमिका होती . किमान सन्मान मिळाला नाही तरी आता अपमान होणार नाही . ही बाब दिलासा दायक आहे सावरकर फक्त अभ्यासाचा विषय राहावेत . राजकारणाचा नको हे मात्र चांगले झाले . म्हणजे अनेकांची दुकानदारी बंद होईल . कारण समाज माध्यम आता फार व्यापक झाले आहे . आपले लिखाण वर्तमाणपत्रातून छापून यावे हा आता मुद्दा राहिला नाही . तर समाज माध्यमातून लोक अतिशय भयंकर व्यक्त होतात . व अश्या वादग्रस्त यादी तील एक मुद्दा सर्वानुमते वगळाला गेला हे बरे झाले यात दोन्ही बाजू पेक्षा सावरकर मुक्त झाले असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही.

(लेखक राजकीय व समाजिक विषयांचे अभ्यासक आहेत)


Updated : 31 March 2023 9:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top