Home > Max Political > नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर कॉंग्रेसमध्ये

नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर कॉंग्रेसमध्ये

नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर कॉंग्रेसमध्ये
X

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस भाजपला मोठा झटका दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपाला रामराम करीत आपल्या समर्थकासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी खतगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपामध्ये खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून आपण भाजपा सोडत असल्याचे जाहीर केले.

यावेळी बोलताना खतगावकर म्हणाले की, जिल्ह्यासह माझे कार्यक्षेत्र राहिलेल्या बिलोली व देगलूर या दोन्ही तालुक्यातील सामान्य माणसाचा विकास हेच माझे प्रमुख ध्येय राहिले आहे. त्यामुळे जनतेने मला नेहमीच साथ दिली. मला तर निवडून दिलेच, परंतु, मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर मी दिलेल्या उमेदवाराला सुद्धा त्यांनी विजयी केले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मी भाजपात दाखल झालो, तेव्हा जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद मोठी नव्हती. त्यामुळे नांदेड शहरासह ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले.

माझ्या पुढाकारामुळे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाजपात आली. पक्षाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक बुथपर्यंत कार्यकर्ता निर्माण करण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले.

माझ्या नेतृत्वाखालीच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. मी पक्षात येण्याआधी जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे संख्याबळ केवळ २ होते. माझ्याच काळात ते १४ पर्यंत वाढले. जिल्ह्यामधील कुंडलवाडी ही एकमेव नगरपालिका होती, ज्या नगर पालिकेवर माझ्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने निर्विवाद विजय मिळवला.

त्यानंतर चिखलीकर यांच्या एकाधिकारशाही वृत्तीने भाजपातील जुने निष्ठावंत व आमच्या सारखी झोकून देऊन काम करणारी मंडळी बेदखल करण्याचे काम खासदार चिखलीकर यांनी सुरू केले.

देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरवताना माझे मत विचारात घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न करता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हट्टामुळे शिवसेनेतून आयात केलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली. म्हणजे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ठरवायचा आणि त्याच्या पराभवानंतर त्याचे सारे खापर माझ्यावर फोडायचे, असे कारस्थान चालू असल्याचे मला स्पष्ट दिसू लागले होते.

त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असून, आजच काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे खतगावकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्यासोबत माजी आमदार तथा भाजप कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश पोकर्णा, नांदेड महानगर भाजपचे उपाध्यक्ष व माजी उपमहापौर सरजितसिंग गिल, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबाराव पाटील भाले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू गंदीगुडे, भाजप युवामोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी पाटील खतगावकर.

भाजप जिल्हा सचिव आनंदराव पाटील बिराजदार, भाजपचे उत्तर नांदेड विधानसभा माजी अध्यक्ष दीपक पावडे आदी प्रमुख पदाधिकारी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला असल्याचे जाहीर केले.

Updated : 17 Oct 2021 11:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top