पंजाब स्थानिक स्वराज्य संस्था निकालामुळे धास्तावलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तातडीने वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावून पंजाबातील निकाल व शेतकरी आंदोलनाचा आढावा घेतला आहे.पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात पंजाबातील शेतकऱयांचा प्रामुख्याने सहभाग होता. भाजप खासदार आणि दिल्ली दंगलीतील प्रमुख संशयित दीप सिद्धू यांचे मित्र अभिनेते सनी देओल यांच्या लोकसभा मतदारसंघात तर शेतकऱयांनी भाजपचा दारुण पराभव केला आहे. त्यातच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता जागोजाग शेतकरी महापंचायत होत असून त्याला मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
पंजाब व हरयाणासह पश्चिमी उत्तर प्रदेशातील जाट बेल्टमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढली असल्याने भाजपला भविष्यात निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेच्या किमान 40 जागांवर या आंदोलनामुळे भाजपला फटका बसू शकेल तसेच पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला या आंदोलनाचा मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.
पंजाबचे निकाल हाती येताच अमित शहा यांनी आज तातडीने बैठक बोलावली. या बैठकीला भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, पश्चिम उत्तर प्रदेशमधले भाजप नेते व केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव बालियान हे नेते उपस्थित होते. यावेळी तिन्ही कृषी कायदे हे शेतकऱयांचे कसे हिताचे आहेत हे पटवून सांगा. खाप पंचायती व शेतकरी महापंचायतींच्या नेत्यांशी स्थानिक भाजप नेत्यांना संपर्क ठेवण्याच्या सूचना द्या असा आदेश शहा यांनी यावेळी दिला. काही मंडळी शेतकऱयांमध्ये जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करत आहेत. त्यापासून शेतकऱयांचे प्रबोधन करा अशा सूचनाही अमित शहा यांनी दिल्या. तसेच जाट बेल्टमधील आमदार, खासदारांकडून यावेळी शहा यांनी फीडबॅकही घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकार आता स्थानिक निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर पुढची रणनीती कशी ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.