सत्ता गेल्यावर कुणाला एवढे अस्वस्थ झालेले पाहिले नाही – शरद पवार
X
राज्य विधिमंळाचे बजेट अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणातील गोंधळ, त्यानंतर राज्यपालांनी भाषण थांबवल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला जोरदार चिमटे काढले आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री छगन भुजबळ यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सत्ता येते जात असते पण सत्ता गेल्यावर इतके अस्वस्थ झालेले आपण कुणालाही पाहिले नाही, असा टोला त्यांनी लगावला. सत्तेत आलो की जनतेसाठी काम करायचे पण सत्ता गेल्यावंतर ती हसतमुखाने सोडायची असते, पण भाजपचे मात्र वेगळेच आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. या अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणले आहे आणि सरकार चांगले काम करत आहे, पण त्यामुळेच अनेकजण अस्वस्थ आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबतही केंद्र सरकारचे निष्काळजीपणाचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली. युक्रेनमध्ये राज्यातील विद्यार्थी अडकले आहेत. पण सरकार लक्ष देत नसल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे, अशी टीका त्यांनी केली.