Home > Max Political > "पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा," राम कदमांची भगतसिंह कोश्यारींकडे 'अजब' मागणी

"पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा," राम कदमांची भगतसिंह कोश्यारींकडे 'अजब' मागणी

कोणत्याही घटना घडामोडींसाठी `राजभवन` गाठण्याचा भाजप नेत्यांचा पॅटर्न आता पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतरही कायम आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत थेट पश्चिम बंगालमध्येच राष्ट्रपती राजवट लागू करा अशी अजब मागणी केली आहे.

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, राम कदमांची भगतसिंह कोश्यारींकडे अजब मागणी
X

भाजपाच्या कोणत्याही आंदोलनात पुढे असलेले आ. राम कदम यांनी यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट, कंगना- अर्णब प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

आता राम कदमांनी थेट बंगालमधे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी कोश्यारींना भेटून केली आहे. यावेळी राम कदम यांच्या सोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते. "पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी," असं राम कदम यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

त्याआधी राम कदम यांच्या नेतृत्वात खारमध्ये ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील नागरिकदेखील होते. काळे झेंडे दाखवून ममता बॅनर्जी सरकारचा निषेध करण्यात आला. नागरिकांकडून यावेळी 'ममता हटाव बंगाल बचाव" अशा घोषणा देण्यात आल्या.


दरम्यान यासंदर्भात आम्ही राम कदम यांच्याशी संपर्क साधला तेव्हा, "राज्यपालांना भेटून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी मी केली नव्हती. तर माझ्यासोबत आलेल्या पश्चिम बंगालमधल्या काही जणांनी राज्यपालांकडे मागणी केली" असे त्यांनी स्पष्ट केले.



Updated : 12 Dec 2020 11:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top