Home > Max Political > Why I killed Gandhi : अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीचं अभय, काँग्रेस मात्र नाराज

Why I killed Gandhi : अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीचं अभय, काँग्रेस मात्र नाराज

Why I killed Gandhi : अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीचं अभय, काँग्रेस मात्र नाराज
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी 'Why I killed Gandhi' या सिनेमामध्ये नथुराम गोडसेची भूमिका केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी आक्षेप घेतला होता. पण आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर मौन सोडत भूमिका मांडली आहे. शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांना कलाकार म्हणून भूमिका साकारण्याचे स्वातंत्र्य आहे, अशी भूमिका मांडत त्यांची पाठराखण केली आहे.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हे यांना अभय दिले आहे, पण दुसरीकडे राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र अमोल कोल्हे यांच्याबाबत नाराजी आहे, असे दिसते आहे. काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे.

"माणूस वा कलाकार… नथुराम कुठल्याच भूमिकेत समर्थनीय नाही, स्वीकारार्ह नाही. गांधी मारायचा डाव युगानुयुगे होत राहणार आहे. हजारो नथुराम विविध वेशांमध्ये-भूमिकांमध्ये येतील मात्र गांधींचा विचार अजरामर आहे." असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीच कलेच्या नावाखाली महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण करता येणार नाही, अशी भूमिका मांडत या सिनेमाला विरोध केला आहे. पण आता खुद्द शरद पवार यांनीच अमोल कोल्हे यांची पाठराखण केल्याने राष्ट्रवादीतर्फे या विषयावर पडदा पडला आहे. पण महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचे उदात्तीकरण करणारी भूमिका साकारणं कितपत योग्य आहे, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रात दाखल झालेल्या खटल्यामुळे कोर्टात हजर रहावे लागले होते. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर राहुल गांधी काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Updated : 21 Jan 2022 3:11 PM IST
Next Story
Share it
Top