News Update
Home > Max Political > RSS ची टोपी काळी का? हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून उध्दव ठाकरे भडकले

RSS ची टोपी काळी का? हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून उध्दव ठाकरे भडकले

कोरोनानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित करणार होते. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर या सभेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट भाजपची मातृसंस्था RSS वर निशाणा साधला.

RSS ची टोपी काळी का?  हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून उध्दव ठाकरे भडकले
X

राज्यात भोंग्यांवरून वाद सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यातच शिवसेनेने हिंदूत्व सोडले असल्याची टीका विरोधी पक्षांकडून सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तर यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट भाजपची मातृसंस्था असलेल्या RSS वर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संघाची स्थापना होऊन शंभर वर्षे पुर्ण होत आले आहेत. मात्र या जनसंघाचा स्वातंत्र्यलढ्यात कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी 1 मे च्या सभेत भगव्या टोप्या घातल्या होत्या. त्याचा उध्दव ठाकरे यांनी समाचार घेतला. हिंदूत्व दाखवण्यासाठी भाजपने भगव्या टोप्या घातल्या. मग भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची टोपी काळी का? असा सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला.

आमचं हिंदूत्व 'गधा'धारी नाही

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमचं हिंदूत्व गदाधारी असल्याचे म्हटले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे हिंदूत्व गदाधारी नाही तर 'गधा'धारी असल्याचे म्हटले होते. त्यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, आमचं हिंदुत्व गधाधारी होतं, पण अडीच वर्षांपूर्वी आम्ही तुम्हाला सोडलं. आम्ही गध्याला सोडून दिलं. कारण काही उपयोग नाही त्याचा. जी गाढवं आमच्यासोबत घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती, त्या गाढवानं आम्हाला लाथ मारायच्या आधीच आम्ही त्याला लाथ मारली. बसा बोंबलत, अशी टीका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

उध्दव ठाकरे यांचा राज ठाकरेंना नाव न घेता टोला

राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा पकडून शिवसेनेचे हिंदूत्व बेगडी असल्याची टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उत्तर दिले. उध्दव ठाकरे म्हणाले, मला एकदा शिवसैनिकांनी विचारलं की, तुम्ही लगे रहो मुन्ना भाई पाहिला का? त्यामध्ये संजय दत्तला जसे महात्मा गांधी दिसतात. त्यानंतर तो गांधीगीरी करतो. तशी केस आपल्याकडे आहे. ते सध्या बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी भगवी शाल घेऊन फिरत आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे असे म्हणाले की, ते कधी हिंदूत्वाचा मुद्दा घेतात. कधी मराठीचा मुद्दा घेतात. त्यांचा केमिकल लोच्या झाला आहे. हा चित्रपट सत्यकथेवर आधारीत आहे. त्यांना कुठे फिरायचं आहे ते फिरु द्या. आयोध्येला जायचं असेल तर जाऊ द्या. आदित्यसुध्दा आयोध्येला जाणार आहे, असे सांगत राज ठाकरे यांना खोचक टोमणा मारला.


Updated : 15 May 2022 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top