देवेंद्र फडणवीस यांचे मालेगाव स्फोटातील आरोपीशी हस्तांदोलन, काँग्रेसने ट्विट केला व्हिडिओ
X
राज्यात एकीकडे संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या असा संघर्ष पेटलेला आहे, त्यामुळे राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमधील आरोपांच्या मालिकेत आता काँग्रेसने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंतांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओमुळे आता राज्याच्या राजकारणात नवीन वाद सुरू झाला आहे.
सचिन सावंत यांनी जो व्हिडिओ ट्विट केला आहे तो भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नातील व्हिडिओ आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याशी देवेंद्र फडणवीस हे हस्तांदोलन करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते आहे. कुणीतरी व्यक्ती प्रसाद पुरोहित यांना फडणवीस यांच्याकडे घेऊन आल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते, आणि पुरोहित यांना पाहून देवेंद्र फडणवीस हे उभे राहून त्यांच्याशी हस्तांदोलन करुन नंतर नमस्कार करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे, तसेच 'बहुत याराना लगता है' असे म्हणत त्यांनी फडणनीस यांना चिमटा काढला आहे. तसेच "मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील आरोपीबरोबर भाजपा नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या व्हिडिओ तून "ये रिश्ता क्या कहलाता है?" हा प्रश्न उपस्थित होतो व "बहुत याराना लगता है" असे दिसते." असे आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. प्रसाद पुरोहित अत्यंत गंभीर घटनेचतील आरोपीसोबत एवढी जवळीक का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.