Home > Max Political > थोरातांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं... म्हणाले तरुण, धडाडीचा प्रदेशाध्यक्ष नेमणार

थोरातांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं... म्हणाले तरुण, धडाडीचा प्रदेशाध्यक्ष नेमणार

थोरातांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं... म्हणाले  तरुण, धडाडीचा प्रदेशाध्यक्ष नेमणार
X

पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आता विरली असून कारण बाळासाहेब थोरात यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मात्र यावेळी त्यांनी सूचक विधान करत तरुण, धडाडीचा प्रदेशाध्यक्ष नेमणार असल्याचं सांगितलं आहे.

थोरात म्हणाले, "मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही. माझे दर महिन्याला काही विषय असतात त्यांची चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मलाही दिल्लीतच ही बातमी समजली," असं ते म्हणाले. "माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्री या जबाबदाऱ्या असून दिल्लीत जाऊन योग्य प्रकारे त्या सांभाळेन असं सांगितलं होतं. पण तुम्हाला अजून काही जबाबदारी द्यायची असेल तर माझी हरकत नाही असंही सांगितलं होतं.

ऑक्टोबर महिन्यातदेखील मी कोणत्या जबाबदारीचं विभाजन करायचं असेल तर हरकत नाही असं स्पष्ट केलं होतं. एच के पाटील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी झाल्यानंतर त्यांनासुद्धा ही वस्तुस्थिती सांगितली होती. पण अचानक हा मुद्दा का आला याची मला कल्पना नाही. पण जर ती प्रक्रिया सुरु झाली असेल त्याचं स्वागत करतो," असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

दिल्लीतील नेत्यांसोबत राजीनाम्याची चर्चा झाली का ? या प्रश्नावर ते म्हणाले की, "दिल्लीत जाऊन मी राजीनाम्याची चर्चा करण्याची काहीच गरज नव्हती. एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामध्ये इतरांना जबाबदारी वाटून द्यावी अशी भूमिका कोणी मांडत असेल तर त्यात काही चुकीचं नाही. त्यातच यासंबंधी प्रक्रिया सुरु झाली असेल तर मी स्वागत करतो. मी समाधानी, आंनंदी आहे. मला काही अडचण नाही".

राजीनामा दिल्यास प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, "मी कोणाचं नाव पुढे करणार नाही. निर्णय घेताना एकच अपेक्षा असेल की तरुण, धडाडी, काँग्रेसला पुढे नेईल आणि राज्यभर फिरेल अशा कोणत्याही योग्य व्यक्तीला संधी दिली जावी". एच के पाटील यांच्या कामावर आपण समाधानी असल्याचं सांगत त्यांनी नाराजीचं वृत्तही फेटाळलं आहे.

Updated : 5 Jan 2021 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top